इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि सुरक्षितता

14/04/2014 12 : 51
     1197 Views

भारत निवडणूक आयोगाने मागीलप्रमाणे लोकसभेच्या विद्यमान निवडणूकांमध्येही इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करण्याचे ठरविले आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची रचना आणि कार्य यांची तसेच आयोगाने योजलेल्या प्रशासकीय सुरक्षा उपाययोजना याविषयी राजकीय पक्ष्‍ा, उमेदवार याबरोबरच इतर सर्व संबंधितांना तसेच आम नागरीकांना व सुजान मतदारांना परिचय करुन देण्यासाठी हा विशेष लेखःः...
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी भारताच्या निवडणूक आयोगाने मागील १६ वर्षांमध्ये ७५ पेक्षा अधिक सार्वत्रिक निवडणूकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा (इव्हीएम) वापर केलेला आहे. सन २००४ व २००९ मधील लोकसभा निवडणूका या संपूर्णपणे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर घेतल्या होत्या. निवडणूक आयोगाने सन २०१४ मधील लोकसभेच्या विद्यमान निवडणूकादेखील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर घेण्याचे ठरविले आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची रचना आणि कार्य यांची तसेच आयोगाने योजलेल्या प्रशासकीय सुरक्षा उपाययोजना याविषयी राजकीय पक्ष्‍ा, उमेदवार याबरोबरच इतर सर्व संबंधितांना तसेच आम नागरीकांना व मतदारांना परिचय करुन देणे आवश्यक आहे.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करण्याबाबत उमेदवारांचे व त्यांच्या प्रतिनिधीचे हक्क आणि कर्तव्य याविषयीची रुपरेषा समजावून घेणे प्रथम आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची (इव्हीएम) रचना अशी असते. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये नियंत्रण युनिट (सीयु) व मतदान युनिट (बीयु) आणि यास जोडणारी केबल यांचा समावेश होतो. नियंत्रण युनिट हे मतदान केंद्राध्यक्षाकडे ठेवले जाते. मतदान युनिट हे मतदान कक्षात ठेवले जाते. नियंत्रण युनिट व मतदान युनिट हे एका लांब केबलने जोडलेले असते. निवडणूकीत वापरावयाची मतपत्रिका ही मतदान युनिटवर लावली जाते.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरुन मतदान करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. मतदाराची ओळख पटल्यानंतर आणि पक्की शाई लावल्यानंतर मतदाराला मतदान कक्षात पाठविले जाते. त्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष, नियंत्रण युनिटवरील बॅलेट बटन दाबुन बॅलेट युनिट मतदानासाठी सज्ज करेल. त्यानंतर मतदार त्याच्या पसंतीच्या उमेदवाराचे बटन दाबून त्याचे मत नोंदविल. एकदा का मत नोंदविण्यात आले की, ज्याच्यासाठी मत देण्यात आले त्या उमेदवाराच्या नावासमोरील लाल एलईडी दिवा प्रज्वलित होतो आणि मोठयाने बीप असा आवाज ऐकू येतो. पुढच्या मतदानासाठी मतदान केंद्राध्यक्ष पुन्हा एकदा बॅलेट बटन दाबेपर्यंत मतदान युनिट निष्क्रिय बनते, त्यामुळे मतदार एकापेक्षा जास्त मत देऊ शकत नाही.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातील तांत्रिक सुरक्षा वैशिष्ट्ये जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. अनेक कारणांसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (इव्हीएम) हे अत्यंत सुरक्षित यंत्र आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात वापरलेली सुक्ष्मनियंत्रक (मायक्रो कन्ट्रोलन) चिप ही एकदाच प्रक्रिया योजक असते. या चिपमधील सॉफ्टवेअर कोड (कार्यप्रणाली संकेतांक) वाचता येऊ शकत नाही किंवा त्याच्यावर काहीही लिहीताही येऊ शकत नाही. ही कार्यप्रणाली (सॉफ्टवेअर) बीईएल, इसीआयएल यांनी स्वतंत्रपणे विकसित केली आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हे स्वयंपूर्ण (स्टँड अलोन) यंत्र असून ते कोणत्याही नेटवर्क मधून दुरुन चालविता येत नाही. या यंत्रामध्ये कोणतीही कार्यप्रणाली वापरलेली नाही.
