आजच्या राजकारणात आणि समाजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे सोपे नाही. विशेषतः कोणताही राजकीय वारसा नसताना, केवळ स्वकर्तृत्व, जिद्द, अभ्यासू वृत्ती आणि लोकांशी असलेली नाळ यांच्या बळावर नेतृत्व निर्माण करणे हे निश्चितच असामान्य असते. बीड जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, सहकार आणि उद्योग क्षेत्रात आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे आदरणीय रमेशभाऊ पोकळे.
आज त्यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यप्रवासाचा मागोवा घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते—सामान्य शेतकरी कुटुंबातून सुरू झालेला हा प्रवास आज हजारो लोकांच्या विश्वासाचे नेतृत्व बनला आहे.
रमेशभाऊ पोकळे यांचा जन्म बीड तालुक्यातील चांदेगाव येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. वडील श्री. शिवदास नामदेव पोकळे आणि आई सौ. अंजूबाई शिवदास पोकळे यांनी अत्यंत कष्टाने संसार उभा केला. ग्रामीण जीवनातील संघर्ष, कष्ट आणि मूल्याधिष्ठित संस्कार याच वातावरणात रमेशभाऊ घडले. “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी” या उक्तीप्रमाणे आई-वडिलांकडून मिळालेले संस्कार त्यांच्या संपूर्ण कार्यप्रवासात दिसून येतात.
त्यांचे प्राथमिक शिक्षण केज येथे, माध्यमिक शिक्षण पाटोदा येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण लातूर येथे झाले. पुढे उच्च शिक्षणासाठी ते बीड येथील बलभीम महाविद्यालयात आले आणि याच काळात त्यांच्या सार्वजनिक जीवनाची खरी सुरुवात झाली. १९९५ पासून विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलने, मोर्चे आणि संघटनात्मक कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. उत्कृष्ट वक्तृत्वशैली, अभ्यासपूर्ण मांडणी आणि प्रभावी संवादकौशल्य यामुळे ते लवकरच विद्यार्थी चळवळीतील ओळख बनले.
याच काळात कै. अण्णासाहेब पाटील यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी मराठा महासंघाच्या माध्यमातून कार्य सुरू केले. समाजातील प्रश्न समजून घेताना त्यांनी अनेक जिवलग सहकारी आणि मित्र जोडले. त्यांच्या संपर्कात आलेली माणसे आजही त्यांच्याशी निष्ठेने जोडलेली दिसतात. यामागचे कारण म्हणजे त्यांचा साधा, नम्र, संयमी आणि सर्वांना आपलेसे करणारा स्वभाव. लोकांशी आदराने वागणे आणि प्रत्येक व्यक्तीशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणे हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद ठरली.
समाजकारणातून पुढे त्यांची राजकारणात एंट्री झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी बीड जिल्हा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले. याच दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतून ते सिनेट सदस्य म्हणून निवडून आले. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात काम करताना त्यांचा संपर्क तत्कालीन आमदार वसंतराव काळे साहेब यांच्याशी आला. पुढे मराठवाडाभर विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्नांवर काम करताना त्यांच्यात विश्वासाचे दृढ नाते निर्माण झाले.
विद्यापीठ क्षेत्रातील त्यांची कारकीर्द विशेष उल्लेखनीय राहिली आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न, प्राध्यापकांचे प्रश्न, शुल्कवाढ, वसतिगृह सुविधा, विद्यापीठ प्रशासनातील अडचणी अशा विविध विषयांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला. विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात त्यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक विषय प्रभावीपणे मांडले.
शिक्षण हा रमेशभाऊंच्या जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय मानले जाते. पूर्वी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र घेण्यासाठी औरंगाबाद येथील विद्यापीठात जावे लागायचे. अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे याचा त्रास सहन करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन त्यांनी २००९-१० मध्ये विद्यापीठ सभागृहात महत्त्वाचा ठराव मांडला. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला.याच पुढाकारातून त्यांनी “पदवी प्रमाणपत्र मोफत घरपोच अभियान” राबविले. सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांना मोफत पदवी प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे अभियान अत्यंत दिलासादायक ठरले.





