
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही, असा आरोप विरोधकांनी अनेकदा केलेला आहे. मात्र यावेळच्या निवडणुकीआधी मोदींनी अनेक माध्यमांना मुलाखती दिल्या आहेत.पत्रकार परिषद न घेण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर मोदींनी पत्रकार परिषद न घेण्याचे कारण सांगितले. मी संसदेला उत्तरदायी आहे, से सांगताना त्यांनी माध्यमांच्या बदललेल्या दृष्टीकोनावरही बोट ठेवले. तसेच आता लोकांशी संपर्क साधण्याचे इतरही मार्ग उपलब्ध झाले असल्याकडे लक्ष वेधले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांवर टीका करताना म्हटले की, आतापर्यंत असे होत होते की, माध्यमांच्या प्रतिनिधिंना मॅनेज करून काहीही बोलले तरी ते देशभरात पोहोचत होते.मला त्या मार्गाने जायचे नव्हते. मला मेहनत घ्यायची होती, गरीबांच्या घरापर्यंत मला पोहोचायचे होते. मी विज्ञान भवनात रिबीन कापून फोटो काढून प्रसिद्धी मिळवू शकलो असतो. पण मी झारखंडमध्ये छोट्याश्या जिल्ह्यात जाऊनही काम करतो. मी कामाची एक नवी संस्कृती विकसित केली. ही संस्कृती माध्यमांना योग्य वाटली तर ते त्यापद्धतीने दाखवतील. ही संस्कृती योग्य नसले तर माध्यमे त्यांना हवं ते करू शकतात.