
महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला सुटल्याने काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे मातब्बर नेते आणि सांगलीची जागा मविआच्या जागावाटपात काँग्रेसला मिळावी, यासाठी तब्बल तीन महिने प्रचंड धावपळ करणारे आमदार विश्वजीत कदम हे आता काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
कदम यांनी आता आपली भूमिका स्पष्ट करत मविआ उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वजीत कदम हे चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याने विशाल पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. कारण कदम यांची पलूस-कडेगावसह संपूर्ण सांगली जिल्ह्यात चांगली ताकद आहे. पलुस इथे झालेल्या बैठकीविषयी स्वत: चंद्रहार पाटील यांनी आपल्या फेसबुक पेजवरून माहिती दिली आहे. आज खटाव, ब्रम्हनाळ, माळवाडी, भिलवडी ता.पलूस येथे माजी मंत्री विश्वजीत कदम, आ.अरुण आण्णा लाड, महेंद्र लाड, शरद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान बैठक पार पडली