कंत्राटी प्राध्यापकांच्या प्रश्नांवरही त्यांनी ठाम भूमिका घेतली. शेकडो कंत्राटी प्राध्यापकांना सोबत घेऊन त्यांनी विद्यापीठ परिसरात आमरण उपोषण केले. तत्कालीन कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी स्वतः हस्तक्षेप करून हे उपोषण सोडविले. प्राध्यापकांचे अनेक प्रश्न यामुळे मार्गी लागले.
शिक्षणासोबतच सहकार आणि कृषी क्षेत्रातही रमेशभाऊंचे काम उल्लेखनीय राहिले आहे. गावच्या सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी अनेक गरजू शेतकऱ्यांना पीककर्ज, दुधाळ जनावरे आणि विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
शेती हा देशाचा कणा आहे, या विचारातून त्यांनी कृषी क्षेत्रात अनेक उपक्रम राबविले. नाबार्डच्या माध्यमातून शेतकरी गट स्थापन करून आधुनिक शेतीसाठी आवश्यक साधने उपलब्ध करून दिली. सिंचन योजना, पीककर्ज आणि शेतीसाठी आवश्यक सुविधा ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
चांदेगाव परिसरातील शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आलेले ३३ केव्ही वीज उपकेंद्र हे त्यांच्या विकासदृष्टीचे महत्त्वाचे उदाहरण मानले जाते. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना उच्च दाबाने वीज उपलब्ध होऊन शेती उत्पादनात सकारात्मक बदल झाला. महिलांसाठी बचत गटांची स्थापना करून त्यांनी ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही चालना दिली.
२००९ मध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. बीड लोकसभा निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. पुढे भाजप विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आणि नंतर भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावी काम केले. सलग दोन वेळा जिल्हाध्यक्षपद सांभाळताना त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले.
गोपीनाथराव मुंडे यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. पुढे पंकजाताई मुंडे यांच्यासोबतही त्यांनी विविध क्षेत्रात काम केले.
सामाजिक आणि राजकीय कार्यासोबतच धार्मिक व तीर्थक्षेत्र विकासामध्येही त्यांनी योगदान दिले आहे. मोरेश्वर तपोवन, कोळवाडी, भालचंद्र गणेश मंदिर लिंबागणेश, काशेश्वरी देवस्थान तसेच वनगाव येथील संत तुकाराम महाराज देवस्थान परिसरातील विकासकामे त्यांच्या माध्यमातून झाली. भक्तनिवास, घाट, सुशोभीकरण आणि परिसर विकास यांसारख्या कामांमुळे या तीर्थक्षेत्रांना नवी ओळख मिळाली.
दरम्यानच्या काळात त्यांनी पुणे येथे रिअल इस्टेट क्षेत्रात प्रवेश केला. आज पुण्यात त्यांनी विश्वासार्ह उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. गृहनिर्माण क्षेत्रात अनेक दर्जेदार प्रकल्प उभारून त्यांनी अनेक कुटुंबांच्या घरांच्या स्वप्नांना आकार दिला आहे.
आजपर्यंत समाज, शिक्षण, कृषी, सहकार, उद्योग आणि विकासाच्या माध्यमातून रमेशभाऊंनी केलेले कार्य अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. सामान्य कुटुंबातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज विकासदृष्टी, लोकसंपर्क आणि कार्यक्षम नेतृत्वाचे उदाहरण बनला आहे.
त्यांचे नेतृत्व, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि विकासाची सकारात्मक दृष्टी अशीच वृद्धिंगत होत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आदरणीय रमेशभाऊ पोकळे यांना ५० व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रा बप्पासाहेब हावळे