पोलिस भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ

2016-02-23 15:12:34
     1033 Views

पोलिस भरतीसाठीच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वय १८ ते २८ आणि मागास प्रवर्गासाठी १८ ते ३३ अशी वयोमर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. वयोमर्यादेत वाढ केली गेल्याने पोलिस भरतीसाठीच्या अर्ज स्वीकृतीच्या कालावधीतही ४ मार्च २०१६ पर्यंत वाढ करण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात दिली आहे.

यापूर्वी पोलिस भरतीसाठीची वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी १८ ते २५ वर्षे आणि मागासवर्गासाठी १८ ते ३० वर्षांपर्यंत होती. खुल्या आणि मागास प्रवर्गासाठी प्रत्येकी तीन वर्षांची वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. सध्या राज्यभर ग्रामीण आणि शहर पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत १८ फेब्रुवारीपर्यंत होती. ती मुदत आता ४ मार्च २०१६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. शासनाने महाराष्ट्र पोलिस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०११ मध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार पोलिस पदासाठीच्या भरतीची कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी २८ वर्षे आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी ३३ वर्षे केली आहे.

ज्या उमेदवारांनी २०१५/१६ च्या भरतीसाठी यापूर्वी अर्ज केले आहेत, त्यांनी पुन्हा ऑनलाईन आवेदन अर्ज करण्याची गरज नाही, अशी माहिती या पत्रकात दिली आहे. खुल्या प्रवर्गातील २८ वर्षे वय असणार्‍या आणि मागासवर्ग प्रवर्गातील ३३ वय असणारे उमेदवार या पोलिस भरतीसाठी अर्ज करू शकतात.
comments