
ग्रीन बेल्ट पट्यात युसुफ वडगावला अभुतपुर्व सभा, पंकजा माझी बहिण, मतदानरूपी आशिर्वाद देवुन दिल्लीला पाठवा..!
योग्य त्या माणसाला मतदान दिले तर विकास होवु शकतो, गोपीनाथ मुंडे माझ्या काळजात, त्यांच्या आशिर्वादानेच मी इथे उभा..!
चुकीचा निर्णय घेवु नका, भावी पिढीच्या भाग्यासाठी मतदान कमळाला करा-छत्रपती उदयनराजे भोसलेंचे आवाहन..! ( प्रतिनिधी )
बीड लोकसभा मतदारसंघातुन पंकजाताई मुंडेंना विजयी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयन महाराज भोसले खास साताऱ्याहुन बीडात आले. युसुफ वडगाव ता.केज अर्थात ग्रीन बेल्ट पट्यात त्यांनी जाहिर सभा घेत पंकजा माझी बहिण, त्यांना प्रचंड मतदान करून दिल्लीला पाठवा, एक निर्णय चुकला तर विकासाच्या दृष्टीने पिढ्यानपिढ्या बर्बाद होतात. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार येणार,त्यांच्या सोबतीला तुम्ही जर पंकजाताईला पाठवलं तर या जिल्ह्याचा नंबर एकचा विकास होईल. कारण त्यांचं कर्तृत्व आणि नेतृत्व मोठं असुन सामाजिक कामात जातपात पाहणारं कुटुंब नाही हा विश्वास मी तुम्हाला देतो. मला आई-वडिलांनी जन्म जरी दिला असला तरी आयुष्यात स्व.गोपीनाथराव मुंडेंचं येणे माझ्यासाठी नशिब असुन त्यांच्या आशिर्वादानेच मी इथे उभा असल्याचे आठवणी काढत स्वत:च्या आश्रुला रोखु शकले नाहीत. कोण काय बोलतं? याकडे लक्ष्य न देता बिनधास्त आपल्या लेकराच्या भवितव्यासाठी बहिण पंकजाताईला प्रचंड मतदान करा असे आवाहन त्यांनी केले.
या मतदारसंघाचा प्रचाराचा शेवटचा दिवस केज तालुक्यात युसुफ वडगाव येथे जाहिर सभेने झाला. हेलिकॉप्टरने छत्रपती उदयनराजे महाराजांचं गावात आगमन होताच उघड्या जीपमधुन भव्य मिरवणुक काढण्यात आली. व्यासपीठावर उमेदवार पंकजाताई मुंडे, पालकमंत्री धनंजय मुंडे, खा.डॉ.प्रितमताई मुंडे, माजी मंत्री संभाजीराव निलंगेकर, आ.नमिताताई मुंदडा, किरण पाटील, रमेशराव आडसकर, नंदकिशोर मुंदडा, लातुरचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, बब्रुवान खंदाडे, प्रवक्ते राम कुलकर्णी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सुरूवातीला लोकसभेची निवडणुक लढवणारे ओबीसी बहुजन संघाचे यशवंत गायके यांनी निवडणुकीत माघार घेत पंकजाताई मुंडेंना पाठिंबा दिला. सोबत माधवराव निर्मळ होते. शरद पवार गटाचे डॉ.उत्तम खोडसे यांनी असंख्य कार्यकर्त्यासह अजितदादाच्या गटात मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. उपस्थित जनसमुदायाच्या समोर बोलताना बीडात कोण काय बोलतंय?याकडे लक्ष्य देवु नका. तुम्ही सारे सज्ञान मतदार आहात. आलेली संधी आणि वेळ कुणासाठी थांबत नाही. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा येणारच. त्यावेळी आपल्या लेकराचं भाग्य असेल किंवा पुढील पिढीचं भाग्य घडवायचं असेल तर खर्या अर्थाने चुकीचा निर्णय घेवु नका.एक निर्णय चुकलात तर पिढी बर्बाद होवु शकते असं सांगत त्यांनी पंकजाताई मुंडेंना मतदान करण्याचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजाला कुटुंब मानलं. समतेचा विचार दिला. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवुन गोपीनाथ मुंडेंनी गरिबांसाठी आयुष्य झिजवलं. माझ्या जीवनात त्यांचे स्थान पित्यासमान असुन आपल्या घरी त्यांचा फोटो लावल्याचंही त्यांनी आवर्जुन सांगितलं. मुंडे कुटुंब राजकारणात काम करताना अठरापगड जातीधर्माचे लोक कुटुंबासारखेच धरतात. पंकजाताई यांचं राजकारण तसंच असुन कर्तबगारी मोठी आहे. आपले लेकरं मोठे होतील. भावी पिढीला विकास महत्वाचा असतो. त्यासाठी जातीपातीच्या अफवाला बळी न पडता जिल्ह्याच्या भाग्यासाठी माझी बहिण पंकजाला निवडुन द्यावे असे आवाहन त्यांनी केले. गोपीनाथराव मुंडे यांनी सत्ता चालवताना जात पाहिली असती तर पश्चिम महाराष्ट्राला बारा हजार कोटी रूपये खर्च करून मिळालेले कृष्णा खोरेचे पाणी कधीच आलं नसतं. माझ्या एका पत्रावर त्यांनी दिल्याचे सांगितलं. त्यामुळे कमळाला मतदान करून पंकजाताईला दिल्लीला पाठवा असे आवाहन त्यांनी केले.
