तरुणाईचा विचार

23-02-2016 : 03:12:19
     943 Views

सध्या भारताला प्रगतिपथावर नेण्याच्या गोष्टी सुरू आहेत. त्यासाठी बरेच मार्ग, उपाय अवलंबले जात आहेत. या सर्व प्रयत्नांची दोरी आजच्या तरुणाच्या हाती आहे. आज एखाद्या तरुणाच्या डोळ्यांत त्याचं भविष्य घडवण्याची स्वप्नं तरळत असतील, तर त्याला आधुनिक नितीशास्त्र व नियमांवर विश्वास ठेवून ते अवलंबण्याखेरीज मार्ग नसतो. अखेर त्याला जीवनात यश पाहिजे असतं. परंतु हल्लीच्या काळात जोपर्यंत तरुणाईच्या पसंतीस एखादी गोष्ट उतरत नाही तोपर्यंत ती प्रसिद्ध किंवा यशस्वी होऊ शकत नाही. हा आत्ताच्या बाजारू जगाचा ‘सक्सेस फॉर्म्युला’ आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणाईचा विचारही जिथे प्रसिद्धी, तिथे यश, असाच झाला आहे.

हीच तरुणाई देशाला पुढे घेऊन जात असते. तरुणांचे हे विचार किंवा त्यांच्या विचारांमधील बदल एखाद्या देशाला विकसनशील असण्यापासून ते विकसित देश अशा पदवीपर्यंत नेऊ शकतात का? तसं घडत नसेल तर त्याची कारणं काय आहेत ते बघू या. जगाचा विचार करण्यापेक्षा आपल्या विकसनशील भारत देशातलंच आपण पाहू. लोकसंख्येच्या मानाने जगात सगळ्यात जास्त तरुणाई ही आपल्या भारत देशात आहे. भारताच्या विकासात सगळ्यात मोठा सहभाग हा तरुणाईचा आहे. तरुणांना योग्य संधी देणारा, त्यांच्या गरजा पूर्ण करून त्यांना योग्य संधी उपलब्ध करून देणारा देश हा प्रगतिपथावर नेहमी आगेकूच करत राहतो. भारतातही तरुणांची परिस्थिती गेल्या दशकापासून सुधारत चालली आहे. पण तरीही अशा काही गोष्टी किंवा गरजा आहेत ज्या लवकरात लवकर पूर्ण व्हायला हव्यात.

आपल्या देशाच्या बाबतीत म्हणायला गेलं तर परिस्थिती सुधारणारी असली तरी अजूनही भारतात ब-याच भागांमध्ये तरुण पिढी घडण्यासाठी पाया असलेली शिक्षण ही मूलभूत गरजसुद्घा पूर्ण होत नाही.

शहरं आणि आसपासच्या परिसराच्या मानाने गावांमध्ये शिक्षणातली जागरूकता जसजशी कमी होत जाते तसा अशिक्षितपणा वाढत जातो. आणि हा प्रगतीच्या मार्गावरचा स्वातंत्र्योत्तर काळातला सगळ्यात मोठा अडथळा आहे. कारण काही वेळा आवड असूनही गरिबी किंवा तत्सम कारणामुळे नाहीतर मुळातच आवड नसल्याने शिक्षणाची साथ तरुणपणातच सुटते. तसेच मुलगा आणि मुलगी हा भेदभाव आहे, जात-पात, अंधश्रद्धा यासारख्या अनेक परिस्थितीजन्य गोष्टींमुळे शिक्षणावर येणा-या बंदीला आळा बसला पाहिजे. पुढे उच्च शिक्षणाच्या बाबतीतही हाच प्रकार आहे. स्वदेशाबद्दल कितीही अभिमान असला तरी शिक्षणपद्धती आणि अभ्यासक्रम सतत अपडेटेड होत असल्याने कितीही खर्च करावा लागला तरी अनेक जण पदवीनंतर उच्च शिक्षणासाठी भारताबाहेरच्या विकसित देशात जाण्याचा मार्ग अवलंबतात.

कारण त्या देशांमध्ये प्रात्यक्षिकांवर जास्त भर दिला जातो, ज्यामुळे नेहमी नवीन ज्ञान तर मिळतच राहतं, शिवाय स्वत:ला स्वत:हून नेहमी अपडेट ठेवता येतं. त्यामुळे ते ज्ञान केवळ पुस्तकी आणि परीक्षा देण्यापुरतं न राहता आयुष्यात भर टाकणारं होतं. अशी परिस्थिती म्हणावी तितकी भारतात विद्यार्थ्यांना उपलब्ध नाही. स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षानीसुद्धा आपल्या शिक्षणपद्धतीत ब-यापैकी भर हा थिअरीवरच राहिलेला आहे. परंतु असं असलं तरी पिढय़ांमध्ये काळानुरूप बराच बौद्धिक बदल झाला आहे. त्यामुळे आजच्या या फास्ट फॉरवर्ड आणि हार्डवर्कपेक्षा स्मार्टवर्कवर विश्वास ठेवणा-या पिढीला अपेक्षेप्रमाणे प्रात्यक्षिक ज्ञान शैक्षणिक वयात मिळत नसल्याने, केवळ परीक्षेपुरती तयारी केली म्हणजे अभ्यास झाला हा विचार दृढ होऊन आपोआपच त्याबद्दल निष्काळजीपणा तयार होत जातो. आणि जेव्हा ते ज्ञान असलेल्यांना ते वापरण्याची वेळ येते तेव्हा यश येत नाही. एकूणच फक्त मार्क मिळवण्याची स्पर्धा असलेल्या या शिक्षणाचा फारसा उपयोग होत नाही!

तसंच, विकसित देशात १-२ वर्ष राहून शिक्षण घेऊन नोकरी किंवा रोजगारासाठी पुन्हा एका विकसनशील देशात येणं हे केवळ भावनिकदृष्टय़ा योग्य वाटू शकतं, प्रॅक्टिकली नाही. त्यामुळे तरुणांना जर भारतात प्राथमिक आणि उच्च शिक्षणाच्या आधुनिक आणि सहज उपलब्ध होणा-या संधी दिल्या तर देशातली ब-यापैकी तरुणाई ही देशात राहूनच उच्च आणि आपल्या आवडीचं शिक्षण घेणं पसंत करतील. तसंच या तरुण वर्गासाठी भारतीय किंवा भारतातल्या उद्योगधंद्यांमध्ये नोकरी मिळाल्यास देशात येणारी संपत्ती ही देशातच राहू शकते. आणि ब्रेन ड्रेनही घडणार नाही.

ज्या तरुण वर्गाला स्वत: व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्यांना प्रोत्साहनपर भांडवल सुरुवातीच्या काही काळात सहजपणे उपलब्ध झाल्यास त्यांना व्यवसायाच्या बांधणीवर जास्त लक्ष देता येऊन, शिवाय भांडवलाअभावी त्यांचे मानसिक खच्चीकरणदेखील होणार नाही. भारताला प्रगतिपथावर नेण्यासाठी तरुणांना जास्त प्रोत्साहन देण्यासाठी विचार झाला पाहिजे. त्यामुळे आधुनिकतेकडे झेप घेण्याची क्षमता असलेल्या आपल्या तरुणाईला या संधी देशातच मिळत राहिल्या तर ते अशा संधींचं सोनं नक्कीच जास्तीत जास्त करतील.
comments