महानायक :गोपीनाथराव मुंडे !

05/07/2014 14 : 52
     637 Views

‘‘मराठवाड्याचे सुपूत्र,महाराष्ट्र राज्याची जान आणि शान असणारे भा.ज.पा.जेष्ठ नेते तथा केंद्रीय ग्राम विकास मंत्री ना.गोपीनाथरावजी मुंडे साहेब आज आपल्या सोबत नाहीत यावर विश्वास बसत नाही दैनंदिनी जिवनातील साहेबांचा उत्साह त्यांच्या भेटीतून मिळणारी प्रेरणा आणि प्रोत्साहन जगातील कोणत्याही बाजारपेठेत मिळणारे नाही. साहेबांनी समाजकारणात आणि राजकारणात वकृत्व नेतृत्व आणि कर्तृत्वातून घेतलेली भरारी तेजस्वी सुर्याच्या सुर्यकीरणासारखी स्वच्छ होती, म्हणूनच साहेब महाराष्ट्राचे जाणतें नेते, मासबेस लिडर, राजकीय कुरूक्षेत्राचे महानायक आणि तमाम जनतेचे -हदयसम्राट झाले होते.जननेता ठरले होते.जनमनाच्या -हदयाला भिडणारे त्यांचे व्यक्तीमत्व होते. त्यामुळे साहेब जनमनाचे जननायक झाले होते. दिलदार दिलखुलास राजकारणी, कुशल प्रशासक आणि संघर्षाचा बुलंद आवाज म्हणजे मुंडे साहेब!संघर्षाचे आणि उतूंग कर्तृत्वाचे दुसरे नाव म्हणजे गोपीनाथ मुंडे ! साहेबांवर अपघाता पेक्षा ही भयंकर संकट मैदानात आले असते तर ते परतवून लावण्याची धमक साहेबांत होती, परंतू त्या अपघाताने साहेबांच्या पाठीत खंजीरच खुपसला आणि अवघा महाराष्ट्र दु:ख सागरात बुडाला. बीड जिल्ह्याचा श्वास थांबला. महाराष्ट्राची जान आणि शान गेली, स्वाभिमानाची मान खाली झुकली, तीच मान ताठ करण्याची जबाबदारी पुन्हा बीड जिल्ह्यातील निधड्या छातीच्या तमाम जनतेवर आली. आज आपल्या लाडक्या नेत्याचा अस्थिकलश जिल्ह्यातील जनतेच्या दर्शनासाठी गावा-गावात ठेवला जात आहे त्या निमित्त साहेबांच्या सामाजिक राजकीय वाटचालींचा आणि त्यांच्या संघर्षाचा, कर्तृत्वाचा आढावा घेणारा प्राचार्य डॉ.नामदेव सानप यांचा हा लेख.‘‘
बीड जिल्ह्याचे भुमीपूत्र, मराठवाड्याचे सुपूत्र, महाराष्ट्राची जान आणि शान असणारे दिवंगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री ना.गोपीनाथराव मुंडे साहेबांची राजकीय वाटचाल व सार्वजनिक जीवन मी गेल्या पंचवीस वर्षापासून कधी दुरवरून तर कधी जवळून पहात आलो. गोपीनाथरावांच्या राजकीय व सामाजिक कार्याची सुरूवात पं.दिनदयाळ उपाध्यक्ष, स्व.जयप्रकाश नारायण यांच्या विचारांनी प्रभावीत होऊन राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, विद्यार्थी परिषद आणि मराठवाडा लोकविकास आंदोलनाच्या माध्यमातून झाली.१९७१ ला जनसंघाचा प्रचारक चाणक्य शाखेचे कार्यवाहक म्हणून काम करित असतांना १९७४ ला अंबाजोगाई येथे भव्य मेळावा घेतला. मराठवाडा विकास आंदोनातून विद्यार्थी नेता म्हणून ते पुढे आले. १९७८ ला जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहिर झाल्या. उजनी जि.प. संघातून त्यांनी निवडणूक लढवली व जि.प.सदस्य म्हणून निवडुण आले. १९८० ला युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष पदी त्यांची निवड झाली.१९८० च्या विधानसभा निवडणूकीत भाजपाच्या उमेदवारीवर प्रथम विधान सभ्ेत त्यांनी प्रवेश केला. १९८६ मध्ये ते पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि १९८४-८५ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी पक्षाचे ४२ आमदार निवडूण आणले. १९९० ला विधीमंडळात ते भाजपाचे गटनेते झाले. त्यानंतर विरोधी पक्षनेते झाले. १९९५ ला राज्याचे गोपीनाथराव उपमुख्यमंत्री झाले २००९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत प्रचंड मताधिक्य मिळवून ते खासदार झाले लोकसभेत भा.ज.पा. उपनेते म्हणून त्यांची निवड झाली.
