
इंदौर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अक्षय कांती बम यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. एवढेच नाही तर अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनीच ही माहिती दिली.
विजयवर्गीय यांनी अक्षय बम यांच्यासोबतचा एक सेल्फी सोशल मीडियात शेअर करत काँग्रेसवर बॉम्ब टाकला आहे. तसेच त्यांनी म्हटले आहे की,इंदौरमधील काँग्रेसचे लोकसभा उमेदवार अक्षय कांती बम यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री मोहन यादव आणि प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये स्वागत आहेइंदौर मतदारसंघातील निवडणुकीसाठी 25 एप्रिलपर्यंत अर्ज भरण्यात आले होते. अर्ज मागे घेण्याची मुदत 29 एप्रिल आहे. आज शेवटच्या दिवशी बम यांनी उमेदवारी अर्ज घेत काँग्रेसला धक्का दिला.