अजितदादांची पुन्हा टगेगिरी!

20/04/2014 0 : 17
     532 Views

पाणीप्रश्न सोडवायचा आहे ना! मग सुप्रिया सुळे यांना मतदान करा. तसं केलं नाही तर तुमच्या गावचं पाणीच बंद करू, अशी धमकी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी मासाळवाडी (ता.बारामती)येथे ग्रामस्थांना प्रचार दौरा करताना दिला. यानिमित्ताने अजितदादांची टगेगिरी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. बारामती तालुक्यातील काही गावांत पाणीटंचाईचा प्रश्न भीषण आहे. लोकसभा निवडणूक प्रचाराची वेळ संपल्यानंतरही बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी खा.सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ दौरा केला.यावेळी मासाळवाडी ग्रामस्थांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला.मासाळवाडी ग्रामस्थांनी पक्षाच्या विरोधात मतदान केले तर गावाला पाणी मिळणार नाही, असा सज्जड दमच ना.पवार यांनी दिला. या प्रकारानंतर अजितदादांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यात आली आहे. या घटनेने उपमुख्यमंत्री पवार पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणाचा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाने मागितला आहे.
दरम्यान हा दखलपात्र गुन्हा असल्याने पवार यांना अटक करून त्यांना पुढील निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याची मागणी बारामती लोकसभा मतदारसंघातील ‘आप’ चे उमेदवार सुरेश खोपडे यांनी केली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात मोठीच खळबळ उडाली आहे. राज्यकत्र्यांनी कसे वागावे कसे वागू नये, याचे भान अजितदादांना राहिले नाही असेच या घटनेवरून पुन्हा सिध्द झाले आहे. आपल्याच मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न सहानुभूतीने सोडविण्याची भूमिका उपमुख्यमंत्री पवार यांनी घ्यावयास हवी होती. परंतु त्यांनी मासाळवाडी ग्रामस्थांसमोर आपले उद्दाम वर्तन दाखवून दिले आहे. या वर्तनाने अजितदादांनी लोकांचा रोष ओढवून घेतला आहे. सत्तेमुळे अजितदादा खूपच उद्दाम आणि उन्मत्त बनले आहेत, असेच दाखवून देणारी ही घटना आहे. या प्रकाराने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. जनतेचे प्रश्न सोडविणे हे राज्यकत्र्यांचे कर्तव्यच आहे, याचा साधा विवेक अजितदादांना राहिलेला नाही. राज्यकत्र्यांचा विवेक आणि भान सुटल्याचेच हे लक्षण आहे. मासाळवाडी येथे केलेल्या दमबाजीमुळे उपमुख्यमंत्री पवार यांच्याविरूध्द वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रचाराची सांगता झाल्यानंतर पवार मासाळवाडीत गेले. गावच्या पाण्याचा प्रश्न कधी सोडविणार, याची तारीख जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. खा.सुप्रिया सुळे यांना मतदान केले नाही तर गावाला पाणी मिळणार नाही, अशी धमकी उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्याचा आरोप ‘आप’ चे उमेदवार सुरेश खोपडे आणि महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी केला आहे. हा आचारसंहितेचा भंग असल्याने खोपडे व जानकर यांनी निवडणूक निर्णय अधिका-यांकडे तक्रार दिली आहे. या निवडणुकीत बारामतीमधील २२ गावांमध्ये असलेल्या पाण्याच्या प्रश्नाला विरोधी पक्षांनी प्रचाराचा प्रमुख मुद्दा केला होता. त्यानंतर पवार यांना या प्रश्नाची दखल घ्यावी लागली होती. पवार यापूर्वीही पाण्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडले होते. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पाटकूल येथील कार्यकर्ते प्रकाशभैय्या देशमुख यांनी उजनीच्या पाणीप्रश्नी मुंबईत उपोषण करून प्रश्न ऐरणीवर आणला होता. उजनी धरणात पाणी नाही तर धरणात लघुशंका करू का? असे उद्दाम वक्तव्य अजितदादा यांनी केल्याने ते वादात अडकले होते. आता दुस-यांदा स्वत:च्याच मतदारसंघातून उपमुख्यमंत्री पाणीप्रश्नी वादाच्या भोव-यात सापडले आहेत. राज्यकत्र्यांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी संयम आणि विवेक जागा ठेवला पाहिजे, असे यानिमित्ताने सुचवावेसे वाटते.
अजितदादांची टगेगिरी पुन्हा एकदा त्यांना अडचणीत आणली आहे.जनता प्रक्षुब्ध झाली तर राज्यकत्र्यांनी आपला संयम ढळू देता कामा नये, हे त्यांना केव्हा सुचणार? वादग्रस्त विधाने केल्यानेच राज्यकर्ते अडचणीत येतात. त्यामुळेच त्यांना लोकांच्या तीव्र असंतोषाला सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी विवेक, संयम, लोकाभिमुखता जागी ठेवणे आवश्यक आहे.
comments