पंतप्रधानांना प्रेरणा देणारे गाव - गंगादेवीपल्ली!


गंगादेवीपल्ली! तेलंगणच्या वारंगल जिल्ह्यातील हे छोटेखानी गाव गेल्या वर्षापासून विशेष चर्चेत आले असून, असे होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘संसद आदर्श ग्राम योजने’ ची घोषणा करताना देशभरातील ज्या काही मोजक्‍या गावांपासून प्रेरणा घेतली त्यापैकी हे एक गाव.
या साऱ्या योजनेची पार्श्‍वभूमी म्हणजे गेल्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर जी गावे आदर्श गाव म्हणून घोषित करण्यात आली, त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिवरे बाजार व गुजरातमधील पुन्सारी या गावांच्या जोडीलाच आंध्रच्या गंगादेवीपल्ली या गावाचाही समावेश होतो, हे या संदर्भात उल्लेखनीय आहे.
गंगादेवीपल्लीची आदर्श गाव म्हणून निवड करण्यामागे मुख्य कारण होते ते म्हणजे गावकऱ्यांनी गावच्या विकासासाठी गावकऱ्यांच्या समित्यांमार्फत केलेल्या सफल सामुहिक प्रयत्नांची. याच कारणाने तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्य स्तरावरील ‘ग्राम ज्योती’ अभियानाची घोषणा करण्यासाठी पण याच गंगादेवीपल्ली गावची निवड केली होती हेही विशेष आहे. जेमतेम १३५२ लोकसंख्येच्या गंगादेवीपल्लीला शासकीय मानमरातब मिळण्याचे मोठे नावीन्य नाही. सुमारे २० वर्षांपूर्वी म्हणजेच १९९५ मध्ये गावाच्या विकासकामांच्या आधारे तत्कालीन राज्य सरकारने गंगादेवीपल्लीला विशेष पंचायतीचा दर्जा दिला होता. त्यानंतर २००७ मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर देशातील सर्वोत्तम पंचायतीचा पुरस्कार पण गंगादेवीपल्लीला दिला व गावाला राष्ट्रीय स्तरावर अव्वलतेच्या संदर्भात मान्यता मिळाली.
गावातील महिलांच्या संदर्भातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे १९९५ ते२००६ या कालावधीतील दोन सलग कार्यकालाच्या दरम्यान गंगादेवीपल्लीचे प्रशासन गावाच्या महिलांनीच सांभाळले व आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केले. याच दरम्यान गावात संपूर्ण दारूबंदी आणि शंभर टक्के साक्षरतेचा प्रसार-प्रचारच नव्हे तर या तत्त्वांची अंमलबजावणी पण झाल्याने गंगादेवीपल्लीच्या पुरुष मंडळींनी महिलांच्या प्रशासन क्षमतेची नेहमीच दखल घेतली.
गंगादेवीपल्लीमध्ये एवढे व्यापक परिवर्तन घडून येणे सहजशक्‍य नव्हते. गावातील समस्या सोडविण्यासाठी १९९३ मध्ये ‘बाल विकास’ या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेऊन ५२ हजार ५०० रुपये खर्चून पाण्याच्या दोन टाक्‍या बांधून देण्याची तयारी दाखवली. मात्र, त्यासाठी गावकऱ्यांनी एकूण खर्चाच्या १५ टक्के रक्कम गाव-वर्गणीतून गोळा करण्याची अट घातली. गावाचे युवा सरपंच कुसम राजमौली यांच्यासमोर गावकऱ्यांच्या गळी गाव-वर्गणीची बाब उतरवून, हे सारे घडवून आणणे हे सहजशक्‍य नव्हते; पण मोठ्या जिद्दीने राजमौली यांनी गावकऱ्यांना राजी केले व त्यानंतर गावकऱ्यांच्या सामुदायिक सहभागाची व समित्यांद्वारे सामाजिक काम करण्याची परंपराच गावात सुरू झाली, ती कायमची.
त्यानंतर राजमौलीच्या पुढाकाराने व गावकऱ्यांच्या सहकार्याने गंगादेवीपल्लीमध्ये नंतरच्या काळात घरटी शौचालयासारख्या योजनेची यशस्वी अंमलबजावणी केली गेली आहे. यामध्ये घरोघर नळाद्वारे पाणी पुरवठ्याचा पण समावेश आहे. हे सारे घडविण्यासाठी सरपंच राजमौली यांनी गावाचा पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, वीज पुरवठा इत्यादीसाठी २५ समित्यांची स्थापना करून त्यामध्ये गावकऱ्यांना आवर्जून समाविष्ट केले. समित्यांच्या सदस्यांचा कालावधी दोन वर्षांचा असतो व ग्रामसभेत नवे सदस्य आणि समित्यांचे गठण करण्यात येते. प्रत्येक समितीत १० सदस्य असतात व प्रत्येक समिती सदस्य गावाच्या १० कुटुंबांच्या संपर्कात असतो. सहकार्यातून सामाजिक प्रगतीमुळेच गंगादेवीपल्लीची नोंद या राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानांपर्यंत व राज्य स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत घेण्यात आली.

दत्तात्रय आंबुलकर
साभार दै.प्रभात
comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)