विविध फुलपिकांशी जोडले नाते

2015-10-15 14:07:23
     489 Views

यवतमाळ जिल्ह्यात नेर तालुक्‍यातील लोणी येथील सुभाष उत्तमराव देशमुख यांच्याकडे प्रत्येकी पाच एकर बागायती आणि कोरडवाहू शेती आहे. घराला लागूनच त्यांची शेती आहे. सोयाबीन व कपाशी या पारंपरिक पिकांसोबत सात वर्षांपासून विविध फुलांचे उत्पादन घेऊन शेतीतील जोखीम त्यांनी कमी केली आहे.
तीन एकरांत आवळा, त्यात झेंडू, मूग, सोयाबीनचे आंतरपीक घेऊन उत्पादन खर्च कमी करीत शेतीत नफा वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. खरे तर सुभाष यांचे भाऊ कै. भगवंत यांनी अभ्यास करून फुलशेतीस सुरुवात केली. मात्र २००५ मध्ये शेतातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. भावाचे फुलशेतीचे अपूर्ण स्वप्न सुभाषराव पूर्ण करीत आहेत. देशमुख यांच्याकडे गुलाबाची ३०० झाडे, एक एकरात झेंडू, तीन गुंठे वॉटर लिली, दोन गुंठे मोगरा व एक एकर अ‍ॅस्टर असतो.
गुलाब : घराला लागूनच पाच गुंठ्यांत गुलाब आहे. लागवड करण्यापूर्वी १० टड्ढॉली धरणातला गाळ व दोन टड्ढॉली शेणखत टाकून जमीन तयार केली. अमरावती येथून १४ रुपये प्रति नग दराने कलमे खरेदी केली. ग्लॅडिएटर जातीच्या कलमांची लागवड ५ ु ३ फूट अंतरावर आहे. पाण्याचे व्यवस्थापन पाटे पद्धतीने होते. दरवर्षी पाटे तयार करण्यापूर्वी शेणखत टाकून गुलाबाला भर दिली जाते. लागवडीपासून फूल काढणीपर्यंत जास्तीत जास्त सेंद्रीय खतांचा वापर होतो. शेणखत, टड्ढायकोडर्मा, निंबोळी अर्काबरोबर अन्य सेंद्रीय घटकांचा वापर कीडनियंत्रणासाठी होतो.
सध्या प्रतिदिन ५० फुलांचे उत्पादन मिळत आहे. हिवाळ्यात हेच उत्पादन १००
फुलांपर्यंत असते.
फुलांची विक्री नेर शहरातील फुलविके्रत्याला प्रतिनग एक रुपया दराने केली जाते. या हंगामात आतापर्यंत ५०० फुलांचे उत्पादन मिळाले. फुलशेती व्यवस्थापनात कुटुंबीयांची मोठी मदत मिळते. त्यांची पत्नी सौ. मीना, सून व दोन मुली दररोज सकाळी फुलांची काढणी करतात.
अ‍ॅस्टर : दरवर्षी फक्त जानेवारीत एक एकर क्षेत्रावर अ‍ॅस्टरच्या विविध वाणांची दोन ु दोन फूट अंतरावर लागवड होते. पिकास रासायनिक खते दिले जात नाहीत. लागवडीनंतर केवळ शेणखत दिले जाते. अ‍ॅस्टरवर मावा व तुडतुड्यांचा प्रादुर्भाव जाणवतो. त्यावर निंबोळी अर्क प्रति हातपंप २५ मि.लि. प्रमाणे फवारणी केली जाते.
जानेवारीत लागवड होऊन लग्नसराईच्या काळात फुले विक्रीस येतात. दरदिवशी २० ते २५ किलो
फुलांचे उत्पादन मिळते. नेर येथेच फूलविक्रेत्याला विक्री होते. १५ रु. प्रतिनगप्रमाणे दर मिळतो.अ‍ॅस्टरपासून सुमारे ४० ते ५० हजारांचे वार्षिक उत्पन्न मिळते. बाजारात चांगल्या प्रतीचे व खात्रीलायक अ‍ॅस्टरचे बियाणे मिळण्याची शक्‍यता कमी असल्याने घरचेच बियाणे देशमुख वापरतात. अशा प्रकारे उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न असतो.
झेंडू : आवळ्यात झेंडूचे आंतरपीक तसेच
मुगाचीही लागवड होते. मुगाच्या काढणीनंतर त्याची झाडे तेथेच गाडून हिरवळीचे खत म्हणून उपयोगात आणली जातात. दस-यापासून दिवाळीपर्यंत झेंडूची काढणी होते. १० क्विंटल झेंडूचे उत्पादन मिळते. २५ रुपये प्रती किलोप्रमाणे दर मिळतो. झेंडूचेही घरचेच बियाणे वापरले जाते. चांगल्या प्रतीची निवडक फुले राखून झेंडू व अ‍ॅस्टरचे बी तयार केले जाते.
