‘जलदूत’ च्या पाणीपुरवठ्याने चार कोटी लिटरचा टप्पा ओलांडला !

2016-05-05 8:56:38
     267 Views

लातूर : शहरातील पाणी टंचाई लक्षात घेवून तातडीचा उपाय म्हणुन सुरु करुण्यात आलेल्या रेल्वेद्वारे पाणीपुरवठ्याच्या उपक्रमाने आज २४ व्या फेरीत एकूण ४ कोटी २० लाख लिटर पाणीपुरवठ्याचा टप्पा ओलांडला.

लातूर शहरातील पाणी टंचाई लक्षात घेवून सरकारप्रसंगी रेल्वेने पाणीपुरवठा करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यानंतर महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथराव खडसे आणि पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी ५ एप्रिल रोजी लातूर शहराला भेट देवून रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली होती आणि पंधरा दिवसात पाणीपुरवठा सुरु करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या नेतृत्वाखाली महसूल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिका, महावितरण आदी यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेवून रेल्वेने येणारे पाणी उतरवून घेणे, त्याची जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत वाहतूक करणे आणि तेथून शहरात त्याचे वितरण करणे याबाबींसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांची उभारणी केली. त्यात पाणी साठविण्यात येणाऱ्या विहीरीची स्वच्छता आणि डागडुजी, रेल्वे टँकरमधील पाणी साठवण विहीरीपर्यंत वाहून नेण्यासाठी सुमारे ८०० मिटर लांबीची पाईपलाईन अंथरणे, पाणी वाहतुकीसाठी टँकर पॉईंटची उभारणी करणे, विहीरीपासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी सुमारे ३ किलोमीटर लांबीची पाईपलाईन अंथरणे आणि पाणी उपशासाठी विहीरीवर १२ मोटारी बसविणे तसेच त्यांच्या वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र फिडर उभारणे अशा बाबींचा समावेश आहे.

मिरज येथून १० टँकरने ५ लाख लिटर पाणी घेवून येणाऱ्या पहिल्या रेल्वेचे आगमन १२ एप्रिल रोजी झाले. या पद्धतीने ९ दिवस ४५ लाख लिटर पाणी आणण्यात आले. त्यानंतर २० एप्रिलपासून ५० टँकरने २५ लाख लिटर पाणी आणण्यास सुरुवात झाली. लातूर शहरासाठी रेल्वेने आजवर ४ कोटी २० लाख लिटर पाणी आणण्यात आले आहे.

या पाण्याच्या वितरणांसाठी महापालिकेने टँकरची व्यवस्था केली आहे. पाणी वितरणांवर महापालिकेचे तसेच राज्य शासनाचे अधिकारी-कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक टँकरला जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच पाणी वितरणाच्या वेळी संबंधीत प्रभागातील रहिवाशांच्या प्रातिनिधीक स्वरुपात सह्याही घेतल्या जात आहेत.

लातूर शहरासाठी रेल्वे आणि इतर स्थानिक स्त्रोतातून होणारा दैनंदिन पाणीपुरवठा शहराची एका दिवसाची संपूर्ण गरज भागवणारा नाही, ही बाब लक्षात घेवून नागरिकांनी टँकरद्वारे ठरवून दिलेल्या प्रमाणातच पाणी घ्यावे. त्यात कोणताही हस्तक्षेप करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
comments