डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लढाई जाती निर्मुलनाची


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती निर्मुलनाच्या लढाईसाठी आपले सर्व आयुष्य खर्ची घातले ती जातीव्यवस्था आजही कर्करोगासारखी आपल्याला पोखरून काढत आहे. सुदृढ समाजनिमिर्तीसाठी जातीय सलोखाच केवळ महत्वाचा नसून जातीव्यवस्थेचे समूळ उच्चाटन करणे जरूरीचे आहे. आपल्या देशातील जातिव्यवस्था व अस्पृश्यता यावर गेल्या शंभर-दीडशे वर्षांपासून विचारमंथन सुरू आहे. समाजव्यवस्था छिन्नविच्छिन्न करणारी विषमतामूलक जातीयता आजही मुळापासून संपलेली नाहे. नजिकच्या काळात ती संपेल असा भाबडा आशावाद बाळगणे मूर्खपणाचे ठरेल. जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था या एकाच नाण्याच्या दोन बाबी असल्या तरी जातीव्यवस्था म्हणजेच वर्णव्यवस्था असे म्हणता येत नाही. वर्णव्यवस्था आधी जन्माला आली की जातीव्यवस्था याबाबत ठामपणे काहीही सांगता येत नाही. जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था या सर्वस्वी वेगळ्या बाबी आहेत. कारण त्या दोन विभिन्न धर्मरचनांतून आलेल्या आहेत. वर्णव्यवस्था ही वैदिक धर्माची निर्मिती आहे तर जातीव्यवस्था ही अवैदिक समाजाची देणगी आहे. अवैदिक समाजाची व्यापकता आणि विशिष्ट जीवनशैली यातून जाती बनत गेल्या, असे म्हणता येईल. त्यामुळेच अस्पृश्यता आणि जात या दोन निरनिराळ्गया गोष्टी आहेत हे लक्षात घ्यायला हवे. डॉ. आंबेडकरांच्या आधीपासूनच अस्पृश्यता नष्ट करण्याची चळवळ सुरू झाली होती. हिंदू धर्माला लागलेला अस्पृश्यतेचा कलंक धुवून काढण्यासाठी दलितेतर समाज सुधारकांनी अनेक प्रयास केले. मोठमोठे लढे उभारले. बाबासाहेबांनी अस्पृश्यता पाळण्याला कायद्यान्वये बंदी घातली. अस्पृश्यता नष्ट झाली असली तरी जातीयता मात्र आजतागायत टिकून आहे. यएक गाव एक पाणवठा’ आंदोलनातून एकापेक्षा अधिक जाती एकत्रित येऊन पाणी भरू लागल्या पण स्वतःच्या जाती शाबूत ठेवून. शहरातही एकच मसणवाटा असतो. पण त्यामुळे तेथे जात संपलेली असते असे मात्र नाही. आपापल्या मुलामुलींची लग्ने जुळवायची वेळ येते तेव्हा जात आठवते. जातीअंतर्गत लग्नांमुळे जात टिकून राहते. गेल्या शंभर वर्षात आंतरजातीय विवाह करण्याची तरतूद करणे ही कृती सोडल्यास जात मोडण्यासाठी कोणताही ठोस कार्यक्रम आखला गेलेला नाही. जात आणि अस्पृश्यता या जशा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत तशाच जातीय विषमता आणि जात संपविणे याही निरनिराळ्या दोन गोष्टी आहेत. वेगवेगळ्या जातींनी एकमेकांशी प्रेमाने वागावे, त्यांच्यात वैरभाव असू नये, त्यांनी उच्चनीचता पाळू नये अशाप्रकारचे धडे दिले जातात. जागतिकीकरण, औद्योगिकीकरण आणि नागरिकीकरणामुळे अस्पृश्यता कमी झाली असली तरी जातीयता संपलेली नाही, हे लक्षात घ्यायला हवे. जाती अस्तित्वात असताना जातीयता संपली असे म्हणताच येणार नाही. समाजात उच्चनीचतेचा भाव उत्पन्न करणारी जातीव्यवस्था नष्ट झाली पाहिजे, अशी सैद्धांतिक मांडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. बाबासाहेबांनी पहिलाच लेख लिहिला तो जातिव्यवस्थेवर. १९१६ मध्ये त्यांनी ‘भारतातील जाती’ या शोधनिबंधात जातिव्यवस्थेचा उगम, रचना आणि विकास याची मांडणी केली आहे. परंतु आपण आजतागायत जातींची पुनर्रचना करण्याच्याच प्रक्रियेत गुंतलो आहोत. जाती तशाच ठेवून त्यांचा एकोपा साधण्याने ही सामाजिक कीड मुळापासून नष्ट होणार नाही. जाती निर्मुलनाचा लढा आपणा सर्वांना मिळून लढावा लागणार आहे. हजारों वर्षाच्या जातीयव्यवस्थेला उखडून टाकण्यासाठी केवळ आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देऊन अथवा आरक्षणाचे तुकडे फेकून भागणार नाही. जातीयव्यवस्था मजबूत करणारी आपली समाजरचना आणि प्रामुख्याने आपली निवडणूक पध्दती बदलायला हवी. समाज प्रबोधन, सामाजिक चळवळी यामुळे काहीशी खिळखिळी बनलेली जातीयव्यवस्था निवडणुका आल्या की आपला खुंटा अधिक बळकट करीत असते. आम्हांला जातिविहीन समाज निर्माण करायचा आहे हे निवडणुकीच्या भाषणात सांगणारे सर्वच पक्षाचे नेते तिकीटवाटपाच्यावेळी मतदारसंघात कोणत्या जातीचे लोक किती आणि अन्य जातींचे मतदार आपल्याकडे खेचून आणण्यासाठी त्या त्या जातीचे त्याचे समर्थक किती याचाच हिशोब करतात. मतदारही आपल्या जातीच्या उमेदवारालाच मते देतात. जातीच्या मतांवर निवडून येणा-या नेत्यांनाही जातीव्यवस्था फायद्याचीच असते. त्यामुळेच वेगवेगळ्या जातीतील समूह मोठय़ा प्रमाणावर एकवटू लागला आहे. जातीच्या छत्रछायेखाली संघटित होण्याची ही प्रक्रिया घातक आहे. सत्तेत वाटेकरी होण्यासाठी आपल्या जातबांधवांना संघटित करून आपली राजकीय ताकद वाढविण्यावरच त्या त्या समाजातील नेत्यांचा भर असतो. निवडणुका जिंकण्याच्या, आपली बार्गेनिंग पॉवर वाढविण्याच्या अट्टहासापोटी आपण जातीव्यवस्थेला संजीवनी देत आहोत याचे भान पुढा-याना राहिले नाही. तळागाळातील, डोंगर-कपारीत राहणा-यानी, दलित, मागासवर्गीयांनी, अल्पसंख्यांकांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी संघटित व्हायलाच हवे. मात्र ते एका विशिष्ट जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या झेंडय़ाखाली नव्हे. आपापल्या समाजातील लोकांच्या दुखाःचे भांडवल करून सत्ताधा-याच्या आश्रयाला गेलेले अनेक नेते सध्या उदयाला आले आहेत. जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली तयार होणा-या राजकीय संघटना आणि पक्षांला कायद्याने बंदी घालायला हवी. जातीनिर्मुलनाची लढाई यशस्वी करायची असेल, तर प्रामाणिक प्रयत्नांसोबत आपल्या निवडणूक प्रक्रियेतच बदल करायला हवेत.
comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)