२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत राज्यात महायुतीची यशस्वी प्रयोग करून ४३ खासदार स्वत:सह निवडून आनले. आणि त्यांची देशाचे ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली. प्रारंभापासून सत्तेच्या प्रवाहाबरोबर न वाहता सत्तेच्या प्रवाहाविरूद्ध संघर्ष उभारून कठोर परिश्रम घेवून सत्तेचा प्रवाह आपल्या दिशेने वळवून जि.प.सदस्य, आमदार, खासदार, पक्षप्रदेशाध्यक्ष, पक्षसरचिटणीस, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष, विधानसभा विरोधी पक्षनेता, गटनेता, उपमुख्यमंत्री, पक्ष उपाध्यक्ष राष्ट्रीयसरचिटणीस, लोकसभा उपनेते, केंद्रीय ग्राम विकास मंत्री अशी विविध सत्तेतील व सत्तेबाहेरील पदांची त्यांनी जबाबदारी यश्स्वीरित्या सांभाळली अशी त्यांनी पदे केवळ सांभाळलीच नाहीतर या पदांना त्यांनी आपल्या कौशल्याच्या व कर्तृत्वाच्या आणि संघर्षाच्या बळावर ऐतिहासीक अशी प्रतिष्ठाही मिळवून दिली. उभ्या महाराष्ट्रात आपल्या कुशल कर्तृत्वाचा आणि संघटन कौशल्याचा प्रभावी ठसा घराघरात उमटविला, ऐवढेच नव्हे विरोधी पक्षाच्या गटात सुद्धा आपल्या अभ्यास चिंतन व कार्याच्या बळावर एक वेगळी प्रतिमा निर्माण केली अधिकाधिकांचे अधिकतम कल्याण साध्य करणा-या सहकार चळवळीतील सहकारी साखर क्षेत्रात तर ते अशिया खंडात आदर्श ठरले. राज्याच्या कृषी व ग्रामीण विकासाची नाडी ओळखून आणि प्रस्थापित काँग्रेसी साखर सम्राटांच्या जबड्यात अडकलेल्या शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी या वर्गाची मुक्तता करण्यासाठी त्यांच्या कष्टास न्याय देण्यासाठी गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्या सत्तेच्या काळात अनेक सुधारणा घडवून आणल्या एवढेच नव्हे तर राज्यात आधुनिक पद्धतीने खाजगी साखर उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली हा त्यांचा क्रांतीकारी प्रयोग आजही यशाच्या दिशेने घौडदौड करीत आहे. गोपीनाथराव मुंडे यांच्या या क्रांतीकारी कार्यामुळे ते आधुनिक साखर उद्योगाचे प्रणेते ठरले.
राज्याच्या राजकीय कुरूक्षेत्राचे तर गोपीनाथराव सत्तेत असोत अथवा नसोत ते महानायक असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले होते. सत्तेत असतांना सर्व सत्तास्थानावर त्यांची मजबूत पकड होती. सत्ताधा-यांवर व विविध पक्षस्तरावर त्यांची मजबूत पकड कायम राहिली. जनहितार्थ एखादे काम त्यांनी कोणत्याही सत्ता प्रमुखांना सांगितले तर गोपीनाथरावांचा शब्द मोडण्याची हिम्मत कोणीही करत नव्हते. राज्यातील युवा वर्गाच्या -हदयात ते घर करून होते. म्हण्ूनच त्यांना लोक लोकनेता, जाणताराजा, आधुनिक सहकार व साखर उद्योग सम्राट, विकास रत्न, महाराष्ट्रांचा बुलंद आवाज, पोलादी नेता अशा एक ना अनेक सन्मानाच्या पदव्या लोक आपल्या लाडक्या नेत्यास बहाल करीत उभ्या महाराष्ट्रात गोपीनाथराव मुंडे यांच्या विषयी घराघरात आदर असणरी मानसे निर्माण झाले होते. ख-या अर्थाने ते महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक कुरूक्षेत्रावर मासलिडर बनले. सुरूवातीपासून जनसामान्यांसाठी दिवस आणि रात्र खर्च करीत त्याचबरोबरच आपले व्यक्तीमत्व प्रसन्न ठेवून ते भेटणा-या प्रत्येक व्यक्तीशी मनमोकळे बोलून सार्वजनिक कार्य करण्याची पद्धती कायम बाळगत. कठोर परिश्रमाच्या संघर्षाच्या आणि आपल्या कुशल कर्तृत्वाच्या बळावर राज्याच्या राजकारणात स्वत:चा ठसा उमटवून सर्वसामान्य जनतेच्या मनात अटळ स्थान निर्माण केल्याने राज्यातील जनता त्यांच्याकडे पर्यायी नेतृत्व म्हणून पाहात, असे हे व्यक्तीमत्व म्हणजे दिनदलित-उपेक्षित व तळागळातील जनतेचे आशास्थान असणारे गोपीनाथराव कुशल व समर्थ प्रशासक कृतिशिल आणि अभ्यासू व्यक्ती होते.बोले तैसा चाले हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्ये होते.
सर्वसामान्य जनतेशी मवाळ आणि विनम्र असणारे गोपीनाथराव दुर्जनांसाठी आणि गुंडासाठी अपप्रवृत्तीसाठी कर्दनकाळ तर अन्यायाविरूद्ध पेटून उठणारे त्यांच व्यक्तीमत्व होते. स्वत:शिस्तप्रिय असणा-या गोपीनाथरावांनी राज्यात पक्षाचा प्रचंड प्रभाव वाढविला त्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. बहुजन, गिरीजन, कष्टकरी, शेतकरी, दलित मागास, युवक भटके या घटकांच्या उत्कर्षासाठी अहोरात्र परिश्रम घेतले या घटकांचा सर्वांगिण विकास व या घटकांना केंद्रबिंदु ठरवून आणि मानून त्यांनी या घटकांच्या प्रश्नावर आवाज उठविला चळवळी केल्या, आंदोलने उभारली, संघर्ष केला याहीपुढे जाऊन राजकीय क्षेत्राच्या पलिकडे जाऊन परळी येथे राज्यस्तरीय दुष्काळी परिषद आयोजित केली. एवढंच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील मराठी साहित्य संम्मेलन सुद्धा घेतले नागपुरच्या विधान भवनावर शेतक-यांच्या कष्टक-यांच्या प्रश्नांसाठी ऐतिहासिक असा मोर्चा काढून सरकारचे सिंहासन हादरून सोडले. राज्यात जेंव्हा जेंव्हा भिषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तेंव्हा तेंव्हा राज्यसरकारला राज्यातील बहुतांशी भगात दुष्काळ जाहिर करण्यास भग पाडले अशी सर्व समावेशक दृष्टी असणारे गोपीनाथराव जनतेच्या मदतीला सदैव धावत असत.
१९७७ ते १९९५ हा गोपीनाथरावांचा काळ म्हणजे संघर्ष चळवळीचा काळ होता. ख्ंडक-याचे आंदोलन, आदिवाशी जमीन आंदोलन मराठवाडा विकास आंदोलन, मराठवाडा विद्यापीठ नामांतर शेतक-यांची कर्ज मुक्ती अशा विविध आंदोलनासह ४१ दिवसांची शेतकरी यात्रा आपल्या नेतृत्वाखाली काढली शिवनेरी ते शिवतीर्थ अशी संघर्ष यात्रा काढून उभा महाराष्ट्र त्यांनी ढवळून काढला पुढे मंडल आयोगाच्या अंमलबजावणीच्या मुद्यावर मुंडे साहेबांनी विधान सभेत केलेले भाषण दिर्घकाळ स्मरणात राहण्यासारखे आहे. राजकीय दृष्ट्या मतांच्या वजाबाकी कधीच चिंता न करता विद्यापीठ नामांतरास त्यांनी पाठींबा दिला. औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्थापित महाविद्यालयाच्या वस्तीगृहासाठी सात कोटी रूपये अर्थ सहाय्य केले. ते त्यांची सामाजिक समतेवरची निष्ठा होती म्हणून...! नामांतानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी ते स्वत: जनतेपुढे आले. क्रिडा क्षेत्रातील कार्य ही त्यांचे उल्लेखनिय आहे. आखिल भारतीय स्तरावरील विविध स्पर्धा त्यांनी औरंगाबाद शहरात भरविल्या.
२० वर्षापूर्वी शिवसेनेत फुट पडली आणि राज्याच्या विधानसभेचे विरोधीपक्षनेतेपद गोपीनाथरावांकडे आले. राज्यावर एकाधिकारशाही प्रमाणे राज्य चालविणारे तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांची झोप उडवून टाकली. आपल्या वक्तृत्वाच्या व कर्तृत्वाच्या आणि संर्घाच्या बळावर सरकारला सळोकीपळो करून सोडले होते. राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरातील गुन्हेंगारीचे थैमान परिणामी सामान्य जनतेचे झालेले असुरक्षित जीवन राज्यकत्र्यांचे गुन्हेंगारी जगतांशी असलेले संबंध जे.जे. हत्यांकांड राज्यातील ढासळलेली कायदा व्यवस्था.मुंबईतील बॉम्बस्पोट आदिवाशींचे प्रश्न, राज्यातील कुपोषितांचे बळी, कामगार नेत्यांच्या हत्या, प्रंचंड फोफावलेला भ्रषाचार, दाभोळ वीज प्रकल्पातील भ्रष्टाचार, सेक्स स्कँडल व त्यातील राजकीयांचा सहभाग यासारख्या ज्वलंत प्रश्नावर मुंडे यांनी तत्कालीन सरकारला जबाबदार धरून पळता भुई थोडी करून सोडले होते. सतत जनसामान्यांच्या सहवासात राहणरा, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा, अन्यायाविरूध आणि भ्रष्टाचाराविरूद्ध, गुंडगिरी विरूद्ध लढणारा, आहोरात्र जनसामान्यांच्या कल्याणासाठी भल्यासाठी संघर्ष करणारा, भल्या-भल्या राज्यकत्र्यांना, उच्चस्तरीय अध्किा-यांना जाब विचारणारा कणखर नेता अशी प्रतिमा त्यांनी जनसामांन्याच्या मनात निर्माण केली. पुढे संघर्ष यात्रासारखा उपक्रम हाती घेवून सरकारविरूद्ध जनमत तयार केले. पक्षपाती काँग्रेसला जनसामान्यांतील ४० वर्षांची विश्वासार्हता गमवावी लागली याचा परिणाम पुढे १९९५ च्या विधानसभा निवडणूकीत झाला. म्हणूनच राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आले. राज्यात युतीचे सरकार येण्यात गोपीनाथरावांचा सिंहाचा वाटा होता.
१९९५ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर राज्यात युतीचे सरकार आले. गोपीनाथराव राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. विरोधी पक्षनेते असतांना जनतेवरील अन्यायाविरूद्ध त्यांनी रान पेटविले होते. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात उंचावल्या होत्या. जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा उपमुख्यमंत्री मिळाल्याने सर्वसामान्य जनता गोपीनाथरावांकडे मुख्यमंत्री म्हणून पाहत.मुंडेकडे गृह आणि उर्जा ही महत्वाची खाती असल्याने त्यांच्याकडे सतत प्रचंड गर्दी असे अहोरात्र जनतेसाठी मुंडे सदैव सज्ज असत. आपल्या कारकीर्दीत मुंडे यांनी अवैद्य धंदेवाल्याविरूद्ध धडक मोहिम राबवून भल्या भल्यांना जेलची हवा दाखविली. उच्चपदस्थ अधिका-या विरूद्ध कडक कारवाई केली. आपल्या कर्तृत्वातून त्यांनी आपण काय करू शकतो हे दाखवून दिले. राज्याच्या इतिहासात कोणी एवढ्या योजना राबविल्या नाहीत तेवढ्या धडक योजना त्यांनी राबविल्या. एकही योजनेला पैसा कमी पडू दिला नाही. याच बरोबर उद्योग-व्यवसाय नौकरी राजकीय यासारख्या विविध पटलावर राज्यातील हजारो युवकांची जडण-घडण केली म्हणूनच आज ही लोक म्हणतात उपमुख्यमंत्री हवा तर मुंडेसाहेबांसारखा....! विरोधी पक्षनेता हवा तर मुंडे साहेबासारखा...! असा सूर जनसामान्यांत ऐकावयास मिळतो. प्रशासकीय पातळीवर प्रचंड सुधारणा घडवून आण्ण्यासाठी स्वत:अवैध धंदे करण-यांवर धाडी घातल्या. गुन्हेगारी जगताने तर मुंडे यांचा धकसाच घेतला होता. मुंबईतील गुन्हेगारी जगताचा डॉन दाऊदने मुंडे साहेबांचा धसका घेवून देशातून पलायन केले. कर्तव्यत कामचुकारपणा करण-यांना ते थेट घरी पाठवत. मुंडे यांच्या या मोहिमेमुळे प्रशासन गतीमान झाले होते.
विविधमंडळात गोपीनाथरावासमोर काय बोलावे हा प्रश्न विरोधकांना पडत असे. विरोधकांच्या आरोपांना गोपीनाथराव अभ्यासपूर्ण प्रभावीरित्या सडेतोड उत्तरे देत असत. हे त्यांचे एक वैशिष्ट्य होते. अनेक वेळा मुंडे साहेबांसमोर विरोधकही अडचणीत येत. सामाजिक जीवनात विविध जबाबदा-या त्यांनी खंद्यावर घेतल्या व त्या कर्तृत्वाच्या बळावर यशस्वीरित्या पार पाडल्या म्हणूनच ते जनसामान्यांसह विरोधकांचेही नेते ठरले. हे त्यांचे विरोधकही मान्य करतात. समाजकारण धर्मकारण यामध्ये त्यांचे चिंतन होते. स्वत:चे विचार स्वत:ची भ्ूमिका होती. दुरदृष्टीपणा, मुत्सद्दीपणा, राजकीय प्रगल्भता, प्रश्नांनी जाण जनतेची नाडी आणि जनसामान्यांत राहून कार्य करण्याची त्यांची स्वतंत्र प्रणाली होती. ते कोणतेही काम रेंगाळत ठेवत नव्हते. तसेच बोले तैसा चाले या प्रमाणे त्यांची कार्यपद्धती असल्यामुळे त्यांच्या स्वभावाचे बोलणार ते करणारच हे वैशिष्ट्य होऊन बसले होते. खुद्द ते स्वत: हे कबूल करत गोपीनाथराव यांच्या कार्यपद्धती व स्वभावामुळे राज्यातील युवा वर्गाचे आणि सामान्यंचे ते लाडके नेते झाले. त्यांच्या कर्तृत्त्वावर आज ही लोक खुश होते त्यामुळेच गोपीनाथराव सत्तेत नसले तरी त्यांचा रूबाब मात्र कायम राहिला. गोपीनाथराव महाराष्ट्राच्या राजकीय कुरूक्षेत्रात चौफेर चौकार-षटकार अशीच फलंदाजी अखेर पर्यंत करत राहिले.
