माणसाचं आयुष्य संपतं, पण त्याची कर्तृत्वकहाणी, विचार आणि लेखन हे समाजाच्या मनावर कायमचं ठसा उमटवतं. प्रा. भास्कर चंदनशिव सर यांच्या निधनाने ग्रामीण साहित्यविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तरीदेखील त्यांची साहित्यसंपदा समाजासाठी सदैव प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.
“लाल चिखल” या त्यांच्या कथासंग्रहाने त्यांना वेगळं स्थान दिलं. शेतकऱ्याच्या व्यथा, त्याची तगमग, उपेक्षा आणि संघर्ष इतक्या जिवंतपणे त्यांनी शब्दांत उतरवले की वाचकाला ती कहाणी स्वतःचीच वाटावी. त्यांच्या लेखणीतून उमटणारा लाल रंग हा केवळ मातीचा नव्हता, तर शेतकऱ्याच्या घामाचा आणि रक्ताचा साक्षीदार होता.
त्यांचे ‘जांभळढव्ह’, ‘मरणकळा’, ‘अंगारमाती’, ‘नवी वारुळं’, ‘बिरडं’, ‘भिंगुळवाणा’ हे कथासंग्रह ग्रामीण जीवनाचे आरसे ठरले. या कथांमध्ये फक्त वेदना नाहीत, तर ग्रामीण समाजाची लढाऊ वृत्ती, जगण्याची कणखरता आणि आशेचा किरणही आहे. शिवाराचा गंध, बैलाच्या घामाचा सुगंध आणि शेतकऱ्याच्या डोळ्यांतील अश्रू या सर्वांचा प्रत्यय त्यांच्या शब्दांतून येतो.
समीक्षेच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. ‘भूमी आणि भूमिका’, ‘माती आणि नाती’, ‘माती आणि मंथन’ या ग्रंथांमधून त्यांनी ग्रामीण साहित्याच्या विविध प्रवाहांचे सखोल विश्लेषण केले. त्यांनी दाखवून दिलं की ग्रामीण साहित्य हा केवळ दु:खाचा आवाज नाही, तर सामाजिक परिवर्तनाचे सामर्थ्य असलेला प्रभावी प्रवाह आहे.
त्यांचा ‘रानसई’ हा ललितलेखसंग्रह वाचकांना ग्रामीण मनोविश्वाची नाजूक छटा दाखवतो. तर ‘ज्योती म्हणे’, ‘गाथा’, ‘सगनभाऊंच्या लावण्या’ यांसारख्या कृत्यांचे संपादन करून त्यांनी इतर लेखकांचाही आवाज बळकट केला. त्यामुळे ते फक्त लेखक नव्हते, तर नव्या पिढीच्या साहित्यिकांना आधार देणारे संपादक आणि मार्गदर्शकही होते.
त्यांची साहित्यदृष्टी सदैव समाजाभिमुख होती. त्यांनी लिहिलं ते केवळ मनोरंजनासाठी नव्हतं, तर समाजजागृतीसाठी होतं. शेतकऱ्याच्या वेदना त्यांनी केवळ कागदावर उमटवल्या नाहीत, तर त्या वाचकांच्या मनात कायमच्या कोरल्या. म्हणूनच त्यांचं साहित्य आजही वाचकाला स्वतःच्या आजूबाजूचं वास्तव समजून घ्यायला भाग पाडतं.
आज प्रा. भास्कर चंदनशिव सर आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने ग्रामीण साहित्यविश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे. पण त्यांनी दिलेलं शब्दविश्व हे दीपस्तंभ ठरेल. त्यांची प्रत्येक कृती म्हणजे ग्रामीण जीवनाशी असलेल्या नाळीची साक्ष आहे. त्यांच्या लेखनातून आपण शेतकऱ्याच्या वेदना अनुभवल्या, त्याचा संघर्ष जाणला आणि त्याची आशा आत्मसात केली.
अशा या प्रखर ग्रामिण साहित्यिकाला मनःपूर्वक अभिवादन!
प्रा. भास्कर चंदनशिव सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
ओम शांती
सरांचा विद्यार्थी
प्रा.गणेश पोकळे