
इस्रायलचं गाझापट्टीत यापूर्वीच युद्ध सुरु असल्यानं आता दोन आघाड्यांवर इस्त्रायलला लढावं लागणार आहे. दरम्यान इराण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे.
इराण आणि इस्रायल यांच्यात अखेर युद्धाचा भडका उडाला आहे. इस्रायलने सीरियात इराणच्या दुतावासावर हल्ला केला होता.
या कृतीचा बदला घेण्यासाठी शनिवारी रात्री इराणने इस्रायलवर तब्बल २०० क्षेपणास्त्र डागली. ड्रोन हल्लाही केला. मात्र, त्यातील बहुतांश क्षेपणास्त्रे इस्रायलने हवेतच नष्ट केली असल्याचे इस्रायल लष्करांचं म्हणणे आहे.
हल्ल्यामुळे इस्रायल संरक्षण दलाच्या तळाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्यात आले. इराण आणि इस्रायलमध्ये सुमारे 1800 किलोमीटरचे अंतर आहे.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशन गार्ड कॉर्प्स ने एक निवेदन जारी करुन अमेरिकेलाही इशारा दिला आहे. हा हल्ला एका खास लक्ष्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे. ही लढाई इस्रायलशी आहे. अमेरिकेने त्यापासून दूर राहावे, असं म्हटलं आहे.
दरम्यान, युद्ध आणखी भडकू नये, जगात शांतता नांदावी यासाठी काही देश प्रयत्न करतायेत. इस्त्राईल, इराण या दोन्ही राष्ट्रांना संयम राखण्याचं आवाहन करण्यात येत आहे.