बेरोजगार व्यापारी, शेतकरी, कष्टकरी, नोकरदार यांच्या प्रश्नांसाठी या घटकांचे अश्रु पुसण्यासाठी त्यांच्या मदतीसाठी सरकारला जाग आणून प्रश्नांकडे राज्यकत्र्यांकडे लक्ष वेधन्यासाठी तेवढ्याच जिव्हाळ्याने तेवढ्याच उत्साहाने गोपीनाथराव मुंडे यांनी अक्कलकोट ते नागपूर अशी संघर्षयात्रा काढून जनसामान्यांना आधार दिला. नागपुर येथील हिवाळी अधिवेशनावर प्रचंड मोर्चा नेहून सरकारचे सिंहासन हादरून सोडले. व जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास सरकारला भाग पाडले. जनहितासाठी आहोरात्र अथक परिश्रम घेणारे व निरंतर संघर्ष करणारे जनसामान्यांच्या संपर्कात राहणारे गोपीनाथराव महाराष्ट्राचे लाडके नेते झाले. राज्यातील जनता मोठ्या आशेने त्यांच्याकडे पाहत होती.
राज्याच्या सत्तेत असणा-या काँग्रेस आय आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित आघाडी सरकारला आपल्या कारकीर्दीत राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यात, राज्यातील कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यात बेरोजगारी थांबविण्यात, वाढती महागाई रोखण्यात, कापूस-ऊस उत्पादकांचे व शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यात, पाणी प्रश्न सोडविण्यात, मुद्रांक-शेअर घोटाळा हताळण्यात शेतक-यांच्या सार्वजनिक उपक्रमासाठी संपादित केलेल्या जमीनींचा मावेजा देण्यात, विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात, कर्जबाजारी झालेल्या शेतक-यांना दिलासा देवून त्यांच्या होत असलेलया आत्महत्या रोखण्यात आणि निवडणूक प्रसंगी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून जनसामान्यांत सरकार व पक्षाविषयी उज्वल प्रतिमा निर्माण करण्यात अपयश आले तेंव्हा विरोधी पक्ष व नेता म्हणून आपल्या सहकारी पक्षांना सोबत घेवून भाजपा नेते गोपीनाथराव मुंडे यांनी वेळोवेळी सरकारला जाग आणून देण्याचे व जनसामान्यांच्या दु:खात सहभागी होऊन त्यांना आधार देण्याचे कार्य केले. वर्षापूर्वी राज्यात विविध भागात अतिवृष्टी झाली हजारो एकर जमीन नापीक झाली. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, उभे संसार वाहून गेले या नैसर्गिक संकटात सापडलेल्या जनतेला आधार देण्यासाठी सरकारचे लक्ष त्यांच्याकडे वेधून घेण्यासाठी गौदापरिक्रमा काढली व अपादग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी सरकारला भाग पाडले. गोपीनाथरावांनी असे अनेक ऐतिहासिक कार्य सांगण्यासारखे आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या राजकीय कुरूक्षेत्राचे महानायक गोपीनाथराव मुंडे यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करून आपल्या दुस-या राजकीय पर्वास नव्या राजकीय व्युहरचनेनुसार प्रारंभ केला होता. राष्ट्रीय राजकारणत मुंडे यांनी प्रवेश करताच भारतीय जनता पार्टीद्वारे लोकसभेतील उपनेते पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली मुंडे यांनी आपल्या राष्ट्रीय राजकारणास दमदारपणे सुरूवात केली होती. देशातील जनतेची जनगणना ही जातीनिहाय व्हावी ही मागणी त्यांनी लावून धरत सरकारला जातीनिहाय जनगणना करण्यास भाग पाडले या जनगणनेमुळे सबंध देशातील राजकीय सुत्रे भविष्यात बदलणार आहेत या बदलाचे सर्व श्रेय मुंडे यांना जाणार त्या बरोबरच राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात झालेल्या आर्थिक घोटाळ्यावर साकारला जाब विचारून त्या घेटाळ्यांची चौकशी करण्यास भाग पाडीत या कार्याबरोबरच आंतराष्ट्रीय स्तरावर देशाचे यशस्वी प्रतिनिधीत्व करून देशाची आंतराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा उंचावित मुंडे यांनी युनेस्को मध्ये देशाचे प्रभावी नेतृत्व केले बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथ्रा या छोट्याशा गावात शेतकरी कुटूंबात जन्मलेले गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्या संघर्षाच्या बळावर नाथ्रा ते दिल्ली व्हाया बीड, मुंबई ही राजकीय वाटचालअत्यंत यशस्वी आणि प्रभावीरित्या पार केली.
भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा मुलमंत्र गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या रक्ताच्या कणाकणात भिनलेला होता. सामाजिक उत्कर्षासाठी मुंडे साहेबांनी प्रत्येक गोष्ट शिकण्याचा प्रत्येकाचे संघटन करण्याचा आणि प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करण्याचा प्रयत्न अखेरच्या श्वासापर्यंत केला. त्यामुळे नाथ्रा ते दिल्ली पर्यंतचे अठरापगड जाती जमाती व विविध धर्माचे लाखो लोक गोपीनाथरावांसाठी ढसाढसा रडले कारण गोपीनाथराव केवळ राजकीय कुरूक्षेत्राचे महानायक नव्हते तर ते अठरापगड जाती जमातींच्या मनाचे महानायक झाले होते कारण साहेबांचे व्यक्तीमत्व तेजस्वी आणि प्रेरणा व प्रोत्साहन देणारे होते . साहेबांना पाहिलं, ऐकलं की, प्रत्येक व्यक्ती त्यांचा दिवाना होत असे त्यामुळे आजही मुंडे साहेब आपल्यात नाहीत यावर लोकांचा विश्वास बसत नाही कारण त्यांच्या बरोबर घडलेल्या अपघातापेक्षा भयंकर मोठे संकट साहेबांच्या डोळ्यासमोरून आले असते तर त्यावरही साहेबांनी विजय मिळविला असता परंतू दुर्दैवाने त्या अपघाताने साहेबांच्या पाठीत खंजिरच खुपसला.
स्वकर्तृत्वाचा महामेरू असणारे भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री, केंद्रीय ग्रामविकास मंत्री ना.मुंडे साहेबांचे ३ जून २०१४ रोजी दिल्लीत अपघाती निधन झाले आणि बीड जिल्हा दु:खाने व्याकूळ झाला महाराष्ट्र दु:खाच्या सागरात बुडाला जिल्ह्याचे, राज्याचे न भरून निघणारे नुकसान झाले साहेबांच्या अकाली जाण्याने त्यांचे लाखो चाहते पोरके झाले आजही लोक साहेब परत या म्हणून टाहो फोडत आहेत. परंतू डोंगरा आड गेलेला सुर्य पुन्हा दिसू शकतो परंतू पंचत्वात विलीन झालेली व्यक्ती पून्हा दिसू शकत नाही शरिर सोडून गेलेला आत्मा परत आणता येत नाही हे वास्तव साहेबांच्या चाहत्यांना कसे सांगावे हे आव्हान आजही कायम आहे आपल्या लाडक्या नेत्याला डोळेभरून पाहिलं की सुखवणारे डोळे आणि आनंदाने भरून येणारे मन आजही मुंडे साहेबांना दु:खद अंतकरणाने शोधत आहे.

प्राचार्य डॉ. नामदेव सानप
मो.९४२१५७३९३३
comments