मेजवानी देऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देनारे वसंतराव नाईक

01/07/2013 20 : 26
     654 Views

२० फेब्रुवारी १९७५ रोजी वसंतराव नाईक पुणे येथे शासकीय दौ-यावर असतांना त्यांना त्यावेळी केंद्रातील गृहमंत्री उमाशंकर दीक्षित यांचा फोन आला आणि त्यांनी फोनवर सांगितले की, श्रीमती इंदिरा गांधी का कहना है की, मुख्यमंत्री पद का आपने इस्तिफा देना चाहीऐ। त्याच दिवशी नाईक मुंबईत आले आणि राज्यपाल अलियावर जंग यांना भेटून त्यांनी एक ओळीचा राजीनामा राज्यपालांना सादर केला.
५ डिसेंबर १९६३ रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर वसंतराव नाईक व आरूढ झाले. विधानमंडळ काँग्रेस पक्षाने त्यांची निवड केल्यावर त्यानी पदाची, गोपनियतेची शपथ घेतली. पुढे सव्वा अकरा वर्षे सलग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री राहणारे ते सोळा मुख्यमंत्र्यायांमध्ये एकमेव मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू सलग २३ वर्षे (१९७७-२०००), राजस्थानचे मुख्यमंत्री मोहनलाल सुखाडीया सलग १७ वर्षे (१९५४-१९७१), त्यानंतर देखशात सलग सव्वाअकरा वर्षे मुख्यमंत्री राहण्याचा सन्मान वसंतराव नाईक यांच्या नावावर आहे.
२१ फेब्रुवारी १९७५ रोजी वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. २० फेब्रुवारी १९७५ रोजी वसंराव नाईक पुणे येथे दौ-यावर असतांना त्यांना त्यावेळचे केंद्रातील गृहमंत्री उमाशंकर दीक्षित यांचा फोन आला आणि त्यांनी फोनवर सांगितले की, श्रीमती इंदिरा गांधीजी का कहना है की, मुख्यमंत्री पद का आपने इस्तिफा देना चाहीचे । त्याच दिवशी नाईक मुंबईत आले आणि राज्यपाल अलियावर जंग यांना भेटून त्यांनी एक ओळीचा राजीनामा राज्यपालांना सादर केला. पण आदल्या दिवशी पुण्याच्या भाषणात राजीनाम्याचा संदर्भ न देता ते सहज म्हणून गेले होते... महाराष्ट्राने मला सव्वाअकरा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद दिले. यापेक्षा मला आणखी काय हवे आहे ? मला महाराष्ट्राने भरभरून दिले आहे, माझ्या नेत्यांनी मला खूप मोठ्या सन्मानीत या पदावर बसवलेले आहे. त्या पदांवरून दुर होतांना मी पूर्ण समाधानी आहे.
विशेष म्हणजे, राजीनामा देऊन आल्यानंतर वसंतराव नाईक यांनी पायउतार होणारे मुख्यमंत्री म्हणून दुस-या दिवशी मुख्यमंत्री होणा-या शंकरराव चव्हाण यांना वर्षा बंगल्यावर एका मेजवानीसाठी आमंत्रित केले आणि आपल्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनाही त्यांनी आमंत्रित केले. ‘उद्या मुख्यमंत्रीपद सोडायचे आहे’ हे माहित असतांना कुठलाही मानसिक ताण वसंतराव नाईक यांच्या चेह-यावर कोणालाही दिसला नाही. उलट शंकरराव चव्हाण यांचे स्वागत करून वसंतराव नाईक यांनी स्वतःतर्फे त्यांना एक भले मोठे चांदीचे तबक भेट दिले. मेजवानी संपल्यानंतर मंत्रिमंडळातले सर्व मंत्री हास्तांदोलन करून वसंतरावजींचा निरोप घेत होते, तेव्हा मधुकरराव चौधरी, शेषराव वानखेडे यांचे डोळे आश्रुंनी भरलेले होते. वसंतरावजी त्यांना म्हणाले, ‘राजकारणात चढउतार असतात. मनाला लावून घेऊ नका. तटस्थ राहायची सवय लावून घ्यायची असते...’ आणि या संपूर्ण कार्यक्रमात वसंतराव नाईक यांचा वावर जणू तेच परत मुख्यमंत्री झाले आहेतख इतका सहज आणि मनस्वी होता.
महाराष्ट्रात त्यानंतर शेकरराव चव्हाण, बॅ.ए.आर. अंतुले, वसंतदादा पाटील, शिवाजीराव निलंगेकर, शंकराराव चव्हाण, सुधाकारराव नाईक, मनोहर जोशी यांना वेगवेगळ्या कारणांनी मुख्यमंत्रीपदाचे राजीनामे द्यावे लागले. शंकरराव चव्हाण यांना विधानमंडळ बैठकीत (१९७७) अपमानित होवून राजीनामा द्यावा लागला. बॅ.अंतुले, निलंगेकर यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राजीनामा द्यावा लागला. श्रीमती प्रभाव राव यांना प्रदेशाध्यक्ष केले त्याच्या निषेधार्थ वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. शंकरराव चव्हाण यांना दिल्लीत अर्थमंत्री करण्यात आले म्हणून त्यांनी आपला राजीनामा दिला (१९८८) आणि सुधाकरराव नाईक यांना काँग्रेस पक्षातील शरद पवार गटाने कोंडीत पकडल्यामुळे राजीनामा द्यावा लागला (१९९३) मात्र या सर्व राजीनाम्यामध्ये ‘राजीनामा’ नव्हता तर ‘ना-राजी’ नामा होता. शिवसेनेचे मनोहर जोशी यांना बाळासाहेबांच्या दोन ओळींच्या पत्रामुळे राजीनामा द्यावा लागला तर अशोक चव्हाण यांना त्यांच्याच ‘आदर्श’ कर्मामुळे राजीनामा द्यावा लागला. फक्त वसंतराव नाईक यांनी १९७५ साली अतिशय खुल्या मनाने मेजवानी देऊन राजीनामा दिला. देशात असा कोणताही मुख्यमंत्री नाही, की ज्याने येणा-या मुख्यमंत्र्याला मेजवानी देवून राजीनामा दिला. शिवाय शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्याबद्दल पहिला नागरी सत्कार वसंतराव नाईक यांनी पुसद येथे केला. हे उदाहरण पाहिले आणि शेवटचेच !

प्रा.पी.टी.चव्हाण
comments