मराठी पत्रकारितेचे दिपस्तंभ- बाळशास्त्री जांभेकर

2017-01-05 15:47:23
     1556 Views

वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो. वृत्तपत्रे समाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. समाजिकीकरण ही एक प्रक्रिया असते. त्याव्दारे लाकांना सामाजिक संकेत, भूमिका, कार्य आणि मूल्य याबाबतचे शिक्षण अव्यहतपणे दिले जाते. असे ए.ए. बेर्जर म्हणतात. महाराष्ट्रात याच विचार धारेवर सुरवातीच्या कालखंडात वृत्तपत्र सुरु झाली. संसद, न्यायसंस्था व कार्यकारी सत्तेनंतर आपल्या लोकशाहीप्रधान देशाचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणा-या वृत्तपत्रांचा भारतात उगम झाला तो १७८० मध्ये. जेम्स ऑगस्टस हिकी यांनी बेंगॉल गॅझेट या नावाने वृत्तपत्र सुरू करून भारतीय वृत्तपत्रसृष्टीचे जनकत्व पत्करले, तर मराठी वृत्तपत्रसृष्टीचा उगम होण्यास त्यानंतर तब्बल ४८ वर्षांचा कालखंड लागला आणि १८३२ मध्ये मराठी वृत्तपत्राचा जन्म झाला. ६ जानेवारी १८३२ या दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या नावाने पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया रचला. म्हणूनच जांभेकरांना मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हटले जाते. व्यासंगी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या जांभेकरांच्या जीवनक्रमाचा इतिहास म्हणजे दैदिप्यमान कारकीर्दीचा सोनेरी प्रकाशच होय. १८१२ ते १८३२ या कालावधीत त्यांनी आपल्या कर्तृत्त्वाची झलक विद्वान प्राध्यापक, ग्रंथकार व संपादक अशा विविध पैलूंनी दाखवून समाजातील अज्ञानरूपी अंधकार वृत्तपत्राच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न केला.
कोकणातील देवगड तालुक्यात असलेल्या पोंभुर्ले या गावी १८१२ मध्ये जांभेकरांचा जन्म झाला. अवघ्या विसाव्या वर्षी, म्हणजेच १८३२ मध्ये त्यांनी दर्पण या नावाने मराठी भाषेत वृत्तपत्र सुरू केले. दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू झाले ६ जानेवारी १८३२ रोजी ते प्रथम पाक्षिक म्हणून. ४ मे १८३२ पासून मराठी, इंग्रजी अशा दोन्ही भाषांत हे वृत्तपत्र प्रकाशित केले जाई. दर्पण म्हणजे आरसा. सद्य:स्थितीचे खरेखुरे दर्शन वृत्तपत्राच्या माध्यमातून घडवून झोपलेल्या समाजाला जागे करणे हाच या नावामागील बाळशास्त्रींचा हेतू होता. यामुळेच दर्पणमधून मुलकी व न्याय खात्यातील अधिका-यांची माहिती, तसेच वैज्ञानिक घडामोडी, स्त्रीशिक्षण, विधवा पुनर्विवाह आदी सामाजिक प्रश्नांवर जहाल लिखाण झाल्याचे आढळते. प्रामुख्याने विधवा पुनर्विवाहाची चळवळच त्यांच्या लिखाणामुळे उभी राहिली. ज्ञानाचा प्रसार समाजाच्या तळागाळापर्यंत झाला पाहिजे आणि हे कार्य दर्पणच्या माध्यमातून केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. १८४० मध्ये त्यांनी दग्दर्शन हे पहिले मराठी मासिक सुरू केले. जांभेकर यांची संपादकीये विचारप्रवर्तक असत. ते सभ्य प्रतिष्ठित भाषेत सरकारवर सडेतोड टीका करत. दर्पण वृत्तपत्र सुरू झाले तेव्हा ब्रिटिशांचे शासन होते आणि वृत्तपत्र नियंत्रण कडक होते ते १८३५ नंतर थोडे शिथील झाले. त्यावेळी साक्षर वर्ग कमी होता. त्यामुळे वाचकांची संख्याही कमी होती. तरीही दर्पणचे त्या काळात तीनशे वर्गणीदार होते. त्या काळात ब्रिटिशांच्या नोकरीत असूनसुद्धा बाळशास्त्री यांनी सरकारला रूचो वा न रूचो, नि:स्पृहपणे विविध सामाजिक विषयांवर दर्पणमधून लेख, अग्रलेख लिहिले ते दूरदृष्टीचे आहेत. दादाभाई नौरोजी आणि भाऊ दाजी लाड यांच्यासारख्या नेत्यांनी याच संस्थांपासून प्रेरणा घेतली. इंग्रज राजवटीतील गव्हर्नर सर जेम्स कर्नाक यांनी बाळशास्त्रींना जस्टिस ऑफ द पीस अशी पदवी दिली, हेच दर्पणचे यश मानले जाते. दर्पणमध्ये वाचकांना महत्त्वाचे स्थान दिले जात होते. वाचकांना मुक्तपणे मनोगत मांडता यावे, यासाठी विशेष प्राधान्य दिले जात असे. विशेष म्हणजे स्तुती करणारी पत्रे यात कधीच छापली जात नव्हती. त्या काळची परिस्थिती, एकूण साक्षरतेचे अत्यल्प प्रमाण व वृत्तपत्रासारख्या नवीन उपक्रमाला पैसे खर्च करून वाचणारे तर अगदीच कमी, तरीही त्या काळी दर्पण समाजातील लोकांना आपलेसे वाटत होते. त्याचा खप चांगला होता. दर्पण आठ वर्षे चालले. २६ जून १८४० रोजी शेवटचा अंक प्रसिद्ध झाला आणि नंतर ते बंद झाले. लोकशिक्षण व समाज प्रबोधन या उद्देशाने सुरू केलेल्या दर्पणचे कार्य उल्लेखनीय असून आधुनिक वृत्तपत्रसृष्टीला आदर्श ठरावे असेच आहे. बाळशास्त्री जांभेकर हे थोर पत्रकारमहर्षी अल्पायुषी ठरले, पण त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस समाजकार्यासाठीच खर्ची घातला.
