- स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या ऐवजी टक्केवारीवरच भर देण्यात येऊन टक्केवारी हीच गुणांकन मोजण्याची एकमेव मोजपट्टी राहिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास दुर्लक्षित होतोय ही बाब गंभीर आहे.
दहावी-बारावीच्या निकालांचा काळ आला, की समाजात टक्केवारीची एक वेगळीच स्पर्धा सुरू झालेली दिसते. वर्तमानपत्रे, सोशल मीडिया आणि घराघरांतील चर्चांमध्ये फक्त ९०, ९५, ९९ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचाच उल्लेख असतो. एकेकाळी ६० ते ७० टक्के गुण मिळवणारा विद्यार्थी “हुशार” समजला जायचा; पण आज ९० टक्के मिळूनही विद्यार्थी आणि पालक नाराज दिसतात. या बदललेल्या मानसिकतेमुळे शिक्षणाचा खरा उद्देशच कुठेतरी हरवत चालल्याचं चित्र दिसत आहे.
पूर्वी शिक्षण म्हणजे ज्ञान, संस्कार आणि जीवन समजून घेण्याचं माध्यम मानलं जायचं. आज मात्र शिक्षणाचं रूपांतर टक्केवारीच्या शर्यतीत झालं आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेपेक्षा त्यांच्या मार्कशीटवरील आकड्यांना अधिक महत्त्व दिलं जात आहे. परिणामी, मुलांवर लहान वयातच प्रचंड मानसिक ताण निर्माण होत आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत अभ्यास, कोचिंग क्लासेस, टेस्ट सिरीज आणि स्पर्धेच्या दडपणाखाली अनेक विद्यार्थ्यांचं बालपण हरवत चाललं आहे.
आज गुणांची वाढलेली टक्केवारी पाहिली, की परीक्षा पद्धतीबद्दलही प्रश्न निर्माण होतात. ९८ ते १०० टक्के गुण सहज मिळताना दिसतात. अर्थात, आजच्या विद्यार्थ्यांकडे माहिती आणि तंत्रज्ञानाची अधिक साधने उपलब्ध आहेत; पण त्याचबरोबर वस्तुनिष्ठ प्रश्न, कोचिंग संस्कृती आणि सैल मूल्यमापन यामुळेही गुणांची संख्या वाढत असल्याचं वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळे “गुण” आणि “गुणवत्ता” यामधील फरक कमी होत चालला आहे.
खरं तर, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसं नसतं. व्यवहारज्ञान, संवादकौशल्य, निर्णयक्षमता, सर्जनशीलता आणि संकटांशी लढण्याची ताकद या गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात. इतिहासात अनेक अशी उदाहरणं आहेत, ज्यांनी शालेय जीवनात फार मोठे गुण मिळवले नव्हते; पण त्यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजात वेगळं स्थान निर्माण केलं. त्यामुळे मार्कशीट ही माणसाच्या बुद्धिमत्तेचं अंतिम मोजमाप असू शकत नाही.
आजची सर्वात मोठी गरज म्हणजे शिक्षणाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची. प्रत्येक विद्यार्थी सारखा नसतो. प्रत्येकामध्ये वेगवेगळी क्षमता आणि कौशल्य असतात. त्यामुळे केवळ टक्केवारीच्या आधारावर विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणं चुकीचं आहे. शिक्षणाने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे, त्यांना विचार करायला शिकवलं पाहिजे आणि चांगला माणूस घडवलं पाहिजे.
दहावी-बारावीच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक नक्कीच व्हावं; पण कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही कमी लेखू नये. कारण शेवटी, आयुष्याचं गणित हे फक्त मार्कांच्या आकड्यांवर चालत नाही. संघर्ष, मेहनत, अनुभव आणि आत्मविश्वास या गोष्टीच माणसाला खऱ्या अर्थाने यशस्वी बनवतात. त्यामुळे टक्केवारीच्या या अंध शर्यतीत हरवत चाललेलं शिक्षण आणि बालपण वाचवणं ही आज समाजाची मोठी जबाबदारी बनली आहे.
प्रा गणेश पोकळे
संपादक