स्वातंत्र्याची ६६ वर्षे...

14/08/2013 23 : 34
     620 Views

‘पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका
मीच विनवीते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका’
कवी कुसुमाग्रज यांनी भारतमातेने तिच्या सुपूत्रांना केलेली कळकळीची विनंती या कवितेद्वारे मांडली. ती भारतमाता जीने तथागत भगवान बुद्ध या जगाला दिला, ती भारतमाता जीने मर्यादा पुरूषोत्तम प्रभू रामचंद्र या जगाला दिला, ती भारतमाता जीने योगेश्वर भगवान कृष्णा या जगाला दिला. एवढंच नाही या जगाला हे विश्वची माझे घर म्हणणारे ज्ञानेश्वर, नंतर युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज, या विश्वाला विश्वबंधुत्वाची शिकवण देणारे स्वामी विवेकानंद, सत्य आणि अहिंसेचे वृतस्थ महात्मा गांधी, फुले, शाहू, डॉ.आंबेडकर ही सर्व ज्या भारतमातेच्या कुशीत जन्माला आली त्या भारतमातेला तिच्याच पुत्रांसमोर हात जोडण्याची वेळ येते आहे.
सुमारे पावणे दोनशे वर्षे या देशावर इंग्रजांची जुलमी राजवट हुकूमत करत होती. ज्या भारताच्या घराघरात पूर्वी सोन्याचा धुर निघत होता त्याच देशाचा इंग्रजांच्या अत्याचारी राजवटीने अक्षरशः धुराडा करून टाकला.संपूर्ण भारतभूमी पारतंत्र्यांच्या गर्तेत गेली आणि तिचा सुपूत्र परकीयांच्या अत्याचारात भरडला जावू लागला. हळूहळू भारतीयांमध्ये इंग्रजांविरूद्ध असंतोष पसरू लागला आणि याची परीणिती भारतीय स्वातंत्र्य युद्धात झाली की, टिळकापासून ते महात्मा गांधीपर्यंत मोठमोठे नेते या स्वातंत्र्य युद्धानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतदेश स्वतंत्र झाला, पण पाकिस्तान व बांग्लादेश भारतापासून कायमचे वेगळे झाले.
भारतीय स्वातंत्र्य लढा या ठिकाणी सविस्तर मांडण्याचं प्रयोजन नाही, पण भारत स्वतंत्र झाला म्हणजे नेमकं काय झालं याचा विचार होणं महत्वाचं आहे. भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि त्यातून निर्माण झालेला भारताचा स्वातंत्र्य लढा हा केवळ ब्रिटीशांविरूद्धचा लढा नव्हता साम्राज्यवादी प्रवृत्ती व प्रेरणांविरूद्धचा तो एक व्यापक संघर्ष होता. आर्थिक व सांस्कृतिक शोषणाच्या साम्राज्यवादी धोरणांविरूद्ध भारतीय जनता उभी राहिली. सुमारे शतकभराच्या वैशिष्ट्येपूर्ण संघर्षानंतर भारताने आपले राजकीय स्वातंत्र्य मिळवले. या कालखंडात जे राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतीक, व वैचारीक बदल कळत नकळत घडत गेले त्यातून आजच्या भारताची उभारणी झाली. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे सर्वसमावेशक रूप लक्षात घेतल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते. या स्वातंत्र्य संग्रामातून केवळ राजकीय मूल्यांचा उदय झाला असे नाही तर नव्या आर्थिक, सामाजिक, वैचारीक व शास्त्रीय मूल्यांचा परिपोष होत गेला.
इंग्रजांच्या विरोधात एकत्र येण्यासाठी का असत नाही पण भारतीयांमध्ये एकीचे महत्व दिसून आलं आणि म्हणून महात्मा फुले एके ठिकाणी म्हणाले होते की, ‘इंग्रज जर भारतात आले नसते तर भारताचा विकास एवढा वेगात झाला नसता.’ भारताला स्वतंत्र होऊन आज ६६ वर्षे झाली पण भारत खरंच स्वतंत्र झाला का हा चिंतनाचा विषय आहे.