प्रशासकीय उपाययोजना आणि उमेदवारांची व त्यांच्या प्रतिनिधींची भूमिका महत्वाची आहे. आयोगाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासाठी परिपूर्ण प्रशासकीय सुरक्षा उपाययोजना केलेल्या आहेत. राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांनी या उपाययोजनांमध्ये महत्वाची भूमिका बजावयाची असून या उपाययोजना संपूर्ण पारदर्शक आहेत.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, विशेष सुरक्षेत गोदामांमध्ये ठेवली जातात. या गोदामांना केवळ एकच दरवाजा असतो आणि खिडकी किंवा गवाक्ष यांच्यासह कोणताही प्रवेशमार्ग नसतो. या दरवाज्याला दुहेरी कुलुपबंद यंत्रणा असते. या दुहेरी कुलुपाची एक चावी गोदाम प्रभाऱ्याकडे ठेवलेली असते आणि दुसरी चावी उपविभागीय दंडाधिकाऱ्यापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याकडे ठेवण्यात येते. किमान २४ तास आधी राजकीय पक्षांना लेखी स्वरुपात कळविण्यात आल्यानंतरच गोदाम उघडण्यात येते. गोदामास दिवसरात्र (२४ ु ७) पोलीस सुरक्षा रक्षक ठेवण्यात येतात.
प्रत्येक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची प्रत्येक निवडणूकीपूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत, यंत्र तयार करणाऱ्या कंपनीच्या अभियंत्याद्वारे तपासणी केली जाते. या प्रक्रियेस इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची प्रथमस्तरीय तपासणी असे म्हणतात. प्रथमस्तरीय तपासणीमध्ये बीईएल व इसीआयएल यांचे अभियंते यंत्र स्वच्छ करतात आणि ते यंत्र संपूर्ण कार्यक्षमतेने चालत असल्याची तपासणी करतात. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे सर्व भाग हे मूळ भाग आहेत असे देखील ते प्रमाणित करतात. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची तपासणी केल्यानंतर विशेष करुन तयार केलेली विशिष्ट अनुक्रमांक (युनिक सिरियल नंबर) असणारी गुलाबी रंगाची कागदी मोहोर, नियंत्रण युनिट भोवती अशाप्रकारे लावतात की, मोहोर तोडल्याशिवाय युनिट उघडता येऊ शकणार नाही. गुलाबी कागदी मोहोरवर, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची स्वाक्षरी घेण्यात येते. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी, यादृच्छिकपणे (रँडमली) निवडलेल्या ५ टक्के इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर १००० मते नोंदवून अभिरुप मतदान घेण्यात येते. अभिरुप मतदानाचा निकाल आणि मतदान केलेल्या सर्व मतांची अनुक्रमांकवार मुद्रित प्रत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दाखविण्यात येते. विशिष्ट (युनिक) क्रमांक असलेली ही गुलाबी कागदी मोहोर, सिक्युरीटी प्रेस, नाशिक येथे तयार केली जाते. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रिकरण करण्यात येते.
मतपत्रिका निश्चित केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर मतदारसंघातील उमेदवारांच्या संख्येनुसार, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत, उमेदवाराचा भाग (कँडिडेट सेट) कार्यान्वित केला जातो. या प्रकियेमध्ये मतदान युनिटवर मतपत्रिका लावली जाते आणि निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या एकूण संख्येइतके पॅनल अधिक वरीलपैकी कोणीही नाही ‘एनओटीए’ या करीता एक अतिरिक्त पॅनल अशाप्रकारे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र तयार केले जाते. यावेळी पुन्हा एकदा उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांनी यादृच्छिकपणे (रँडमली) निवडलेल्या ५ टक्के इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर १००० मते नोंदवून अभिरुप मतदान घेण्यात येते. अभिरुप मतदानाचा निकाल आणि नोंदविलेल्या मतांची अनुक्रमानुसार मुद्रित प्रत, उमेदवारांना, त्यांच्या प्रतिनिधींना दाखविण्यात येते. विशिष्ट (युनिक) अनुक्रमांक असलेली आणि सिक्युरीटी प्रेस, नाशिक येथे तयार केलेली एक गुलाबी कागदी मोहोर मतदान युनिटवर अशाप्रकारे लावले जाते की, मोहोर तोडल्याशिवाय युनिट उघडता येऊ शकत नाही. गुलाबी कागदी मोहोरवर उमेदवारांची व त्यांच्या प्रतिनिधींची स्वाक्षरी घेण्यात येते. या संपुर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रिकरण केले जाते.
