बीड : बीडमध्ये गेवराई तालुक्यातील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे गावातीलच एकाने अगोदर अत्याचार केला आणि त्यानंतर २ मित्रांच्या मदतीने तिला पुण्याला पळवून नेले.
अत्याचार करणारा आणि त्याला मदत करणारे दोघेही गावातील असून ते देखील अल्पवयीन असल्याने खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या चकलंबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी चकलंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडच्या गेवराई तालुक्यात असणा-या एका गावातील अल्पवयीन मुला-मुलीची मैत्री झाली. मुलीचे वय अवघे १३असून मुलाचे १५ वर्षे आहे. २६ जून रोजी गावातीलच एकाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर इतर दोन मित्रांच्या मदतीने ते अहमदनगरपर्यंत गेले. तेथून दोन मित्र परत आले तर पीडिता व मुलगा हे पुण्याला गेले. पुण्यातील एका नातेवाईकाकडे त्यांनी आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. काही तास राहिल्यानंतर नातेवाईकांना यांच्याबद्दल संशय आला. त्यांनी गावाकडे विचारणा केल्यावर हे पळून आल्याचे समजले.
Discussion about this post