मराठी वृत्तपत्राचा पाया उभारणा-या बाळशास्त्रींची पत्रकारिता समाज प्रबोधन व लोकशिक्षणाचे ज्ञान देणारे एक विद्यापीठ होते. आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञान विकसित झाले, कालांतराने पत्रकारिता क्षेत्रात मोठे बदल झाले. टी.व्ही. मीडियाच्या काळात वृत्तपत्रांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी विविध पैलूंचा वेध घ्यावा लागत आहे. देशाला आज भ्रष्टाचार, लोकसंख्या वाढ, बेरोजगारी, महागाई अशा विविध गंभीर समस्यांनी ग्रासलेले असताना एक वैभवसंपन्न, बलशाली भारत निर्माण करण्याचे मोठे आव्हान पत्रकारिता क्षेत्रापुढे उभे आहे. आधुनिक पत्रकारिता कशी आहे, हा एक संशोधनाचा विषय ठरेल. तथापि दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू करणा-या बाळशास्त्री जांभेकरांना आधुनिक युगात मोठ्या अभिमानाने दर्पणकार ही पदवी बहाल करण्यात आली आहे. अर्थात दर्पणपूर्वीही काही अनियतकालिके मराठीतून प्रसिद्ध झाल्याचे मानले जाते, परंतु अधिकृत नोंद असलेले दर्पण हेच पहिले मराठी पत्र मानले जाते. त्याच्या प्रतींच्या प्रतिकृती आजही उपलब्ध आहेत.सनातन धर्मातील एकांतिक संन्यास प्रवृत्ती, अंधगुरूभक्ती, कर्मठ कर्मकांडे. चातुर्वर्ण्य, जन्मनिष्ठ उच्चनीचता, जातिभेद, धर्माचा अतिरेक इत्यादींबाबत विचारमंथन दर्पणमधून झाले. स्त्रियांवर लादलेली बंधने, बालविवाह, विधवाविवाह, पारतंत्र्य, केशवपन यांसारख्या गोष्टींमुळे समाजरचना चुकीच्या पायावर उभी आहे . त्यातील दोष काढले नाहीत तर पिढ्यान् पिढ्या ते सर्वांना भोगावे लागेल. त्यातून समाजाचा, धर्माचा, राष्ट्राचा विकास तर होणार नाही, पण शृंखलेमुळे अवनती होईल आणि त्याला पारतंत्र्याचे, गुलामीचे कायम स्वरूप येईल हे जांभेकरांनी दर्पणमधून सांगितले.
दर्पनकार बाळशास्त्री जंभेकरांनी आपल्या कार्याने पत्रकारितेमधील सेवावृत्ताचा, संतुलित समतोल विचारपध्दतीचा, जनहिताचे लिखाण करण्याचा पायंडा पाडला. दर्पणाच्या रुपाने उगवलेल्या बीजांकुराने मराठी वृत्तपत्र सृष्टीचा विशाल असा वटवृक्ष उभा राहीला आहे. त्यामुळे मराठी वृत्तपत्रसृष्टीत एका पेक्षा एक मोठी संपादकांची मालिकाच चालू राहिली आहे.बाळशास्त्री जांभेकर यांनी पश्चिम भारतात द बॉम्बे दर्पण हे सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक आणि साहित्यिक क्षेत्रामध्ये एक आगळावेगळा ठसा उमटवणारे वृत्तपत्र सुरू केले. बॉम्बे दर्पण हे मराठी माणसांच्या भावभावनांना तसेच दैनंदिन जीवनातील घडामोडी, ज्ञान, विज्ञान, शिक्षण त्याचबरोबर सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक विकासास अडथळा आणणार्या घटकांवर कडाडून टीका करणारे पहिले मुखपत्र ठरले, अशी नोंद सापडते.
बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जाने. १८३२ पासून २६ जून १८४० पर्यंत म्हणजे जवळजवळ साडेआठ वर्षे साप्ताहिक दर्पणचे संपादन केले. विशेष म्हणजे देशभक्तीने भारावलेल्या बाळशास्त्रींनी कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता निःस्वार्थी व निरपेक्षपणे दर्पणच्या माध्यमातून समाजसेवा केली. १७ मे १८४६ रोजी त्यांचे निधन झाले आणि ३५ वर्षांच्या अल्पशा कारकीर्दीला पूर्णविराम मिळाला. म्हणूनच ६ जानेवारी हा दिवस मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचा समजला जातो, पत्रकार दिन म्हणून पाळण्यात येतो.प्राचार्य विठ्ठल एडके
वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड
comments