
पतंजली फसव्या जाहिरात प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. पतंजलीने सुप्रीम कोर्टाला सांगितले की, त्यांनी ६७ वर्तमानपत्रांमध्ये जाहीर माफी मागितली आहे. येत्या काळात आणखी मोठ्या आकाराची जाहिरात प्रसिद्ध होईल, असे पतंजलीकडून न्यायालयामध्ये सांगण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाने या सुनावणीची व्याप्ती वाढवली आहे.
हे प्रकरण फक्त एका संस्थेपुरते म्हणजे पतंजलीपुरते मर्यादित राहणार नाही, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. दिशाभूल करणा-या जाहिरातींद्वारे उत्पादनांची विक्री करून लोकांच्या आरोग्याशी खेळणा-या इतर कंपन्यांवर काय कारवाई केली? असा न्यायालयाने केंद्र सरकारला सवाल केला आहे.
अॅलोपॅथी डॉक्टर त्यांच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये विशिष्ट ब्रँडची महागडी औषधे का लिहून देतात? असा सवाल न्यायालयाने इंडियन मेडिकल असोसिएशनला केला आहे. जाणूनबुजून महागडी औषधे लिहून देणा-या डॉक्टरांची नोंदणी रद्द करण्याची तरतूद आहे का? अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला केली आहे.