
तिसऱ्या टप्प्यात उद्या ११ मतदारसंघांमध्ये मतदान होत असतानाच, महायुतीला गेल्या वेळी जिंकलेल्या सात तर महाविकास आघाडीला चार जागा कायम राखण्याचे आव्हान असेल.
तिसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या रायगड, लातूर, सोलापूर, माढा,सांगली, कोल्हापूर आणि हातकणंगले या सात जागा सध्या महायुतीकडे आहेत. बारामती, उस्मानाबाद, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग हे चार मतदारसंघ महाविकास आघाडीकडे आहेत. महायुतीसाठी उद्याची लढत अधिक आव्हानात्मक आहे.
बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद-भावजयीमधील लढतीकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे. हा मतदारसंघ कायम राखणे हे शरद पवार यांच्यासाठी जसे प्रतिष्ठेचे आहे तसेच अजित पवार यांच्यासाठी आव्हानात्मक आहे. बारामतीच्या निकालावर अजित पवार यांचे महत्त्व ठरणार आहे. यामुळेच गेली १५ दिवस अजित पवार हे बारामीतमध्ये ठाण मांडून बसले होते.