ज्या भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी हजारो हुतात्म्यांनी आपल्या प्राणांच्या आहुत्या दिल्या त्याच भारतमातेला तिच्याच सुपुत्रांनी आपलीच गुलाम बनवुन ठेवल आहे. आज भारत जरी प्रजासत्ताक असला तरी खरोखरीच त्यावर प्रजेची सत्ता आहे का हा प्रश्न आजही पडतो आहे. सव्वाशेकोटी लोकसंख्या असलेल्या या देशात स्वातंत्र्याच्या पन्नाशी नंतर सर्वच क्षेत्रात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. प्रजासत्ताक राष्ट्रामध्ये प्रजेची लुट करणाराची सत्ता स्थापित झाली आणि खेड्यांचा भारत जास्तच गरीब होत गेला. वरकरणी भौतिक सुविधांच्या बाबतीत भारताने कितीही प्रगती केली तरी भारतास स्वार्थी पुढा-यांनी पोखरून काढण्याच काम चालवलेल दिसतय. गरीबांच्या हक्काचे हजारो कोटी रूपये नेत्यांच्या खात्यावर परदेशात आहेत, हा पैसा पुढा-यांना मोठ बनवून जनतेला मात्र भिकारी बनवतो आहे. देशातील स्त्री आज सुरक्षित राहिली नाही. सावित्रीच्या लेकीला रस्त्यानं जीव मुठीत घेवून वागाव लागतय, भ्रष्टाचारी देशात जगात भारताचा वरचा क्रमांक लागतोय जगाला अहिंसेची शिकवण देणारा भारत हिंसाचारातही पुढारल्याचे काही उदाहरणे आहेत.
अशा या भारत देशात स्वातत्र्याचा ६६ वा वर्धापन दिन साजरा करत असताना प्रत्येकानं एक वैचारिक मंथन करण्याची गरज आहे. आज स्वातंत्र्य उपभोगत असताना आपण नेमके कुठे आहोत याचा विचार व्हायला पाहीजे या देशाला इंग्रजांनी सोडल पण याच देशाचे सुपुत्र म्हणवून घेणारे काही राजकारणी नेते आणि पुढारी यांनी या देशातील इंग्रजी राजवट जणु आपल्या बाजुने जपून ठेवलीय की काय असं वाटल्या वचून रहात नाही आणि म्हणूनच कवी कुसुमाग्रजांनी भारतमातेचं हेच दुःख या ओळीतून व्यक्त केल आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत, सहिष्णु भारत, साक्षर भारत, सर्वगुण संपन्न भारत, असा भारत घडविण्यासाठी प्रत्येक नागरीकानं बांधील असायला हवं, टिळकांच्या, गांधीजींच्या, डॉ.आंबेडकरांच्या माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी प्रत्येक नागरीकानं प्रयत्नशील असावं व तत्पर असायला हव तरच भारत २०२० साली महासत्ता बनेल. जगाच्या इतिहासात ज्या देशाचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा त्याचा वर्तमान मात्र अंधारात जगतोय ही खेदजनक गोष्ट आहे.
म्हणून म्हणावेसे वाटते, ‘ भ्रष्टाचार, स्वार्थ, काळाबाजार, अन्याय अत्याचारा विरोधात ललकारीची तोफ उडवूया, चला देश घडवुया...!’
आजच्या या स्वातंत्र्याच्या सहासष्टी निमित्त या देशाच्या सुवर्ण इतिहासाचा बोध घेऊन उज्वल भविष्य घडवण्यासाठी सर्वजण देशोद्धाराच व्रत्त घेण्याचा संकल्प करून त्या दिशेने वाटचाल करण्यास सुरूवात करूया हीच या निमित्तान भारत मातेला खरी मानवंदना ठरेल.

अजयकुमार लोणके (B.J.)
वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड

comments