सध्या सोशल मीडियावर ‘घिबली फोटो ट्रेंड’ झपाट्याने लोकप्रिय होत आहे. वापरकर्ते आपल्या फोटोंना Studio Ghibli या प्रसिद्ध जपानी अॅनिमेशन शैलीत बदलवून शेअर करत आहेत. हे फोटो एआयच्या साहाय्याने तयार केले जातात, जे कार्टूनसदृश, सुंदर व भावनात्मक भासतात. मात्र, हा ट्रेंड शहरापुरता मर्यादित न राहता हळूहळू ग्रामीण भागातही पोहोचू लागला आहे.
महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये हा ट्रेंड उत्सुकतेने पाहिला जात आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वाढता प्रसार यामुळे तरुण पिढी Instagram व WhatsApp च्या माध्यमातून या नव्या तंत्रज्ञानाशी जुळू लागली आहे. काही जण हे फोटो बघून अचंबित होत आहेत, तर काही जण त्यामागील तांत्रिक प्रक्रियेबाबत प्रश्न विचारू लागले आहेत.
तथापि, ग्रामीण भागात माहितीचा अभाव असल्यामुळे या ट्रेंडबद्दल काही शंका आणि भीती देखील निर्माण झाली आहे. अनेक जण AI तंत्रज्ञानामधून तयार होणाऱ्या प्रतिमांचे भविष्यातील परिणाम, गोपनीयता आणि गैरवापर याबाबत चिंतेत आहेत. इंटरनेटवर फोटो अपलोड केल्यावर तो कोणाकडे जातो, याची निश्चित कल्पना नसल्यामुळे गावकऱ्यांमध्ये सावधगिरीचं वातावरण आहे.
स्थानिक शाळांमधील शिक्षक आणि संगणक प्रशिक्षण केंद्रांतून AI बाबत जनजागृती करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. काही स्वयंसेवी संस्था यासाठी मोफत कार्यशाळा घेत आहेत.
या ट्रेंडमुळे ग्रामीण भागात सर्जनशीलतेबरोबरच डिजिटल साक्षरतेच्या गरजांवरही लक्ष केंद्रित झालं आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक विचार यामधील हा संगम ग्रामीण भारताच्या भविष्याचे प्रतिबिंब ठरतो.

आदिती डावकर
बी ए एम सी जे