बीड : थोर समाजसुधारिका, स्त्रीशिक्षणाच्या जननी आणि शिक्षणक्रांतीच्या आद्य प्रवर्तक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वंसंतराव काळे महाविद्यालयात विनम्र अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यास आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमास कै. अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्थेचे सचिव प्रा. गणेश पोकळे, प्रशासकीय अधिकारी प्रा. बप्पासाहेब हावळे, प्रभारी प्राचार्य प्रा. सय्यद रफिक यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा संक्षिप्त परिचय करून देण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणासाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा गौरव केला. तत्कालीन प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत अनेक अडचणी, टीका आणि अन्याय सहन करूनही त्यांनी शिक्षणाचा प्रकाश समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचवला. स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्याय, अंधश्रद्धा निर्मूलन आणि मानवी मूल्यांचा पुरस्कार हे त्यांचे विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
शिक्षण हे केवळ ज्ञानप्राप्तीचे साधन नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, हा संदेश सावित्रीबाई फुले यांनी आपल्या कार्यातून दिला. त्यांचे विचार आजच्या पिढीने आत्मसात करून समाजातील विषमता दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा जपणे ही शैक्षणिक संस्थांची सामाजिक जबाबदारी असून महाविद्यालयातील विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांतून हे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजविले जातील, असा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रम शांत, सुसंस्कृत आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला