बाबासाहेबांमुळेच आम्ही घडलो!

2016-05-05 9:04:40
     1108 Views

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच शिक्षणाची संधी मिळाली आणि खेड्यातील एक तरुण तहसीलदार पदापर्यंत पोहचू शकला, बीए, एल.एल.बी., एल.एल.एम.पर्यंत शिक्षण घेऊ शकला. सेवानिवृत्त तहसीलदार सुभाष कनवाळू यांचा जीवनप्रवास आणि बाबासाहेबांविषयीची कृतज्ञता त्यांच्याच शब्दात.....

माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये बाबासाहेब हे नाव उच्चारताना समोर दिसते ते (१) कामगारांची १४ तासांची ड्युटी आठ तास करणारे बाबासाहेब (२) स्त्रीयांसाठी कायदे करणारे, आरक्षण देणारे बाबासाहेब (३) रिझर्व बँक स्थापक-बाबासाहेब (४) संपूर्ण देश स्वातंत्र्याची मागणी करणारे बाबासाहेब (५) मतदानाचा हक्क देणारे बाबासाहेब (६) मनुस्मृति जाळणारे बाबासाहेब (७) भारतीय राज्यघटनेनचे शिल्पकार, विश्वरत्न, कांत्रीसूर्य, प्रज्ञासूर्य म्हणजेच बाबासाहेब.

आज मी जो कोणी आहे तो केवळ बाबासाहेबांच्या कृपेमुळेच असून विविध सरकारी पदांवर अत्यंत कुशलतेने काम करु शकलेला असा अधिकारी घडलो. माझे भाग्यविधाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असून त्यांनी स्थापन केलेल्या मुंबईतील फोर्ट मधील सिद्धार्थ महाविद्यालयातून पदवीधर होण्याचे भाग्य मला मिळाले, पदवीधर होताच त्यांचेच विधी महाविद्यालयातून एल.एल.बी. झालो. बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर आणि खासदार रामदास आठवले साहेब माझे वर्ग मित्र आहेत.

बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या महाविद्यालयातून शिक्षण घेताना तसेच नोकरी, संसार सांभाळून विविध सरकारी पदे भूषविताना अनंत अडचणींना तोंड देत त्यावर मात करण्याचा प्रभाव बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकांतून, ग्रंथांतून माझ्यावर पडला व मी न डगमगता परिस्थितीचा मुकाबला करत गेलो.

सिद्धार्थ विहार हॉस्टेल हे एक असे हॉस्टेल होते की त्या हॉस्टेलची पायरी चढणारा, त्यामध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी ज्ञानामृताचे डोस घेऊन पदवीधर होऊनच बाहेर पडतो आणि ते माझ्या बाबतीतही खरे ठरले आहे. हाच प्रभाव डॉक्टर बाबासाहेबांचा माझ्यावर झालेला आहे.

मी उच्च अधिकारी जो झालो तो बाबासाहेबांच्या ग्रंथ वाचनामुळे. ’ ’ शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ ’ हे बाबासाहेबांचे वाक्य सतत समोर ठेवून तसेच ’ ’ गुलामाला तू गुलाम आहेस याची जाणीव करुन दिल्यास तो पेटून उठतो’ ’ या वाक्याचा माझ्या जीवनावर फारच परिणाम झाला आणि मला विविध सरकारी पदांची धूरा सांभाळता आली.

बाबासाहेबांनी केलेल्या त्यागाचा, त्यांच्या शिक्षणाचा, त्यांनी जीवनात अनुभवलेल्या कटू प्रसंगांचा, त्यांनी लिहिलेले विविध ग्रंथ, स्फूर्तीदायक भाषणे, सोसलेल्या हालअपेष्टा माझ्या वाचण्यात आल्या आणि माझ्या जीवनावर प्रभाव पडत गेला आणि त्यामुळे माझी प्रगती होत गेली. त्यांच्या जीवनपटाचाही माझ्यावर प्रभाव पडला व त्यांचे ’ ’ तिरस्करणीय गुलामगिरी नि अमानुष अन्याय यांच्या गर्तेत पिचत पडलेल्या ज्या समाजात मी जन्माला आलो आहे त्या समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यास जर मी अपयशी ठरलो तर स्वत:ला गोळी घालीन’ ’ हे वाक्य मनावर कायमचे कोरल्या गेले.

आज भारत देश महासत्तेकडे जात आहे तो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच हे नाकारुन चालणार नाही आणि म्हणून अशा महामानवास कोटी कोटी विनम्र अभिवादन करतो.

-सेवानिवृत्त तहसीलदार
सुभाष कनवाळू
comments