बीड जिल्ह्यात शेतकऱ्याच्या मुलीने मिळविला ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ चा बहुमान

2016-06-10 10:39:45
     1109 Views

वडीलांसोबत शेतीत राबणाऱ्या मीना तुपे यांच्या शिक्षणाला घरातूनच विरोध होता. मात्र जिद्दीच्या जोरावर बीडच्या या कन्येने आज थेट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वॉर्ड ऑफ ऑनर स्विकारला. शेतातून येथेपर्यंतचा मीना तुपे यांचा प्रवास थक्क करणारा आहे. दगडी शहाजानपुरा (कामखेडा) या खेडेगावची मीना तुपे. मीना फक्त पोलिस उपनिरीक्षक झाली नाही, तर महाराष्ट्र पोलिस अकादमीत मानाची तलवार प्रथमच एका महिला अधिकाऱ्याने पटकाविण्याचा मान तिने मिळविला आहे. याचप्रमाणे ‘सर्वोत्कृष्ट कॅडेट‘चा सन्मानही मीनाने पटकावला आहे. भीमसिंग व सुशीला तुपे यांची मीना ही ज्येष्ठ कन्या. तिला आणखी तीन बहिणी व भाऊही आहे. घरची चार एकर कोरडवाहू जमीन. आई-बाप अशिक्षित अन त्यांचे सारे आयुष्य शेताच्या काबाडकष्टात गेलेले. तीक्ष्ण बुद्धी, चाणाक्ष अन्‌ एकाग्रता या बळावर फार अभ्यास न करताही तिला चांगले गुण मिळायचे; पण घरची आर्थिक परिस्थिती नसल्याने कायम उदास वाटायचे. मीना म्हणते, ‘तेव्हा आई-वडलांचा राग यायचा. शाळेत एक आहे तर दुसरे नाही. अन्‌ खेळण्याच्या वयात शेतामध्ये कामे करावी लागायची. औत हाकायची. पेरणी करायची. पिकांना पाणी देणे, ही सारी कामे मी आजही घरी गेल्यानंतर करते. कारण, आज कळून चुकले की त्या वेळी आई-बापाला काय मेहनत करावी लागत असेल ती. जिद्दीने शिक्षण पूर्ण केले आणि डीएडही केले. २०१२ मध्ये बीड येथे पोलिस भरती निघाली. भरतीला उभे राहिले अन्‌ पोलिस शिपाई म्हणून रुजूही झाले.‘‘
लोकसेवा आयोगाचा अभ्यास सुरू केला आणि २०१३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले. सर्वोत्कृष्ट महिला अधिकारी होण्याचा आत्मविश्‍वास होता. त्यापेक्षा जास्त सन्मान मिळाला; पण यावरही मी समाधानी नाही. पोलिस विभागातील अधिकारी होण्यासाठी परीक्षेची तयारी सुरू करणार आहे आणि त्यातही यश मिळवून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत राहणार. आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळेच हे यश मिळत असल्याचेही मीना शेवटी सांगते.


महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या शंभर वर्षांहून अधिकच्या काळात सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा किताब प्रथमच एखाद्या महिलेने प्राप्त करण्याचा इतिहास रचणाऱ्या उपनिरीक्षक मीना तुपेच्या कामगिरीने बीड जिल्ह्य़ातील दगडी शहाजानपुरा या छोटय़ाशा गावाचे नाव प्रकाशझोतात आले आहे. मीनाच्या कामगिरीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेला गौरव सोहळा अनुभवताना तिला शिक्षणाला प्रोत्साहन देणारे वडील भिवसेन तुपे आणि कधीकाळी मुलींनी शिकण्याची गरज नाही, अशी अपेक्षा बाळगणारी आई शशिकला या दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ७४९ प्रशिक्षणार्थीच्या तुकडीत सवरेत्कृष्ट ठरणे सोपी गोष्ट नाही. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी प्रबोधिनीत १३ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण घ्यावे लागते. लहानपणापासून शेतात नांगरणी, खुरपणी अशी अंगमेहनतीची सर्व कामे करणाऱ्या मीनाला हे प्रशिक्षण त्यामुळे खडतर भासलेच नाही. तुपे कुटुंबाची आर्थिक स्थिती तशी बेताचीच. चार एकर कोरडवाडू शेतीवर गुजराण करणाऱ्या या कुटुंबात चार मुली आणि एक मुलगा. बहिणींमध्ये मीना सर्वात लहान. मुलींनी शिक्षणच घेऊ नये असा आईचा आग्रह असल्याने मोठय़ा तिन्ही बहिणींचे जेमतेम शालेय शिक्षण झाले. परंतु, मीनाचा शिक्षणाचा हट्ट कायम राहिला. शिक्षिका होण्याचे तिचे ध्येय होते. त्यासाठी शिक्षणशास्त्र पदविकाही तिने प्राप्त केली. मात्र, शिक्षण पूर्ण होऊनही नोकरीची आशा धूसर वाटत होती. याच काळात पोलीस भरतीची जाहिरात पाहून तिचा निर्णय बदलला. ती हवालदार झाली. खंडाळा प्रशिक्षण केंद्रातही उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून तिने प्रथम पारितोषिक मिळवले. पण या पदावर तिचे मन रमेना. पोलीस अधिकाऱ्यांच्या कामामुळे मीनाला प्रेरणा मिळाली आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत ती महिलांमध्ये थेट राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतही तिने सरस कामगिरीद्वारे सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थी होण्याचा बहुमान प्राप्त केला. शेतकरी कुटुंबातील युवक-युवतींनी स्पर्धा परीक्षेकडे वळायला हवे. त्यासाठी मार्गदर्शन करण्याची तिची तयारी आहे. मीनाची हुशारी केवळ शारीरिक प्रशिक्षणाच्या बाबतच दिसून येते असे नव्हे. शेतकरी आत्महत्येवरील तिचे विचार सर्वानाच अंतर्मुख करणारे आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर केवळ वरवरची चर्चा करून उपयोग नाही. त्यासाठी काहीतरी खोलवर उपायांची गरज आहे. शेतात राबणाऱ्या आई-वडिलांचे अपार कष्ट लक्षात घेऊन मुलांनी चांगला अभ्यास केल्यास आत्महत्येसारखा प्रश्नच उद्भवणार नाही, असे तिचे म्हणणे आहे. शेतकरी कुटुंबांना यामुळे चांगले दिवस येतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली. सध्याच्या काळात सत्ता व पैसा याला सर्वाधिक महत्व आहे. त्यामुळे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो असा समज आहे. परंतु, कठोर मेहनतीने हा दृष्टिकोन बदलता येतो आणि त्याची ताकत शेतकरी कुटुंबातही आहे. मीना तुपेने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
comments