बीड , तंत्रज्ञान आणि पत्रकारिता या अनुषंगाने आगामी कालखंडात उपसंपादक, वार्ताहर यांच्यासाठी ए आय ही साधने अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. बातमी लेखन संपादन भाषांतर आणि लेख लिहिण्यासाठी व छायाचित्र संपादन करण्यासाठी अनेक साधने उपयुक्त ठरत असून पत्रकारिता अधिकाधिक समृध्द बनत आहे . त्यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात येणाऱ्या भावी पत्रकारांनी, विद्यार्थ्यांनी या साधनांची ओळख आणि त्यांच्या वापरा विषयी कौशल्य आत्मसात करणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रा. गणेश पोकळे यांनी केले.

येथील वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय येथे जनसंज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागामार्फत ए आय आणि पत्रकारिता व संगणक विभागामार्फत सायबर गुन्हेगारी या विषयावरील ॲड ऑन कोर्सच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य आर डी सय्यद, प्राचार्य कोमल सुरवसे, एमसीजे विभाग प्रमुख प्रा. शिवशंकर पटवारी, प्रा. बप्पासाहेब हावळे यांची विशेष उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे संयोजक प्रा शिवशंकर पटवारी यांनी पत्रकारितेत ए आय चा वापर अनिवार्य बनला असून अनेक मोठी वृत्तपत्र आहे ए आय च्या माध्यमातून बातमी लेखन आणि संपादनाला चालना देत आहेत. त्यामुळे मानवी कामातील गुणवत्तेत वाढ होण्याबरोबरच कमी वेळेत आणि कमी श्रमात अधिक दर्जेदार बातम्या ए आयच्या माध्यमातून वाचकांना देता येऊ शकतात असे प्रतिपादन केले.
सायबर गुन्हे याविषयी बोलताना प्राचार्य आर डी सय्यद यांनी सायबर गुन्ह्यामध्ये युजर गाफील असल्याने आणि नवतंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याचे पुरेपूर ज्ञान नसल्याने तो फसत आहे. शिवाय गुन्हेगारांना ऑनलाइन नेटवर्कच्या माध्यमातून शोधणे कठीण असल्याने सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढत असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अतुल रसाळ यांनी केले तर आभार प्राचार्य कोमल सुरवसे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कोर्सद्वारे पुढील दहा दिवसात विद्यार्थ्यांना ए आय आणि पत्रकारिता याविषयी कौशल्य विकसित करण्यात महत्त्वाचा ठरणार आहे.