मुलींनी मोठ्या संख्येने पत्रकारितेत आलं पाहिजे - राही भिडे

2016-06-24 14:25:04
     1695 Views

श्रीमती राही भिडे यांची पुण्यनगरी वृत्तपत्राच्या संपादक पदी सप्टेंबर २०१२ पासून नियुक्ती झाली आहे. इतक्या मोठ्या वृत्तपत्र समुहाच्या संपादक पदी नियुक्ती झालेल्या त्या बहुदा पहिल्याच महिला असाव्यात. पत्रकारितेमध्ये मुलींनी महिलांनी मोठ्या संख्येने आलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांची घेतलेली नेट-भेट महान्यूजच्या वाचंकासाठी...

१) तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळलात ?
जानेवारी १९८८ ला खऱ्या अर्थाने माझ्या पत्रकारितेला सुरूवात झाली लोकमत मधून. त्या आधी महाविद्यालयात असताना ‘क्लॅरिटी’ या इंग्रजी साप्ताहिकातून पत्रकारितेस प्रारंभ केला होता. लिखाणाची आवड, त्याच बरोबर सामाजिक विषयांकडे अधिक असलेला माझा कल या क्षेत्राकडे मला घेऊन गेला.

२) तुम्ही या क्षेत्रात कोणकोणत्या पदांवर काम केलं आहे?
मी अगदी सुरूवातीला महाविद्यालयात असल्यापासून फ्रिलान्सर पासून ते वार्ताहर, सब एडीटर, चिफ असिस्टंट, असिस्टंट एडीटर, सहाय्यक संपादक आदी सर्व पदांवर कामं केली आहेत. आता संपादक या पदावर कार्यरत आहे.

३) मंत्रालय प्रतिनिधी म्हणून आपली कारकीर्द विशेष गाजली. त्या बद्दल काही किस्से, आठवणीतील काही प्रसंग ?
आठवणी तर खूप आहेत... मंत्रालय आणि विधिमंडळ कामकाजाचे वृत्तसंकलन करीत असताना चालू राजकीय घडामोडींवरील ‘मुक्काम पोस्ट मुंबई’ हे माझे सदर वीस वर्ष सुरू होते. या सदरात समाजकारण, शिक्षण आणि शासन या क्षेत्रासंबधी लेखन, तसंच ’ विधिमंडळ दृष्टीक्षेप’ हा पहिल्याच पानावर कॉलम असायचा. गावो-गावी लोकांपर्यंत लिखाण पोहचत होतं. लोकांना लिहिलेलं आवडत होतं. काही नेत्यांना टीका केलेली आवडायची नाही. तर काही आवर्जून आमच्या वर टीका पण करत जा, असे म्हणायचे. हा झाला गमतीचा भाग, पण मंत्रालय विधिमंडळाचं काम खूप गाजलं हे खरं.

४) मुंबईत इतकी वर्ष घालविल्यानंतर आपण पुण्यनगरीच्या संपादक म्हणून पुण्याला जायचा निर्णय कसा घेतला?
संपादक पदाचा कारभार संभाळण्यासाठी पुण्याला जावचं लागणार होत. या क्षेत्रात विविधता, नाविण्य हे येतच असतात. ते स्विकारायची तयारी ठेवावी लागते. मुंबई काय पुणे काय, काम महत्त्वाचं असतं त्या वेळेला. कामाला प्रथम प्राधान्य.

५) पुण्यात काम करत असतानाच्या कारकिर्दीची वैशिष्ट्ये किंवा काही वेगळा अनुभव?
पुण्यात संपादक पदाची जबाबदारी होतीच, पण पुण्यात गणेशोत्सव कालावधीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरतीला बोलवायचे. सर्वांबरोबर पुढे जाता आलं पाहिजे. पुण्यात साहित्यसंमेलनाला उपस्थित राहता आले.

६) आता पुण्यनगरीच्या मुख्य संपादक म्हणुन आपण काय नवीन उपक्रम हाती घेतले आहेत ?
पुण्यनगरीची पुरवणी सबंध महाराष्ट्रात एकच केली. विषयाचं वैविध्य ठेवलं. त्या त्या भागातील लेखक घेतले. एडिट पेज केलं. अग्रलेखावर प्रतिक्रिया त्याच पानावर अग्रलेखाखाली ’ वाचक उवाच’ घ्यायला सुरूवात केली. असे अनेक नवीन उपक्रम केले. नवनवीन सदरं सुरू केली.

७) आतापर्यंत आपण कोणकोणत्या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहात ?
विशेष वृत्तमालिकांची दखल घेऊन लोकमतकडून देण्यात येणारा १९९७ चा पहिला पां.वा. गाडगीळ पत्रकारिता पुरस्कार नागपूर येथे मला प्रदान करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत मला जवळपास २८ पुरस्कार मिळाले आहेत.

८) पत्रकारिता, सामाजिक जीवन आणि कुटुंबाची ओढाताण कशी सांभाळता ?
मला सगळ्यांचा पाठिंबा मिळाला. २७ वर्षाचा काळ ह्या क्षेत्रात मी आहे सबंध महाराष्ट्रा भर जाता आलं, परदेशात जाता आलं. सर्वांनी व्यवसायाचं वेगळेपण सांभाळलं. कामामुळे कौतुक होत होतं त्यामुळे त्यांनाही आनंदच मिळत होता.

९) तुमचा आत्मचरित्र लिहिण्याचा काही विचार? आणि वाचकांपर्यंत कधी पोहचेल ?
हो... लवकरच वाचकांपर्यंत पोहचेल. जवळ जवळ संपूर्ण काम झालं आहे. मी पाली भाषा शिकले आहे तर त्याला अनुसरून आत्मचरित्राला नाव असून लवकरात लवकर ते वाचकांपर्यंत पोहचेल.

१०) पत्रकारितेत येणाऱ्या मुलींना, महिलांना काय सांगाल?
आई-वडील, जोडीदार, नातेवाईक यांनी या व्यवसायाचं वेगळेपण लक्षात घ्यायला हवं. त्या ओढाताणीतून व्यवस्थित जाता यायला हवं. मेहनत करा, मेहनतीला पर्याय नाही. निरीक्षण करा, जागरूकरित्या काम करा. बातमी करायला फार घाई करू नका, की फार चुका होतील आणि फार उशीर ही करू नका की वेळ निघून जाईल. बातमी ओळखायला शिका. बातमी ही पाकोळी सारखी असते, कधी उडून जाईल समजत देखिल नाही. प्रामाणिकपणे काम करा. दिवसभर टि.व्ही ला बातम्या असतात त्या पेक्षा काही तरी नविन विश्लेषणात्मक द्या. कौतुकाबरोबर टीका ही सहन करायची तयारी ठेवा.

राही ताईंची पत्रकारितेतील वाटचाल सर्वच नवीन मुला-मुलींना प्रेरणादायी ठरेल, अशीच आहे.

१२ वी पास विद्याथ्र्यांसाठी बी.ए. जनसंवाद आणि पत्रकारिता तर पदवी उत्तीर्ण विद्याथ्र्यांसाठी एम.ए. जनसंवाद आणि पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु आहेत. संपर्क - वसंतराव काळे पत्रकारिता आणि जनसंवाद महाविद्यालय, बीड, ९५५२५५६३९७ ९५२७८१५१५१ ७४२०९०४०५५
comments