छत्रपती संभाजीनगर, दि.७ : गेल्या तीन दिवसापासून तरुणाईच्या उपस्थिती बहरून गेलेल्या केंद्रीय युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप झाला. अभिनेत्री नम्रता संभेराव व पार्श्वगायक रवींद्र खोमणे यांनी सादर केलेल्या गाणी व डायलॉगबाजीने युवा कलावंतांचा सगळा शीणच नघून गेला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सवाचा समारोप विद्यापीठाच्या नाटयगृहात बुधवारी (दि.सात) झाला. कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते. महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभास ’महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम अभिनेत्री नम्रता संभेराव व विद्यापीठाचे माजी विद्यार्थी तथा पार्श्वगायक रवींद्र खोमने यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते, व्यवस्थापन परिषद सदस्य अॅड.दत्तात्रय भांगे, डॉ.अपर्णा पाटील, कुलसचिव डॉ.संजय कवडे, संचालक डॉ.कैलास अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. महोत्सवात चार रंगमंचावर २८ कलाप्रकार सादर झाले. विजेत्या संघाना पारितोषिक वितरण करण्यात आले. या महोत्सवात युवा कलावंतांनी दाखविलेल्या उत्साह वाखण्याजोगा होता, असे प्रास्ताविकात प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते यांनी सांगितले. तसेच संघ प्रमुख डॉ.रवींद्र भोरे, कलावंत पुजा हादगुले व आदित्य दराडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी डॉ.गणेश शिंदे यांनी दिग्दर्शत केलेली ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली.डॉ.प्रेषित रुद्रवार यांनी सूत्रसंचालन तर डॉ.कैलास अंभुरे यांनी आभार मानले. तर पारितोषिकांचे वाचन डॉ.किशोर शिरसाठ व डॉ.समाधान इंगळे यांनी केले.
आपली भाषा, आपला अभिमान : नम्रता संभेराव
आपण ज्या भूमीतून आलो ती माती, संस्कृती आणि भाषा याचा अभिमान बाळगा. तसेच बोलतानाही नियमित त्याच भाषेच्या वापर करा. आपली भाषा-हाच आपला अभिमान आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री नम्रता संभेराव यांनी केले. आपण नाटयशास्त्र केले नाही मात्र युवक महोत्सव आणि कला, सांस्कृतिक स्पर्धामधून जडण घडण झाली, असेही त्यांनी सांगितले.
मोठी लढाई लढू रं गडया : रवींद्र खोमणे
आयुष्य म्हटले की संघर्ष आलाच. जीवनात मोठं व्हायचे म्हणजे ’मोठी लढाई’ असते. ’मोठी लढाई लढू रे गडया’ या गाण्यामुळे लोकप्रिय झालेल्या पार्श्वगायक व विद्यापीठाचे माजी विद्यार्थी रवींद्र खोमणे यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना संदेश दिला. विद्यापीठाच्या संगीत विभागाने दिलेली ऊर्जा व पंडित नाथराव नेरळकर यांच्या मार्गदर्शनामुळे आपण नावारुपाला येऊ शकलो, असेही ते म्हणाले. युवक महोत्सवात भजन स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले मात्र यावेळी पाठ केलेला अभन्ग विसरल्याने दुसराच गायला, याची सजा म्हणून विद्यापीठापासून कांचनवाडीतील घरापर्यंत पायाी चालत गेलो होतो, असा किस्साही त्यांनी सांगितला. पहाडी आवाजात त्यांनी ‘मोठी लढाई लढू रे गडया’ या गीताचा ठेका कलावंतांनीही धरला. त्यांनी गायलेल्या गाण्याच्या ओळी ..
मोठी लढाई रं लढू मातीसाठी रं, गड्या
मनगटाचं जोर लावून…
दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज
दिवा तेवू तेज दाव रं…
तू आभाळ-आभाळ वादळ तुझं तू, राजा
आस्मानीचं बळ दाव जी..
मनाशी ध्यास घेऊन आज, तुडव वाट तू
झोकून दे रं तुझं तू सारं, तुडव वाट तू
धकधकता श्वास आता बेभान पेटू दे
पडू दे पाऊल पुढं…
कलाही विनेयनचं शोभते : मा.कुलगुरु
’विद्या विनयेन शोभते’ म्हटले जाते. त्याप्रमाणेच कलावंत हा देखील विनयशील आणि नम्रच असला पाहिजे, असे कुलगुरु डॉ.विजय फुलारी म्हणाले. गेल्या तीन वर्षात महोत्सवात वाढलेले मुलींचे प्रमाण व ग्रामीण विद्यार्थांचा मोठा सहभाग हे यश आहे, असेही ते म्हणाले. युवक कलावंताना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी सांस्कृतिक समन्वयक म्हणून गौतम सोनवणे यांची नेमणूक केली आहे. विद्यापीठ व महाविद्यालयातील विद्यार्थीयांना सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
लॉलीला भेटली ‘प्रतिलॉली’
महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील ‘’लॉली’च्या भुमिकेतून नम्रता संभेराव यांचे काम आणि नाव सातासमुद्रापार पोहचले. यावेळी नम्रता संभेराव यांनी ’लॉली’चे विविध डायलॉग ऐकवून उपस्थितांची माने जिंकली. युवक महोत्सवात परळी येथील लक्ष्मीबाई देशमुख महाविद्यालयाच्या मानसी लोभाजी आलाट या विद्यार्थीनीने ’लॉली’चा संवाद सादर केला , हे माहित झाल्यावर नम्रता संभेराव यांनी या विद्यार्थीनीला रंगमंचावर बोलावून घेतले. यानंतर या दोघींनी जुगलबंदी चांगलीच रंगली उपस्थितांनी हशा-टाळ्यांची दाद देत आनंद घेतला.