* मोगरा : दोन गुंठे जागेवर मोग-याची ३०० झाडे आहेत. एप्रिल व मे कालावधीत एक ‍क्विंटल उत्पादन मिळते. १०० रुपये प्रती किलोप्रमाणे दर मिळतो. या पिकापासून आठ ते १० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. मोग-याला तोडणीचा खर्च जास्त असल्याचे देशमुख सांगतात. नियमितपणे मोग-याची छटाईही करावी लागते.
वॉटर लिली : सात वर्षांपूर्वी लागवड केलेली तीन गुंठ्यांतील वॉटर लिली देशमुख यांच्याकडे आहे. दरवर्षी सुमारे सात हजार चुड्यांचे उत्पादन मिळते. एका चुडीत ५० कळ्या असतात. पाच रुपये प्रति चुडी दर मिळतो. एकदा लागवड केलेल्या या पिकापासून सुमारे १० वर्षांपर्यंत उत्पादन मिळते. याचा व्यवस्थापन खर्च अत्यंत कमी असल्याचे देशमुख सांगतात.
समस्या : शेतीत सर्वांत जास्त समस्या मार्केटची जाणवते. जवळच्याच मार्केटवर अवलंबून राहावे लागत असल्याने विके्रता देईल तोच दर घ्यावा लागतो. इतर मार्केटकडे माल वळविल्यास वाहतूक खर्चात वाढ होऊन नफा कमी होण्याची शक्‍यता जास्त असते. शिवाय मार्केट लांब असल्यास दररोज फुले पोचविणे शक्‍य होत नाही, असे देशमुख म्हणाले.
आवळ्यापासूनही उत्पन्न : तीन एकरांत आवळ्याच्या १५० झाडांची लागवड केली आहे. उन्हाळ्यात एक-दोन पाणी देऊन उत्पादन घेतले जाते. २५ क्विंटल आवळ्यापासून सुमारे १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. आठ ते ११ रुपये प्रति किलोप्रमाणे व्यापा-याला विक्री केली जाते. आवळ्यात मूग व सोयाबीनचे आंतरपीक असते. सोयाबीनच्या आधीच मुगाची काढणी होत असताना त्याची पाने तोडून ती सोयाबीन पिकालगतच गाडली जातात. त्याचा खत म्हणून वापर होतो.
शेती तंत्रज्ञानची वैशिष्ट्ये
* सेंद्रीय शेतीवर भर
* बहुवार्षिक फुलपिकांना दरवर्षी मातीची भर, त्यापूर्वी शेणखत पसरवतात, पिकांवर निंबोळी अर्काची प्रतिबंधक फवारणी , घरच्याच बियाणांचा वापर
* कुटुंबाच्या मदतीने शेती
* एकाच विक्रेत्याला फुलांची विक्री * मागणी असणा-या फुलांचे उत्पादन
* आंतरपिके घेऊन उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न * आंतरपिकांचा हिरवळीचे खत म्हणूनही वापर * पिकांचे वैविध्य जपल्याने जोखीम कमी केली * घराजवळील पडीक जमिनीचा फुलशेतीसाठी वापर * शेतात विहीर आहे, मात्र त्याला पाणी कमी असल्याने कमी पाण्यात पिकांचे वैविध्य जपले आहे. * पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त. ठिबक सिंचनाऐवजी तुषार सिंचनाची व्यवस्था.
रसायनांचा वापर पूर्ण बंद. रासायनिक खतांच्या वापराने पिकांवर किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो असे देशमुख यांचे निरीक्षण आहे. त्यांच्या वापराने शत्रू किडीसोबत मित्र कीटकांचाही नाश होतो. पर्यायाने किडीच्या नियंत्रणासाठी वारंवार फवारण्या करून उत्पादनखर्चात वाढ होते. त्यामुळे १९९१ पासून रासायनिक घटकांचा वापर पूर्णतः बंद केला आहे. त्यामुळे रासायनिक खते व कीडनाशक फवारणी खर्चात बचत होत असल्याचे देशमुख सांगतात.

सुभाष देशमुख,
लोणी, ता. नेर, जि. यवतमाळ
comments