नव्या दमाचा मी शूर शिपाई...

2015-10-15 14:13:39
     1037 Views

खरं तर सैन्य दल आणि पोलीस दल यांच्याबद्दल माझ्या मनात अपार प्रेम आणि श्रद्धा. मी एकदा वुमेन्स शार्ट सर्व्हिस कमिशनसाठी अलाहाबादला मुलाखतही देऊन आले आहे. माझ्या मनात मान उंचावणारी आणि पॅशन असणारी सेवा म्हणजे सैन्य दल आणि पोलीस दल... मातृभूमीचे ऋण फेडणारी ही सेवा... तुरचीच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात गेले आणि या सगळ्या भावना मनात पुन्हा दाटून आल्या. निमित्त होतं नवप्रविष्ठ पोलीस शिपाई दीक्षांत संचलन समारंभाचं...

२०११ साली तासगाव तालुक्यातील तुरचीमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. आतापर्यंत येथून फौजदार प्रशिक्षणाच्या तीन तुकड्या बाहेर पडल्या आहेत. पोलीस शिपाई प्रशिक्षणाची ही पहिलीच तुकडी. प्रशिक्षण केंद्रात पोहोचले तेव्हा सकाळचे सव्वाआठ वाजले होते. समारंभ नुकताच सुरू झाला होता. माझं लक्ष वेधलं ते संचलनाने. नजरेत लक्ष्य, राष्ट्राभिमान आणि तालबद्ध, शिस्तबद्ध संचलन. त्याच्या जोडीला पोलीस शिपायांचे मानसिक धैर्य वाढवणारा गे मायभू तुझे मी... ताकद वतन की हमसे है आदी गीतवादन करणारा पोलीस बँड. देखणं आणि शानदार संचलन बघत असताना माझ्याही मनात नकळत राष्ट्रप्रेमाची लाट उचंबळून आली. म्हणूनच कार्यक्रमानंतर कुतुहल म्हणून मी प्राचार्य दिलीप पाटील- भुजबळ यांच्याशी संवाद साधला.

या तुकडीत ४०० प्रशिक्षणार्थी. गेले ९ महिने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे सारे जण एकाच कुटुंबातील होऊन गेले होते. या सगळ्यांचा दिवस सुरू व्हायचा भल्या पहाटे. सकाळी ६ वाजल्यापासून बाह्यवर्ग. तासाभराच्या विश्रांतीनंतर सकाळी ९ ते दुपारी २ आंतरवर्ग. यामध्ये क्रिमिनल लॉ, मायनर क्रिमिनल लॉ, लॉ अँड ऑर्डर, क्राईम प्रिव्हेन्शन अँड इनव्हेस्टीगेशन प्रोसिजर, पोलीस ॲडमिनिस्ट्रेशन अँड ओरिजिनेशन, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, शस्रास्त्रांची ओळख आणि त्यांची प्रॅक्टिस अशा अनेक विषयांचा समावेश होता. त्यासाठी अतिथी व्याख्यात्यांची अनेक सत्रं घेण्यात आली.

या सगळ्यांशिवाय, ताणतणाव व्यवस्थापन, आर्थिक व्यवस्थापन, जनतेशी संवाद यांचीही तयारी करून घेण्यात आली. कौशल्य विकासाबरोबरच, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्त्व विकास, निर्णयक्षमता, शिस्त अशा पोलीस दलासाठी आवश्यक त्या गरजांसाठी मानसिक तयारी करवून घेण्यात आली. तुरचीचे प्रशिक्षण केंद्र मुळातच पर्यावरणपूरक असल्याने निसर्ग संरक्षण आणि संवर्धनाचा गुणही त्यांच्यात रुजला गेला. त्यासाठी त्यांनी श्रमसंस्कारही केले.

प्राचार्य दिलीप पाटील भुजबळ यांच्या नेतृत्त्वाखाली १० उपविभागीय पोलीस अधिकारी, ५ पोलीस निरीक्षक आणि ६ विधी निदेशक यांच्या टीमने या तुकडीला तयार केले. या सगळ्यांसाठी प्राचार्य आणि त्यांच्या टीमने अहोरात्र कष्ट घेतल्याचे दीक्षांत संचलनावेळी जाणवून गेले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.के.वेंकटेशम् यांनाही या टीमचे कौतुक करण्याचा मोह आवरला नाही. पण, प्रशंसा करताना त्यांनी खात्यात प्रवेश करणाऱ्या नव्या दमाच्या या शिपायांना कार्यपद्धतीच्या नवसूत्रीचा मंत्र दिला. जबाबदारी, आत्मविश्वास, कर्तव्यपरायणता आणि प्रामाणिकता, अत्युच्च व्यावसायिकता, शिस्त, समाजसेवा, सतर्कता, निर्णय क्षमता तसेच धर्मनिरपेक्ष वृत्तीने कार्य करा, असा संदेश त्यांनी दिला.

एकूणच हे प्रशिक्षण या नव्या दमाच्या शूर शिपायासाठी अमृत ठरले आहे, असा विचार मनातून घेऊनच मी बाहेर पडले.

-संप्रदा द. बीडकर
प्र. जिल्हा माहिती अधिकारी, सांगली
comments