अक्षय मुंदडा :- जाहिर सभेत
प्रास्ताविक करताना युवा नेते अक्षय मुंदडा यांनी आपल्या केज विधानसभा मतदारसंघातुन पंकजाताई मुंडेंना प्रचंड मताधिक्य मिळवुन देण्याची ग्वाही दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघात एक हजार कोटीच्या विकासाच्या योजना आपण अवघ्या दोन वर्षात आणल्याचा उल्लेख त्यांनी केला.
रमेश आडसकर :- हाबाडा देणारच..
बजरंग सोनवणे यांना लोकसभा निवडणुकीत पराभुत करून आम्ही हबाडा तर देणारच कारण पंकजाताई यांचा विजय निश्चित आहे. विरोधक केवळ फेसबुक, व्हॉटसअपवर निवडणुक लढवत असुन जिल्ह्यातील सामान्य जनतेचा पाठिंबा पंकजाताईला असल्याचे आवर्जुन त्यांनी सांगितले. केज मतदारसंघात विक्रमी मतदान मिळवुन देवु हे सांगताना गैरसमज करून घेवु नका. भविष्यकाळाच्या दिशेने आपण पुढे जावु. घाटनांदुर-कुर्डुवाडी रेल्वेमार्ग आपणाला पुर्ण करावयाचा बीड-परळीचा प्रश्न तर मार्गी लागलाच. आता प्रचंड मताने निवडुन देण्याचे आवाहन केले.
संभाजी निलंगेकर..
लातुर जिल्ह्याचे नेते माजी मंत्री संभाजी निलंगेकरांनी सभेत बोलताना सांगितले की, स्व.गोपीनाथराव मुंडेंनी जातीपातीचं राजकारण केलं असतं तर लातुरच्या राजकारणात आमचा उदय झालाच नसता. मराठा नेतृत्वाला राजकिय ताकद देण्याचे काम त्यांनी केले. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मराठा बांधवांना दहा टक्के आरक्षण मंजुर केले. हे टिकणारे असुन मतदारांनी जातीपातीच्या आमिषाला बळी न पडता पंकजाताईला विजयी करण्याचे आवाहन केले.
पालकमंत्री धनंजय मुंडे :- बहुरंगाला ग्रामपंचायत जिंकता आली नाही..!
या सभेला आवाहन करताना पालकमंत्री धनंजय मुंडेंनी केज तालुक्यातुन रेकॉर्ड ब्रेक मतदान पंकजाताईला मिळेल विश्वास देताना जात-पात धर्माच्या नावाने मते मागणार्या विरोधी उमेदवाराचा बहुरंग उमेदवार उल्लेख करत ज्यांना गावच्या ग्रामपंचायतीत आपल्या मुलीला निवडुन आणता आलं नाही असं सांगत शरदचंद्र पवाराची मराठा आरक्षणात नेमकी भुमिका काय त्यांनी जाहिर करावं अशी मागणी केली.
जनतेने निवडणुक हाती घेतली, विजय निश्चित, काटा मारून कारखाना चालवण्याचं पाप मी कधी केलं नाही- पंकजाताई मुंडे
छत्रपती उदयनराजे महाराज माझ्यासाठी जिल्ह्यात आले. खर्या अर्थाने भाग्य असुन त्यांची प्रकृती ठीक नसतानाही इथे येवुन गेले जोपासलेले कौटुंबिक नाते जातीपातीच्या नव्हे तर रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. वैद्यनाथ कारखाना येत्या दसर्याला मी चालु करणारच. पण कारखाने चालवताना काटा मारून शेतकर्यांच्या पोटाला चिमटा घेण्याचे पाप मी कधी केलं नसल्याचा जबरदस्त टोला त्यांनी मारला.उपस्थितांनी टाळ्यांचा पाऊसच पाडला. माझा विजय तर निश्चित आहे. पण तुम्ही विजयी गुलालाचे साक्षीदार व्हा असे आवाहन करत त्यांनी महाराजांचे विशेष आभार मानले.