‘मेक इन इंडिया सप्ताह’

17-02-2016 : 07:13:21
     275 Views

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या उपक्रमांपैकी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणजे ‘मेक इन इंडिया’ हा होय.

१५ ऑगस्ट २०१४ रोजी दिल्ली येथील लाल किल्ल्यावरुन स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात पंतप्रधानांनी प्रथम ‘मेक इन इंडिया’ ही संकल्पना मांडली. त्यानुसार महिनाभरातच, २५ सप्टेबर २०१४ पासून ‘मेक इन इंडिया’ या अभियानास सुरुवात झाली. थोर देशभक्त, तत्त्वज्ञ पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा २५ सप्टेबर हा जन्मदिन या अभियानाच्या प्रारंभासाठी निवडण्यात आला.

देशातील उत्पादन क्षेत्राला चालना मिळावी, देशात विदेशी गुंतवणूक होऊन भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. सध्या राष्ट्रीय उत्त्पन्नात उत्पादन क्षेत्राचा वाटा जवळपास १५ टक्के इतकाच आहे. हा वाटा वाढून तो किमान २५ टक्के इतका व्हावा यासाठी अभियान कार्यरत आहे.

या अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील उद्योजक आणि उद्योगांना प्रथम देशांतर्गत गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आपल्या विविध परदेश दौऱ्यांमध्ये सातत्याने यशस्वी प्रयत्न केले आहेत. तसेच भारतात भेटीसाठी येणाऱ्या विदेशी शिष्टमंडळांसमवेत देखील यादृष्टीने सकारात्मक चर्चा आणि सामंजस्य करार होत आहेत.

या अभियानासाठी भारत सरकारने २५ प्राधान्य क्षेत्र निश्चित केली आहेत. या प्राधान्य क्षेत्रांचा विचार करताना जेथे थेट विदेशी गुंतवणुकीची अधिक शक्यता आहे आणि भारत सरकारचा पाठिंबा असू शकेल अशा बाबींचा विचार करण्यात आला.

ही २५ प्राधान्य क्षेत्रे अशी :-
१) वाहन उद्योग २) वाहनांचे सुटे भाग ३) हवाई क्षेत्र ४) बायोटेक्नोलॉजी ५) रसायने ६) बांधकाम ७) संरक्षण उत्पादन ८) विद्युत यंत्रणा ९) इलेक्ट्रॉनिक यंत्रणा १०) अन्न प्रक्रिया ११) माहिती तंत्रज्ञान १२) चर्मउद्योग १३) माध्यमे आणि मनोरंजन १४) खनिकर्म १५) तेल आणि गॅस १६) औषध उत्पादन १७) बंदरे १८) रेल्वे १९) अपारंपरिक ऊर्जा २०) रस्ते आणि महामार्ग २१) अंतराळ क्षेत्र २२) वस्त्रोद्योग २३) वीज निर्मिती २४) पर्यटन आणि हॉटेल व्यवसाय आणि २५) आरोग्य.

भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या अभियानाला महाराष्ट्र राज्यात मोठी चालना मिळावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यापासून मोठी चालना दिली आहे. यासाठी महाराष्ट्रात मेक इन इंडियाच्या धर्तीवर ‘मेक इन महाराष्ट्र’ हे अभियान राबविण्यात येत आहे. राज्यातील उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक वाढविणे, रोजगार निर्मिती, राज्याचा विकास दर वाढविणे, कौशल्य विकास क्षेत्रात नवे उपक्रम सुरु करणे, पायाभूत सुविधांचा विकास करणे यांचा या अभियानात समावेश आहे.

देशात विदेशी गुंतवणूक वाढण्याच्या दृष्टीने भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मैदानावर १३ ते १८ फेब्रुवारी २०१६ दरम्यान भव्य दिव्य ‘मेक इन इंडिया’ सप्ताह साजरा करण्यात येत आहे. भारताची उत्पादन क्षेत्रातील डिझाईन्स, नाविन्य आणि शाश्वतता प्रदर्शित करणारा हा एक महासोहळा आहे.

सोहळ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सप्ताहाचे उदघाटन होईल. त्याच दिवशी सायंकाळी टाईम इंडिया पुरस्कार प्रदान करण्यात येतील. दुसऱ्या दिवशी १४ फेब्रुवारी रोजी सीएनएन आशिया बिझनेस फोरम, क्षेत्रीय चर्चासत्रे आणि देशीय सत्रे होतील तर सायंकाळी महाराष्ट्र रजनी हा कार्यक्रम होईल. १५ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र गुंतवणूक चर्चा सत्र, मेक इन मुंबई चर्चासत्र होतील. १६ फेब्रुवारी रोजी ड्रायव्हिंग इनोव्हेशन हॅकॅथोन, मेक इन इंडियासाठी इंडस्ट्री-ॲकॅडेमिया हा परिसंवाद होईल. तर सायंकाळी एलिफंटा महोत्सव, फ्युजन आणि शास्त्रीय मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. १७ फेब्रुवारी रोजी एम्पॉवरिंग थ्रु डिझाईन या विषयावरील परिसंवाद तसेच ‘मेक इन इंडिया’ मासिकाचे विमोचन होईल. सायंकाळी एलिफंटा महोत्सव आणि टेक्स्टाईल शो होईल. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच १८ फेब्रुवारी रोजी क्षेत्रीय आणि देशीय चर्चा सत्रे होतील. त्यानंतर सप्ताहाचा समारोप होईल.

या सप्ताहाच्या माहितीसाठी आणि नोंदणीसाठी आपणwww.makeinindia.com/mumbai-week/visitors-registration येथे भेट द्या. या सप्ताहाविषयी बोलताना मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणतात, ‘जगाच्या स्वागतासाठी सज्ज झाले भारताच्या विकासाचे महाद्वार. मेक इन इंडियाच्या मंत्रासह अग्रेसर महाराष्ट्र ’

-देवेंद्र भुजबळ,
संचालक (माहिती)(प्रशासन)
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दूरध्वनी क्र.०२२-२२०२४९६१,
comments