बीड : व्यक्तीच्या आयुष्यातील ताणतणाव, नैराश्य आणि धावपळीच्या जीवनशैलीत मानसिक संतुलन राखण्यासाठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’सारख्या संस्थांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. Art of Living Foundation या संस्थेच्या विविध उपक्रमांमुळे व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास आणि मानसिक शांती प्राप्त होते.
पत्रकारांचे जीवन घड्याळाच्या काट्यावर चालते. या स्पर्धात्मक जीवनशैलीमध्ये त्यांचे आरोग्य तान-तणाव मुक्त आणि व्यवस्थित रहावे. याकरिता बीड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी मेडिटेशन चॅलेंज या 10 दिवसीय कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. या धावपळीच्या युगात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ध्यान साधनेमुळे व्यक्तीला सकारात्मक उर्जा प्राप्त होते, असे प्रतिपादन राहुल पाटील यांनी केले.

येथे वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालयात बीड येथे पत्रकारांसाठी आॅनलाईन होणा-या मेडिटेशन चॅलेंज कोर्सचे विषयी माहिती देण्यातकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाचा प्रमुख मार्गदर्शक म्हणून एसबीआयचे मॅनेजर राहुल पाटील हे बोलत होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थाध्यक्ष रमेश भाऊ पोकळे हे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ पत्रकार महेश वाघमारे, लक्ष्मीकांत रूईकर, बालाजी मारगुडे, संतोष पारगावकर, जालिंदर धांडे या पत्रकार मंडळीची प्रमुख उपस्थित होती. पुढे बोलताना पाटील म्हणाले की, आजच्या वेगवान युगात मन:शांती हरवत चालली आहे. स्पर्धा, करिअरची धावपळ, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक अपेक्षा यामुळे प्रत्येक व्यक्ती तणावाखाली आहे. अशा वेळी श्वसनक्रिया, ध्यानधारणा आणि योगाच्या माध्यमातून मन स्थिर करण्याची गरज आहे.
श्री.श्री. रविशंकर हे महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी पुढील दहा दिवस मेडिटेशन चॅलेंज हा कार्यक्रम घेणार आहेत. या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील पत्रकारांना यांचा खूप मोठ्याप्रमाणात फायदा होईल असे ही ते म्हणाले. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना रमेश पोकळे म्हणाले की, आजच्या धावपळीच्या आणि बदलेल्या जीवनशैलीमध्ये प्रत्येक व्यक्तीला ताण तणावमुक्त जगण्यासाठी अशा कोर्सेसची आवश्यकता आहे. योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा जीवनशैलीत समावेश केल्यास मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारते. मन शांत असेल तर निर्णयक्षमता वाढते, असेही त्यांनी नमूद केले. आज पत्रकार जगाची लढाई लढत असताना त्यांचे आरोग्यही ठणठणीत असावे, याकरिता पत्रकारांनी आवर्जून यामध्ये सहभागी व्हावे असेही पोकळे म्हणाले. यावेळी जेष्ठ पत्रकार महेश काका वाघमारे, लक्ष्मीकांत रूईकर,बालाजी मारगुडे, यांनीही पत्रकारांच्या लाईफस्टाईल विषयी बोलत उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना प्रत्यक्ष श्वसनक्रिया व ध्यानाचा अनुभव देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी नियमित साधना करण्याचा संकल्प केला. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या पुढील उपक्रमांविषयी माहिती देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संतोष सावंत यांनी केले. तर सुत्रसंचलन आणि आभार प्रा. बप्पासाहेब हावळे यांनी केले. या कार्यक्रमाला पत्रकार सोमनाथ खताळ, सुरेश जाधव, सचिव प्रा. गणेश पोकळे,प्र. प्राचार्य रफिक सय्यद, प्र. प्राचार्या कोमल सुरवसे,प्रा. सुहास गाढवे, प्रा. अफरोज सय्यद, दिपक जाधव, मंगेश खराडे, शंकर इंगोले, संध्या पोकळे, सचिन चौरे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.