छत्रपती शिवाजी महाराज व्यवस्थापन गुरू आणि व्यूहरचनाकार

2015-02-19 20:57:47
     951 Views

‘छत्रपती शिवाजी’ हे सर्वांचेच लाडके दैवत. शिवरायांंवरची आजपर्यंतची बहुतेक पुस्तके ही घटनाप्रधान आहेत. अभ्यासाअंती आपल्याला असेही जाणवते की, ब-याच लेखकांनी आपापल्या सोयीनुसार इतिहासाची मांडणी केली आहे.शिवकालीन व्यक्तींना काही लेखकांनी हेतुपुरस्सरपणे दुर्लक्षून अथवा चुकीच्या पद्धतीने मांडून स्वत:चा दूषित दृष्टिकोन दाखवून दिलाय. मुळात घटना आणि घटनांमधील लोक प्रेरणादायी जरी असले तरी त्यांचा संदर्भ २१ व्या शतकाशी कसा व कितपत लागू होऊ शकतो, हे पाहणे आवश्यक ठरते. गेल्या दोन दशकांमध्ये जग विविध पातळ्यांवर वेगाने बदलत चाललेय. अशा एकूणच अनिश्चित- अनाकलनीय वातावरणात शिवरायांचे विचार व कार्यपद्धती आमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात, हे तरुण पिढीस तार्किक पद्धतीने सांगणे अत्यावश्यक आहे आणि हाच या पुस्तकाचा हेतू आहे.
स्वत:जवळ कुठलीही साधन-सामग्री फारशी उपलब्ध नसताना, बाकीचे मराठा सरदार परकीयांसमोर नतमस्तक होत असताना नि सारा समाज संभ्रमित-गलितगात्र झालेला असताना शिवाजी महाराजांनी जे ‘कल्पक धाडस’ केले, त्या धाडसाच्या व्यूहरचना प्रक्रिया आमच्या तरुणांना कळल्या पाहिजेत. शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कर्मयोगाची बैठक ही लोककल्याणकारी अशा अध्यात्मावर आधारलेली होती. पश्चिमी देशांचे अर्थशास्त्र आज हतबल ठरते आहे. पुन्हा एकदा भारताकडे जगाचे नेतृत्व करण्याची संधी चालून आली आहे. आमच्या येथील नतद्रष्टांवर मात करीत हे नेतृत्व अंगिकारण्याची ऊर्मी तरुणांमध्ये जागविण्यासाठी शिवरायांचे ‘आध्यात्मिक अर्थशास्त्र’ व्यवस्थितपणे
मांडण्याचा या लेखनाचा हेतू आहे. आजच्या ‘कॉर्पोरेट जगता’ चे नेतृत्व भल्या लोकांच्या हाती यायला हवं असेल, तर छत्रपतींच्या अनेक व्यूहनीतींचा साकल्याने विचार व अंगिकार करावा लागेल. ‘बळी तो कान पिळी’ सारख्या असुरी संस्कृतीस नामोहरम करण्यासाठी छत्रपतींच्या ‘सामाजिक’ विचारांचा नव्याने मागोवा घ्यावा लागेल.
ज्ञानाधारित वैचारिक
आधारामुळे शिवराय रयतेसाठी ‘कल्याणकारी राज्य’ उभे करू शकले, ज्या राज्यात ब्राह्मण, मराठा, कुणबी, माळी, धनगर, दलित, मुस्लिम अशा सर्वांनाच समान स्थान होते.
शिवरायांनी ‘भक्ती, ज्ञान, कर्म’ म्हणजे ‘आत्मा-मेंदू-शरीर’ या कार्यवाहकांची उत्तम सांगड घालताना मनोव्यवहाराची पथ्ये पाळली व एक सुदृढ-बलवान, परोपकारी व प्रगल्भ समाज उभा केला. चारित्र्यवान समाजाशिवाय नुसते स्वराज्य म्हणजे आत्म्याशिवाय शरीर होय. हे शिवरायांना नीटपणे माहीत असल्याने एका बाजूला अन्यायी, भ्रष्ट सत्ताधीशांचा सामना करीत दुस-या बाजूला चारित्र्य-व्यक्तिपरत्वे व प्रसंगानुरूप विविध उपायांचा वापर केला. कोणताही समाज जेव्हा वैचारिकदृष्ट्या पूर्णपणे प्रगल्भ होतो तेव्हाच तो ‘वैश्विक’ होतो व वैश्विक नेतृत्व करू लागतो. परंतु आजची सामाजिक स्थिती ही बरबटलेल्या अवस्थेत आहे. चारित्र्यवान समाजाच्या उभारणीसाठी एका बाजूला उत्तम सामाजिक मूल्यांची पुनर्बांधणी करावी लागेल आणि दुस-या बाजूला सर्वत्र वाढलेल्या विषवल्लीला उपटून फेकून द्यावे
लागेल. तेव्हा कुठे शिवरायांच्या विचारांचा, तत्त्वज्ञानाचा व कर्तृत्वाचा वारसा जपला जाईल.आज तुमच्या-माझ्या अंत:करणातला सुप्त आवाज आम्हाला साद घालतोय- ‘उठा, योद्धा-संन्यासी व्हा नि समग्र बदल घडवा.’ तब्बल चार शतकानंतर पुन्हा एकदा मशाली पेटायला हव्यात, पुन्हा एकदा ‘हर-हर महादेव’ ची गर्जना सह्याद्रीच्या कडेकपारीत निनादायला हवी, पुन्हा एकदा स्वार्थी- भेकड मुर्दाडपणा टाकून आम्ही आमचे क्षात्रतेज दाखवायला हवे नि पुन्हा एकदा ‘रयतेचे राज्य’ स्थापित व्हावयास हवे.
हे सारं घडायचं असेल तर ‘आज’ च्या अनुषंगाने ‘शिवनीती’ चा अभ्यास करावा
लागेल. छत्रपतींची एकूण विचारसरणी, त्यांचा कर्मयोग आणि उपभोगशून्य असे त्यांचे प्रभावशाली नेतृत्व आम्ही वैज्ञानिक-व्यूहात्मक- व्यवस्थापकीय व आध्यात्मिक अशा चारही अंगांनी जाणून घ्यायला हवे. शिवाजी महाराजांनी एकूणच राजकारणाची जी ‘समग्र
मूल्य-साखळी’ उभी केली होती ती आम्ही अत्यंत कसोशीने अभ्यासली पाहिजे. समर्थ रामदासांच्या भाषेत ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप’ एकूणच अशा अभ्यासाला कार्यान्वित करावे लागेल.
छत्रपती शिवाजी महाराज, लेखक : डॉ. गिरीश जाखोटिया
किंमत : २४५/-, प्रकाशक : साकेत प्रकाशन प्रा. लि.
औरंगाबाद/पुणे, मो. ९८८१७ ४५६०५
comments