महाराष्ट्रात चालेल अमित शहांची जादू?


भाजपाचे नवे अध्यक्ष अमित शहांबाबत महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बर्याच अपेक्षा आहेत. शहांनी उत्तर प्रदेशमध्ये घडवून आणलेल्या चमत्काराची पुनरावृत्ती महाराष्ट्रासह अन्य काही राज्यातील येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये व्हावी अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीने भाजपाचा मेकओव्हर करण्याचा शहा यांचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात त्यांचे काय प्रयत्न सुरू आहेत? ते यशस्वी होतील का?
यएक व्यक्ती एक पद’ या तत्त्वानुसार भाजपाच्या अध्यक्षपदी राजनाथसिंह यांच्या ऐवजी कोणाची तरी निवड होणार हे नक्की होते. त्यानुसार अमित शहा यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आणि कामाला सुरूवातही केली. अमित शहांबाबत महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बर्याच अपेक्षा आहेत. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीतील देदीप्यमान यशानंतर केंद्रात मोदींच्या नेतृत्त्वाखालील सरकार सत्तारूढ होताच महाराष्ट्रातील प्रभारीपदाची जबाबदारी अमित शहांवर सोपवण्याची मागणी पुढे आली होती. अमित शहांनी उत्तर प्रदेशमध्ये घडवून आणलेल्या चमत्काराची पुनरावृत्ती महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये व्हावी अशी अपेक्षा आहे. आता तर रितसर अध्यक्षपद हाती आल्यानंतर या अपेक्षेचे रूपांतर जबाबदारीत झाले आहे. महाराष्ट्राबरोबर अन्य काही राज्यांच्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळवून देण्यात अमित शहा कितपत यशस्वी ठरतात याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. त्या दृष्टीने भाजपाचा मेकओव्हर करण्याचा शहा यांचा प्रयत्न महत्त्वाचा ठरणार आहे. शहा यांनी विविध विभागांच्या बैठका घेऊन नवी नियमावली तसेच नवी व्यवस्था लावण्याचा प्रयत्न चालवला आहे. विशेषतः मंत्र्यांनी भाजपा कार्यालयात नियमितपणे बसून कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात यासाठी वेगळी नियमावली करण्यात येत आहे. मंत्र्यांनी महिन्यातून किमान एक दिवस पक्ष कार्यालयात थांबावे असेही बंधन घालण्यात आले आहे. या सार्या प्रयत्नांतून भाजपाचा चेहरामोहरा आणखी बदलण्याचा आणि त्याद्वारे चार राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवण्याचा अमित शहा यांचा प्रयत्न आहे हे स्पष्ट दिसते.

