मतदारांनी मतदान केलेच पाहिजे

01/04/2014 18 : 52
     601 Views

आपल्या राज्यघटनेने नागरिकांना त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यासाठी काही हक्क प्रदान केले असून काही कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी देखील सोपविलेली आहे. 18 वर्षावरील स्त्री-पुरुषाला मतदानाचा हक्क बहाल केला आहे. हा अधिकार म्हणजे लोकशाही शासनप्रणाली दृढ करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. त्यामुळेच कोणत्याही निवडणूक प्रक्रीयेला आगळे वेगळे महत्व प्राप्त होते. म्हणूनच मतदार हा लोकशाहीतला राजा आहे, अशी संकल्पना रुढ झाली आहे. मतदार विचारी व जागरुक असावा तसेच तो मतदानासाठी उत्साहाने सहभागी झाला पाहिजे, तरच लोकशाहीतील मतमूल्यांची किंमत दिसून येईल.

देशात यावर्षी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. मागील काही निवडणुकांचे अवलोकन केले तर मतदारसंख्येच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी घसरत असल्याचे दिसून येते. एकीकडे मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवावे, यासाठी प्रशासनाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येतो. त्यामुळे मतदाराची संख्या एकीकडे वाढत आहे. तर दुसरीकडे निवडणुकीत मतदान करण्याविषयी उदासीनता दिसून येत आहे. जितक्या मोठ्या प्रमाणावर मतदान निर्भीड व निर्भेळ वातावरणात होईल, तितकी आपली लोकशाही प्रगल्भ होईल. मतदान प्रक्रीयेत मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी न होणे ही भवितव्याच्या दृष्टीने चिंतनीय बाब आहे. हे गांभीर्य लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने 25 जानेवारी या मतदान दिनापासून मतदार जनजागृती अभियान राबविण्याचे निर्देश दिलेत. परिणामी या अभियानामुळे मतदारांची विशेषत: युवा मतदारांची संख्या वाढली आहे.

येत्या 10 एप्रिल रोजी विदर्भातील 10 लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी मतदान होत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभागाची यंत्रणा सज्ज होत आहे. निवडणूक काळामध्ये कोणतेही गैरप्रकार घडू नये यासाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून तिची अंमलबजावणी ही विविध यंत्रणेद्वारे करण्यात येत आहे. आचारसंहितेचा उद्देश पारदर्शकपणे निवडणुका पार पडाव्यात तसेच मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभागी व्हावे.

निवडणुकीत मतदान करण्यासाठी उमेदवारांनी मतदारांना पैशाचे किंवा इतर कोणतेही प्रलोभन दाखवू नये असे आचारसंहितेत स्पष्ट केले आहे. मतदार हा घटक स्वतंत्र आहे. त्याला आपल्या मतदानाचा हक्क असून तो त्यांनी कोणाच्याही दबावाखाली अथवा कोणत्याही आमिषाला बळी न पडता सद्सदविवेकबुद्धीने बजावला पाहिजे. आपले राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे आपली लोकशाही शासनप्रणाली मजबूत करण्यासाठी मतदारांनी नि:पक्षपातीपणे योग्य उमेदवाराला मतदान करणे हे जागरुक मतदाराचे कर्तव्य आहे. मतदानाचा हक्क जितका बहूमोल आहे त्याहीपेक्षा तो हक्क बजावण्याचे कर्तव्य प्रत्येक मतदारांनी स्वयंस्फुर्तीने, निर्भीडपणे पार पाडणे हे अधिक महत्वाचे ठरते.

-अशोक खडसे, गोंदिया
comments