यावेळी मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना खोचक शब्दांत टोला लगावला. “देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांविषयी खूपच प्रेम आहे. माता-माऊलींवर गोळ्या घालणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी बढती दिली आहे.
पोलिसांच्या माध्यमातून चार महिन्यांपूर्वीचे गुन्हे अगदी कालपर्यंत दाखल करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे ते गृहमंत्री म्हणून शाबासकी देण्यासारखे आहेत”, असं ते म्हणाले. चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. येत्या ४ जूनपर्यंत अर्थात लोकसभा निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत जर सरकारनं मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही,
तर आपण पुन्हा उपोषण करू, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. त्याशिवाय, आम्ही विधानसभा निवडणुकीत उतरू आणि सरकारचा करेक्ट कार्यक्रम करू, असं विधानही त्यांनी केलं आहे.
“मी अजूनही गृहमंत्र्यांना सांगतो. तुम्ही माझ्या नादाला लागू नका. मी निष्ठावान आहे. मी माझी जात विकू शकत नाही. तुम्ही माझ्या नादी लागू नका. मला तुम्ही आंदोलनात हलक्यात घेतलं होतं.
मला राजकारणात हलक्यात घेऊ नका. मला तिकडे जायचं नाहीये. पण मला राजकारणात ओढायचा प्रयत्न केला, तर तुमचा कायमचा कार्यक्रम लागेल. दलित,मराठा, मुस्लीम, लिंगायत, बारा बलुतेदार असे सगळे आम्ही एकत्र येणार आहोत. यांनी दोन उपमुख्यमंत्री केले, आमचे सात होऊ द्यात. होऊ द्या सगळ्यांचे एकेक”, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटलांनी विधानसभेसंदर्भात सूचक विधान केलं आहे.