मतदानाच्या दिवशी अभिरुप मतदानाव्दारे (मॉक पोल) तपासणी केली जाते. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी प्रत्येक मतदान केंद्रावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर किमान ५० मते नोंदवून पुन्हा अभिरुप मतदान घेण्यात येते. हे उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत केले जाते. अभिरुप मतदानाचा निकाल, मतदान प्रतिनिधींना दाखविला जातो. अभिरुप मतदान पुसून किंवा काढून टाकल्यानंतर, नियंत्रण युनिट (सी.यु.) कागदी मोहोर व दोऱ्याची मोहोर लावून मोहोरबंद केले जाते. अशा मोहोरांवर सर्व उमेदवारांना, त्यांच्या मतदान प्रतिनिधींना त्यांच्या स्वाक्षऱ्या करण्याची परवानगी दिली जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि मतदान केंद्राध्यक्षांनी अभिरुप मतदान प्रमाणपत्र दिल्यानंतरच प्रत्यक्ष मतदान सुरु केले जाते. मतदानाच्या कालावधीत, जर कोणत्याही कारणास्तव इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्र बदलण्यात आले तर अशा नवीन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर देखील अशा प्रकारे अभिरुप मतदान घेतले जाते.
शेवटच्या मतदाराने त्याचे मत नोंदविल्यानंतर नियंत्रण युनिटवरील बंद हे बटन दाबून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातील मतदान बंद केले जाते. अशा रितीने मतदान बंद केल्यानंतर, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात कोणतेही मत देता येऊ शकत नाही. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे संबंधित वाहक पेटयांमध्ये ठेवली जातात व दोऱ्याच्या मोहोरचा (थ्रेड सिल) वापर करुन वाहक पेटया मोहोरबंद केल्या जातात. उपस्थित उमेदवारांना, मतदान प्रतिनिधींना अशा मोहोरवर त्यांची स्वाक्षरी करण्याची परवानगी दिली जाते.
मतदान केलेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे पोलीस पहाऱ्यात मतदान केंद्रापासून मतदान यंत्रे जमा केंद्रापर्यंत नेली जातात. उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या सोबत जाण्याची मुभा आहे. त्यानंतर मतदान केलेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे खास करुन या प्रयोजनासाठी तयार केलेल्या सुरक्षित कक्षात (स्ट्राँग रुम) ठेवली जातात. सुरक्षित कक्षात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ठेवल्यानंतर सुरक्षित कक्ष मोहोरबंद केला जातो. उमेदवारांना व राजकीय पक्षांना कुलुपावर त्यांच्या स्वत:च्या मोहोरा लावण्यास परवानगी दिली जाते. सुरक्षित कक्षावर रात्रंदिवस (२४ ु ७) सशस्त्र पोलीस पहारा ठेवला जातो आणि तसेच दिवसरात्र (२४ ु ७) सीसीटीव्हीच्या व्याप्तिक्षेत्राखाली ठेवले जाते. राजकीय पक्षांना, उमेदवारांना व त्यांच्या प्रतिनिधींना, सुरक्षित कक्षावर चोवीस तास अखंडपणे पहारा ठेवण्यास परवानगी दिली जाते. या प्रयोजनासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांकरीता व त्यांच्या प्रतिनिधींकरीता पुरेशा सुविधा पुरविणे आवश्यक आहे. एकदा सुरक्षित कक्ष मोहोरबंद केला की तो केवळ मतमोजणीच्या दिवशी उमेदवारांच्या व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येतो.
इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रावर लावावयाच्या निरनिराळया मोहरा आहेत. प्रथमस्तरीय तपासणीच्यावेळी नियंत्रण (कंट्रोल) युनिटवर गुलाबी कागदी मोहोर व उमेदवाराच्या भागाच्या वेळी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या निश्चित केल्यांनतर व बॅटरी बसविल्यानंतर नियंत्रण युनिटच्या उमेदवाराच्या भागासाठी (सेट) व पॉवर पॅक (बॅटरी) भागासाठी दोऱ्याची (थ्रेड) मोहोर लावली जाते. मतदान युनिटवर (बीयु) मतपत्रिका लावल्यानंतर मतपत्रिका स्क्रिनसाठी दोऱ्याची मोहोर लावली जाते. त्यानंतर मतदान युनिटच्या (बीयु) पत्ता खूणचिठ्ठी (ॲड्रेस टॅग्ज) असलेल्या दोऱ्याच्या दोन मोहोरा व मतदान युनिटवर (बीयु) गुलाबी रंगाची कागदी मोहोर लावली जाते.
मतदान केंद्रामध्ये अभिरुप मतदान घेतल्यानंतर नियंत्रण युनिटच्या (सीयु) निकाल भागाकरीता (रिझल्ट सेक्शन) मतदान प्रतिनिधी व मतदान केंद्राध्यक्षाने स्वाक्षरी केलेली हिरव्या रंगाची कागदी मोहोर, निकाल भागाच्या आतील भागाकरीता विशेष खुणचिठ्ठी असलेली दोऱ्याची मोहोर, नियंत्रण युनिटच्या (सीयु) निकाल भाग व खालील भाग यांना आच्छादित करणारी बाहेरील कागदी पट्टी मोहोर आणि तळाच्या कक्षाकरीता (बॉटम कंपार्टमेंट ) पत्ता, खूणचिठ्ठी असलेली दोऱ्याची (थ्रेड मोहोर ) मोहोर लावली जाते.
मतमोजणीच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रे, मतमोजणी टेबलावर आणली जातात आणि मोहोरा व मोहोरांचा विशिष्ट क्रमांक सुस्थितीत असल्याची पडताळणी केल्यानंतर एकापाठोपाठ एक याप्रमाणे नियंत्रण युनिटवरील (सीयु) निकाल बटन दाबून निकाल तपासला जातो. निकाल बटन दाबल्यावर नियंत्रण युनिटच्या (सीयु) दर्शनी भागावर निकाल दिसू लागतो. हा निकाल उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींना, त्यांची खात्री होण्याकरीता दाखविला जातो. त्यानंतर मतमोजणी पर्यवेक्षक, नमुना-१७-क मध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रनिहाय निकाल नोंदवितात आणि त्यानंतर तो फेरीनिहाय निकालाचे संकलन करण्याकरीता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येतो.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे रँडमायझेशन म्हणजे थोडक्यात सरमिसळ केली जाते. संगणक सॉफ्टवेअरचा वापर करुन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची दोन वेळा सरमिसळ केली जाते. जिल्हयामध्ये उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे विधानसभा मतदार संघांना सरमिसळ करुन वाटप करण्यासाठी पहिले रँडमायझेशन केले जाते व दुसरे रँडमायझेशन हे विधानसभा मतदारसंघात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे, विशिष्ट मतदान केंद्रांना वाटप करण्यासाठी केले जाते.
या प्रक्रीयेमध्ये संकीर्ण पादर्शकता उपाययोजना राबविली जाते. प्रथमस्तरीय तपासणी, रँडमायझेशन, उमेदवाराचा भाग (सेट), अभिरुप मतदान (मॉक पोल), मोहोर लावणे, वाहतूक, साठवण व मतमोजणी यासह इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील सर्व प्रक्रिया राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत केली जाते. यासाठी संपूर्णपणे पारदर्शकता व सुरक्षितता पाळली जाते. त्यामुळे आपले दिलेले अनमोल मत हे अत्यंत सुरक्षित आणि गोपनीय आहे याची सर्व मतदारांनी निसंकोचपणे खात्री बाळगली पाहिजे. फक्त मतदान करायला चुकवू नका. आवर्जून मतदान करायला मात्र विसरू नका. चला तर मगः मतदानाच्या दिवशी आपल्या मतदान केंद्रावरः मतदानालाः.!!!

- अनिल आलुरकर
जिल्हा माहिती अधिकारी, बीड
comments