बीड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा इतिहास हा सामाजिक समतेचा आणि सर्वसमावेशकतेचा प्रेरणादायी आदर्श मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभारताना कोणत्याही जाती-धर्माचा भेदभाव न करता सर्वांना समान संधी दिली.
शिवरायांच्या सैन्यात विविध धर्म आणि समाजघटकांतील सैनिक कार्यरत होते. प्रशासनातही गुणवत्तेला प्राधान्य देत विविध समाजातील लोकांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. त्यांनी सर्व जाती-धर्मांतील लोकांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. असे प्रतिपादन प्रा. पंजाब येडे यांनी केले. येथील वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थाध्यक्ष रमेश भाऊ पोकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून हनुमान मुळीक, बालूशेठ लाटे, सचिव प्रा. गणेश पोकळे,प्रशासकीय अधिकारी प्रा. बप्पासाहेब हावळे,प्र. प्राचार्य रफिक सय्यद हे उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा. येडे म्हणाले की, शिवरायांच्या राज्यकारभारात न्याय, शिस्त आणि सर्वधर्मसमभाव यांना विशेष महत्त्व होते.
मंदिरांप्रमाणेच मशिदी आणि इतर धार्मिक स्थळांचे रक्षण करण्याचे आदेश देऊन त्यांनी धार्मिक सहिष्णुतेचा आदर्श घालून दिला. त्यामुळे शिवरायांचे स्वराज्य हे केवळ राजकीय स्वातंत्र्याचे नव्हे, तर सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरले.
आजही शिवरायांच्या कार्यातून समाजात एकात्मता, बंधुता आणि समानतेचा संदेश मिळतो. शिवरायांनी स्त्रीयांना विशेष सन्मान दिला असे ही प्रा. येडे म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना रमेश पोकळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यकारभार स्वच्छ आणि पारदर्शक होता. स्वराज्य निर्माण करण्यामध्ये सर्व घटकांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. शिवरायांचे विचार मोलाचे आहेत. शिवरायांचे विचार अंगीकृत करत आपण वाटचाल करावी. असे पोकळे म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बप्पासाहेब हावळे यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. अतुल रसाळ यांनी केले. शेवटी आभार प्रा. रफिक सय्यद यांनी मानले. कार्यक्रमाला प्र. प्राचार्या कोमल सुरवसे, प्रा. सुहास गाढवे, प्रा. सय्यद अफरोज, दिपक जाधव, मंगेश खराडे, शंकर इंगोले, संध्या पोकळे, सचिन चौरे यांच्या सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
