भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण हा आनंद, एकोपा आणि नात्यांच्या दृढतेचा संदेश घेऊन येतो. त्यातही नवरात्री संपल्यानंतर येणारा दसरा हा विजयाचा, शौर्याचा आणि आनंदाचा सण मानला जातो. असत्यावर सत्याचा, अन्यायावर न्यायाचा आणि दुष्टावर सज्जनाचा विजय याचं प्रतीक म्हणजे विजयादशमी. महाराष्ट्रात तर दसरा विशेष थाटामाटात साजरा केला जातो. आपट्याची पानं ‘सोनं’ मानून वाटली जातात, शस्त्रपूजा केली जाते, नवीन कामांना सुरुवात केली जाते. गावागावांत जत्रा भरतात, कुस्त्यांचे आखाडे सजतात, मुलामुलींचा आनंद द्विगुणित होतो. पण, यंदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या घराघरांत हा उत्साह दिसून येत नाही. कारण, पावसाने शेतकऱ्यांची स्वप्नंच उद्ध्वस्त केली आहेत.
मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशासह राज्यातील अनेक भागांत यंदा पावसाने कहर केला. कधी पाऊस कमी तर कधी अती असा विरोधाभासी अनुभव शेतकऱ्यांनी घेतला. मुसळधार पावसामुळे खरीप हंगाम धुळीस मिळाला. कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, तूर यासारखी लाखो हेक्टरवरची पिकं वाहून गेली. शेतकऱ्यांच्या घरात आनंदाचे किरण डोकावण्याआधीच निसर्गाने पुन्हा एकदा घाला घातला. काही भागात पावसाने पेरणी करु दिली नाही, तर काही ठिकाणी उभं पीक पाण्यात बुडून गेलं. शेतकऱ्याच्या डोळ्यातलं सोनेरी स्वप्न चुरगळलं गेलं आणि विजयादशमीचा उत्सव त्याच्यासाठी काळोख घेऊन आला.
गावोगाव दसर्याची तयारी सुरू आहे. काही ठिकाणी रावणदहनाची रंगीत तालीम होतेय, तर काही ठिकाणी सोनं वाटण्यासाठी आपट्याची झाडं सजली आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या घरात मात्र शांतता आहे. सोनं घ्या, सोनं द्या, वर्षभर सुवर्ण व्हा, असे शुभेच्छापर शब्द ते एकमेकांना देतात खरे; पण मनात एक प्रश्न कुरतडत राहतो – “सोनेरी दिवस आमच्या घरी कधी येणार?” एकीकडे मुलं जत्रेतल्या खेळण्यांकडे बोट दाखवत आहेत, आणि दुसरीकडे आई-वडील हताश चेहऱ्याने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण घरातल्या रिकाम्या धानाच्या कोठाराने, पिकांच्या नुकसानीने आणि वाढत्या कर्जाने त्यांचा सणाचा आनंद हरवून टाकला आहे.
शेतकऱ्यांसाठी दसरा म्हणजे फक्त धार्मिक किंवा सांस्कृतिक महत्त्वाचा दिवस नाही, तर हा दिवस नव्या आशा, नव्या सुरुवातीचा दिवस मानला जातो. पण यंदा अनेक शेतकरी म्हणताहेत – “आमच्या हातात सोनं नाही, आधार द्या.” ज्या पिकावर वर्षभर मेहनत घेतली, ते पीक काही तासांच्या मुसळधार पावसात वाहून गेलं. उभं पीक गळालं, जमीन पाण्यात साचून राहिली, बियाणं सडून गेलं. शेतकरी दिवसभर शेतात उभा राहून फक्त हताश डोळ्यांनी बुडालेल्या पिकांकडे पाहतो आहे.
या चिंतेत भर घालणारी गोष्ट म्हणजे कर्जाचा वाढता बोजा. आधीच मागच्या वर्षांच्या कर्जाने शेतकरी दबलेला, त्यात यंदाच्या नुकसानीने नवे ओझं त्याच्या खांद्यावर येऊन पडलं आहे. बँकांचे हप्ते, सावकारांचे दडपण, खत-बियाण्याची कमतरता आणि पुढच्या हंगामासाठी आवश्यक भांडवल नाही. त्यामुळे शेतकरी म्हणतो – “विजयादशमी आमच्यासाठी पराभवाची दशमी ठरली आहे.”
सरकारने काही मदतीच्या घोषणा केल्या असल्या तरी प्रत्यक्षात ती मदत शेतकऱ्यांच्या हातात कितपत पोहोचते, हा मोठा प्रश्न आहे. पंचनामे अपुरे होतात, नुकसान कमी दाखवलं जातं, निधी उशिरा मिळतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने दिलासा मिळावा म्हणून तातडीने आणि पारदर्शक मदतीची गरज आहे. तसेच समाजातील संस्थांनी, उद्योजकांनी, स्वयंसेवी संघटनांनी शेतकऱ्यांसाठी पुढे यायला हवे. सोनं वाटण्याची परंपरा पुढे चालू राहो, पण त्या आधी शेतकऱ्यांच्या घरात आनंदाचं आणि समाधानाचं सोनं उतरलं पाहिजे.
दसर्याच्या दिवशी आपण रावणदहन करतो. हा रावण म्हणजे दुष्ट प्रवृत्ती, असत्य आणि अन्यायाचं प्रतीक. आजच्या काळात शेतकऱ्यांच्या जीवनातही एक ‘रावण’ आहे – तो म्हणजे पावसाचं अनिश्चित स्वरूप, कर्जाचा बोजा, बाजारपेठेतील अन्यायकारक दर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारी व्यवस्था. हा रावण जाळून टाकला नाही तर शेतकऱ्यांच्या घरात विजयादशमीचा सूर्योदय कधीच होणार नाही.
शेतकऱ्यांच्या वेदना मांडताना एका वयोवृद्ध शेतकऱ्याने सांगितलं – “पूर्वी दसऱ्याला घरात गोडधोड व्हायचं, मुलांना नवे कपडे घ्यायचो. आता तर घरात दिवा लावायलाही विचार करावा लागतो. सोनं नाही, सोय नाही. पण आमची इच्छा एवढीच – आमच्या श्रमांना योग्य किंमत मिळावी.” त्याच्या या शब्दांत शेतकऱ्याच्या अंतःकरणाची वेदना स्पष्ट जाणवते.
दसर्याचा खरा अर्थ म्हणजे सत्याचा विजय. आज आपण शेतकऱ्याच्या जीवनातील असत्य, अन्याय आणि अडचणींवर विजय मिळवला, तरच दसरा साजरा करण्याला खरी किंमत राहील. नाहीतर दारात रावण जाळून आकाशात फटाके उडवले, तरी शेतकऱ्याच्या घरातील काळोख कायम राहील.
म्हणूनच या वर्षीच्या दसऱ्याला समाजाने एक संकल्प करावा – “शेतकऱ्याच्या चिंतेचा रावण जाळू, त्याच्या घरात आनंदाचं सोनं आणू.” सोन्याच्या पानांसारखा हा संदेश प्रत्येकाच्या मनात रुजला तरच दसऱ्याचा सण खर्या अर्थाने पूर्ण होईल. विजयादशमीचा जयघोष होईल, पण त्यात शेतकऱ्याचा जयघोष सामावला तरच आपल्या सणाचं खऱ्या अर्थाने सोनं होईल.
