विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या योजना

2016-09-17 21:06:04
     2204 Views

सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी अनेकविध विकास तसेच कल्याणकारी योजना राबविल्या जात असून या योजनांद्वारे दुर्बल तसेच वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या प्रमुख योजनांमध्ये केंद्र आणि राज्य पुरस्कृत पुस्तक पेढी ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेसाठी १२ लाखाचा नियतव्यय मंजूर आहे.

अनुसूचित जाती विद्यार्थ्यासाठी राबविल्या जाणाऱ्या केंद्र राज्य पुरस्कृत पुस्तक पेढी या योजनेच्या (इेज्ञ इरपज्ञ) अटी व शर्तीमध्ये विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी, पशुसंवर्धन, कृषी व तंत्रनिकेतन व्यावसायिक शिक्षण घेणारा असणे आवश्यक आहे. विद्यार्थी अनुसूचित जातीमधील असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु. २ लाखाचा आत असणे आवश्यक आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, पशुसंवर्धन, कृषी व तंत्रनिकेतन अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील व शिष्यवृतीधारक विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांना एक पुस्तक संच देण्यात येतो. ही पुस्तके वैद्यकीय, अभियांत्रिकी, पशुसंवर्धन, कृषी व तंत्रनिकेतन व्यावसायिक महाविद्यालयांना देण्यात येतात.

अनुसूचित जाती विद्यार्थ्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविली जाणारी विद्यार्थ्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजना (ऋीशशडहळ)ि ही एक महत्वाची योजना असून या योजनेसाठी यंदा साडेनऊ कोटीचा नियतव्यय मंजूर आहे. या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये कनिष्ठ, वरिष्ठ व्यावसायिक अभ्यासक्रमातील अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रवेक्षित विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजनेचा लाभ देण्यात येतो. अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादेचे बंधन नाही.

विद्यार्थ्याने ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. तसेच व्यावसायिक महाविद्यालयातील अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांचा प्रवेश हा केंद्रभूत प्रवेश प्रक्रियाद्वारे होणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयांची फी शिवाजी विद्यापीठाने ठरवून दिल्याप्रमाणे देण्यात येते. व्यावसायिक महाविद्यालयांची फी शिक्षण शुल्क समितीने ठरवून दिल्याप्रमाणे देण्यात येत आहे.

व्यावसायिक पाठ्यक्रमांक शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजनाही राबविली जाणार असून या योजनेसाठी यंदा १२ लाखाचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. ही योजना अनुसूचित जाती विद्यार्थ्यासाठी राबविली जात असून योजनेच्या अटी व शर्तीमध्ये व्यावसायिक पाठ्यक्रमात शिकणाऱ्या अनुसूचित जाती, विजाभज व विमाप्र या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना ही सन २०१४-१५ पासून ऑनलाईन करण्यात आलेली आहे.

अटी व शर्ती खालीलप्रमाणे
विद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्तीधारक असावा.
व्यावसायिक पाठ्यक्रमांक शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रथम त्यांच्या महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये प्रवेश घेणे बंधनकारक आहे.
तथापि त्याठिकाणी जर जागा उपलब्ध नसेल तर संबंधित वसतिगृहाच्या अधीक्षकाकडून लेखी प्रमाणपत्र घ्यावे. त्यानंतर शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश दिला जाईल.
जातीचा दाखला आवश्यक आहे.
अनुत्तीर्ण विद्यार्थी त्या वर्षापुरता या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र ठरेल.
स्थानिक विद्यार्थी किंवा स्वत:च्या घरी राहणारा विद्यार्थी या योजनांतर्गत लाभ घेण्यास पात्र असणार नाही.
हा विद्यार्थी शासकीय वसतिगृहात राहतो किंवा कॉलेजच्या वसतिगृहामध्ये राहतो तसेच सदर विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक आहेत का? याची खातरजमा संबंधीत कॉलेजचे प्राचार्य व शिष्यवृत्तीचे काम पाहणाऱ्या लिपीक यांनी करावी.

तसेच त्यानंतरचा ऑनलाईन अर्ज समाजकल्याण विभागाला वर्ग करावा. कॉलेजच्या वसतिगृहात न राहणारे स्थानिक विद्यार्थी व स्वत:च्या घरी राहणारा विद्यार्थी यांचे अर्ज ऑनलाईन प्राप्त झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित लिपीक व कॉलेजच्या प्राचार्य यांच्यावर राहील.

या योजनेच्या लाभाच्या स्वरुपामध्ये डी.एङ, बी.एड, कृषी व पशुवैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशित शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना एक महिन्यासाठी रक्कम रुपये ५०० प्रमाणे १० महिन्यांसाठी रक्कम रुपये ५ हजार व इंजिनिअरींग, वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशित शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना एक महिन्यासाठी रक्कम रुपये ७०० प्रमाणे १० महिन्यांसाठी रक्कम रुपये सात हजार आहे.

अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्याशी संपर्क साधावा.

-विभागीय माहिती कार्यालय,
कोकण विभाग, नवी मुंबई.
comments