या पार्श्वभूमीवर अमित शहांची जादू महाराष्ट्रात कितपत चालेल याचा विचार करायला हवा. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा अजून जाहीर झाल्या नसल्या तरी महायुतीत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवरून जोरदार रणकंदन सुरू आहे. येत्या विधानसभा निवडणुकांनंतर महायुती सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असे पक्ष प्रवक्त्यांनी पुन्हा निक्षून सांगितले तर ज्यांच्या जागा जास्त त्याच पक्षाचा मुख्यमंत्री हाच निकष असेल असे स्पष्टीकरण भाजपातर्फे देण्यात आले आहे. या शिवाय दोन्ही पक्षांचा वाढीव जागांचा आग्रह लक्षात घेता जागावाटपाचा तिढा बराच गुंतागुंतीचा ठरण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत अमित शहा यांच्याकडून महायुतीची गाडी कशी काय रूळावर आणली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वास्तविक राज्यात संघटनात्मक पातळीवर भाजपाची स्थिती फार चांगली आहे असे म्हणता येणार नाही. मध्यंतरी सत्तेपासून दूर राहिल्याने नेते तसेच कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. खेडोपाडी, वाडय़ा-वस्त्यांवर पक्षाच्या शाखा काढणे, कार्यकर्त्यांशी नित्य संपर्क या पातळीवर फारसे प्रयत्न झालेच नाहीत. त्यामुळे काही अपवाद सोडले तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा पुरेसा प्रभाव दिसून आला नाही. त्या मानाने शिवसेना अजुनही ग्रामीण भागात थोडय़ा-बहुत प्रमाणात अस्तित्त्व राखून आहे. या परिस्थितीत यशत प्रतिशत’ भाजपा हे समीकरण अस्तित्त्वात आणण्यासाठी अमित शहांना बरेच परिश्रम घ्यावे लागणार आहेत. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील पक्षाचे सर्वसमावेशक आणि तळागाळातील जनतेच्या नेमक्या समस्यांची जाण असलेले गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली जाण्याने पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्याचे आव्हान उभे आहे. राज्यात नितीन गडकरींचा प्रभाव ठराविक भागातच दिसून येतो. त्यामुळे ते विधानसभा निवडणुकीत राज्यात पुरेसा प्रभाव पाडू शकतील का हा ही प्रश्न आहे. शिवाय शिवसैनिक आणि भाजपा कार्यकर्ते यांच्यातही पुरेसा ताळमेळ दिसत नाही. आजवर भाजपा आणि शिवसेना या दोघांचीच युती असल्याने जागावाटपही याच दोघांमध्ये होत होते. परंतु आता स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष महायुतीत आहेत. शिवाय केंद्रात भाजपाप्रणित आघाडीची सत्ता आल्याने राज्यातही सत्ता मिळण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि त्यातून महायुतीतील घटक पक्षही अधिक जागा आपल्याला मिळण्याबाबत आग्रही आहेत. या सार्या बाबींचा विचार करून महायुतीतील घटक पक्षात योग्य समन्वय तसेच तळागाळातील भाजपा-सेनेच्या कार्यकर्त्यांची मोट बांधून, नेत्यांना कामाला लावून मोर्चेबांधणी करण्याच्या आघाडय़ांवर शहांचा कसा भर राहतो यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे.
उत्तम व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर उत्तर प्रदेशसारख्या राज्यात चौथ्या स्थानावर असलेल्या भाजपाला अमित शहांनी थेट अव्वल स्थानी आणले. गुजरातमधील मोदींचे निकटचे सहकारी या नात्याने बलाढय़ नेते ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हा अमित शहा यांचा अल्पावधीतील प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे. याचे अप्रूप आणि कुतुहल अनेकांना असले तरी शहा यांचा इतिहास या निवडीमुळे पुसला जाणार नाही हे ही तितकेच खरे. अमित शहा यांनी उत्तर प्रदेश भाजपाची सूत्रे हाती घेतली तेव्हा लोकसभा निवडणुकांसाठी दहा महिन्यांचा कालावधी होता. विशेष म्हणजे त्यावेळी भाजपाची उत्तर प्रदेशमधील संसद सदस्यांची संख्याही दहाच होती. पक्ष संघटन केवळ कागदावर होते. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकांचा सामना करणे हे मोठे कठीण आव्हान होते. परंतु नरेंद्र मोदी यांना यावेळी पंतप्रधान करायचेच असा निश्चय करून आलेल्या अमित शहांनी हे आव्हान स्वीकारले आणि ते लगोलग कामालाही लागले. अमित शहा हे भाजपामध्ये यचाणक्य’ म्हणून ओळखले जातात. ते कार्यकर्त्यांचा एकही फोन चुकवत नाहीत असे म्हटले जाते. प्रत्येक मुद्यावर कार्यकर्त्यांशी विस्ताराने बोलण्याची शहांची सवय आहे. कार्यकर्त्यांचे संघटन ही शहा यांची खासियत राहिली आहे. लोकसभा निवडणुकीतील उत्तर प्रदेशात भाजपाला मिळालेल्या देदीप्यमान यशात शहांच्या या गुणाचाही मोठा उपयोग झाला.
या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीतून भाजपाची पुढची वाट अधिक भक्कम झाल्याचे मानले जाते. लवकरच महाराष्ट्रासह हरियाना, जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश या राज्यातील विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर असलेली भाजपाची युती या पक्षाला लोकसभा निवडणुकीत फलदायी ठरली. मोदींच्या प्रभावाची व्याप्ती पक्षाला अपेक्षेपेक्षा अधिक यश देणारी ठरली हे जसे खरे तसेच शिवसेनेबरोबर केलेला संग हा मुद्दाही भाजपाला अव्हेरून चालणार नाही. तरीही आगामी काळात यशत प्रतिशत भाजपा’ चा नारा पक्षाचे प्रदेशातील नेते देऊ लागल्याने आता या युतीचे भवितव्य काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आज तरी महायुती अभेद्य असल्याचे कितीही ठणकावून सांगितले जात असले, तरी त्यात फोलपणा नाही हे दाखवून देण्यासाठी दोन्ही पक्षांना बरीच कसरत करावी लागणार आहे. भाजपा-शिवसेना युतीचे शिल्पकार असलेले सर्वच प्रमुख नेते एक तर आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. अडवाणींसारखे नेतेही अडगळीत पडले आहेत. अशा परिस्थितीत महायुती टिकणार की नाही, याचा फैसला दोन्ही बाजू यापुढे किती ताणून धरतात आणि किती लवचिक राहतात, यावर होणार आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहांची भाजपा अध्यक्षपदी झालेली निवड महायुतीच्या आगामी वाटचालीची दिशा सुस्पष्ट करणारी ठरेल का, हा खरा प्रश्न आहे.

लेखक
अभय अरविंद
साभार नवशक्ति
comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)