टीम लीडर

2016-04-13 8:15:28
     924 Views

केवळ व्यावसायिकच नाही तर प्रत्येकाला वैयक्तिक पातळीवरही समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे कोणतीही समस्या आली तर त्यावर काही तोडगा काढणं शक्य होतं. म्हणूनच एक उत्तम टीम लीडर होण्यासाठी काय गुण असणं आवश्यक आहेत ते पुढीलप्रमाणे -
प्रत्येक सदस्यांबरोबर मीटिंग करत राहा. विशेषत: तुमच्या टीममध्ये कोणी नवीन असेल तर त्याच्यासोबत मीटिंग करा. यामुळे एकमेकांशी ओळख व्हायला मदत होईल. प्रत्येकाचं नाव, काम आणि विशेष गुण जाणून घेणं आवश्यक आहे.
प्रत्येक वेळी कार्यालयात बसणं शक्य होतंच असं नाही, म्हणूनच तुमचा नंबर किंवा ईमेल आयडी प्रत्येकाला आवश्यक द्यावा. म्हणजे गरज वाटल्यास तुम्हाला संपर्क करणं सहज शक्य होईल.
तुम्ही लीडर असल्यामुळे सगळ्यांपेक्षा तुमचं काम अधिकच असणार. मात्र याचा बाऊ करण्यापेक्षा तुमची जबाबदारी पूर्ण करायला शिका. यासाठी तुम्हाला उशिरापर्यंत थांबावं लागलं तरी तुमची तयारी असली पाहिजे. तुम्ही तुमची जबाबदारी पूर्ण कराल तर बाकीची मंडळीही अधिक उत्साहाने काम करतील.
कोणताही निर्णय विचारपूर्वक आणि शांतपणे घ्या. गरज असल्यास तुमच्या टीमकडूनही काही टीप्स घ्या. यामुळे निर्णय घ्यायला सोपं होईल आणि टीमलाही त्यांची क्षमता कळेल. असं केल्याने सकारात्मक संदेश मिळेल.
आजूबाजूला होणा-या मीटिंग्ज किंवा इव्हेंट्सची माहिती ठेवणं आवश्यक आहे. तुमचं आणि दुस-यांचं वेळेचं नियोजन त्याप्रमाणे करा. कोणावरही कामाचा अतिरिक्त भार टाकू नका. असं केल्याने त्यांना कामाचा कंटाळा येईल. तुमच्या क्षेत्रात लोकांशी बोलणं, भेटणं किंवा फील्ड वर्क असेल तर त्याची प्रत्येकाला समान संधी द्या.
काम आणि बजेट आपल्या कार्यालयाच्या भूमिकेला लक्षात ठेवूनच करा. कोणताही टास्क पूर्ण करण्यासाठी आवश्यक वेळ जरूर द्या. कमी वेळेत चांगलं काम करण्याची अपेक्षा धरणं चुकीचं आहे. त्यामुळे मानसिक ताण येण्याची शक्यता असते.
कोणालाही काम देण्यापूर्वी त्याच्या स्किल्स किंवा योग्यतेविषयी जरूर जाणून घ्या. समजा कोणाला प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी काही समस्या येत असेल तर त्याला मदत करावी तसंच त्याला प्रोत्साहन देणंही आवश्यक आहे. याचा सकारात्मक परिणाम कामावर पडतो.
टीम मेंबर्सना त्यांचं वैयक्तिक जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यासाठी त्यांना वेळ द्या. त्यांना वैयक्तिक जीवनात काही समस्या असेल तर त्यांची समस्या जाणून घ्या आणि त्याला योग्य तो सल्लाही द्या. एखादी व्यक्ती तुमच्यासोबत काही शेअर करू इच्छित असेल तर सगळ्यांसमोर त्या गोष्टीची खिल्ली उडवू नका. असं केल्याने त्या व्यक्तीचं कामावरून लक्ष उडण्याची शक्यता असते.
अन्य कोणत्या डिपार्टमेंटबरोबर तुमच्या टीमचे मतभेद झाल्यास नेहमी तुमच्या टीमसोबत राहा. कारण तुमच्या टीममधल्या मेंबर्सना तुमच्याकडून खूप अपेक्षा असतात. त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या पुरेपूर प्रयत्न करा. काही चुकीचं झाल्यास त्यांना योग्य मार्गदर्शन करावं. त्यामुळे दुस-यांदा चूक होणार नाही.
चांगला लीडर होण्यासाठी जसं उत्तम बोलणं आवश्यक आहे तसंच तुमच्याकडे ऐकण्याची क्षमताही चांगली असणं आवश्यक आहे. कारण सदस्यांनी ज्या काही कल्पना सुचवल्या असतील त्या ऐकणंही तितकंच गरजेचं आहे. त्या कल्पनांचं स्वागत करा. जेणेकरून त्यांच्या मनात तुमची प्रतिमा उजळेल आणि ते अधिक उत्साहाने काम करतील. वेळ मिळाल्यास त्यांच्यासाठी प्रोत्साहनपर सेमिनार्सचं आयोजन करा.
परिस्थिती कशीही असो, न घाबरता त्या परिस्थितीचा सामना करणं आवश्यक आहे. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमची टीम अधिक मजबूत करील. त्याचबरोबर धैर्य आणि संयम मिळेल.
कोणी चांगलं काम केल्यास त्याची प्रशंसा करणं विसरू नका. तुमची टीम आहे त्यामुळे प्रत्येक टीम मेंबरवर विश्वास दाखवणं गरजेचं आहे.
प्रत्येक प्रोजेक्टला पूर्ण करण्यामध्ये त्या त्या प्रत्येक सदस्याची मेहनत असते. काम पूर्ण झाल्यावर त्याला धन्यवाद द्यायला किंवा त्याच्या कामाची स्तुती किंवा एखादं बक्षीस द्यायला विसरू नका. अगदी छोटीशी पार्टी किंवा सहल आयोजित करा. त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होईल.
प्रत्येकाशी वैयक्तिक संवाद साधणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमचे एकमेकांशी संबंध सुधारतील. पण हे सगळ्यांसमोर दाखवणं योग्य नाही. कारण एक टीम लीडर म्हणून तुम्ही सगळ्यांशी समान वागाल अशी अपेक्षा तुमच्याकडून केली जाते. म्हणूनच प्रत्येकाला एकाच पातळीवर वागवण्याचा प्रयत्न करा.
समजा तुमच्याकडून एखादी चूक झाली असल्यास त्याचा स्वीकार करायला शिका. त्याच्यासाठी दुस-यांना जबाबदार ठरवू नका, तशी सवय असल्यास मोडा. यामुळे आपली चूक झाली तर ती लगेच मान्य केली पाहिजे, असा संदेश तुमच्या वागण्यातून त्यांच्यापर्यंत पोहोचेल.
तुमच्या टीमची दुस-या टीमसमोर स्तुती करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्या मनात सकारात्मक भावना निर्माण होईल.
तुमच्या टीममधील सदस्य काम करायला घाबरतील, असं वातावरण अजिबात करू नका.
टीम लीडर म्हणून ऐकायला खूप छान वाटतं मात्र त्याचबरोबर त्या पदाच्या जबाबदा-याही पेलणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा.
comments