नवीन वर्षाचा संकल्प : रस्ते सुरक्षेला देऊ महत्त्व

02/01/2014 4 : 51
     3200 Views

शहरांची वाढती लोकसंख्या, नागरी वसाहतींची हदवाढ, झपाटयाने होत असलेले औद्योगिकीरण यामुळे रस्ते वाहतुकीच्या प्रमाणात झालेली वाढ. तसेच अरुंद व नादुरुस्त रस्ते अशिक्षित व व्यसनाधीन वाहनचालक यांच्या मुळे रस्ते अपघांचे प्रमाण मागील काही वर्षांपासून वाढल्याचे दिसून येत आहे. वाहनातून प्रवास करताना निर्धारीत ठिकाणी सुरक्षित पोहचण्यासाठी वाहन चालकांनी वाहन चालविण्याचे नियम व कायद्याचे पालन केल्यास रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
नियम आणि कायद्याचे पालन करुन वाहन चालविल्यास दरवर्षी रस्ते अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या हजारो निष्पाप नागरिकांचे प्राण वाचू शकतील. काही अपघातांमध्ये कुटुंबातील कर्ती व्यक्तीच मृत्युमुखी पडल्याने त्याचे संपुर्ण कुटुंबच उध्वस्त झाल्याची अनेक उदाहरणे वाचनात येतात. त्याकडे एक बातमी म्हणून पाहून दुर्लक्ष न करता, त्यावर गंभीरपणे विचार केल्यास या अपघातांच्या भीषणेसोबतच अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या वेदनांची प्रचिती आपणांस येऊ शकेल.
शासनाने मोटार अपघात टाळण्यासाठी नियम व कायदे केले असून या कायद्यांचे पालन सर्वांनी केले पाहिजे.  नियम व कायद्याची अंमलबजावणी संबंधित यंत्रणेकडून होत असली तरी लोकांमधून प्रतिसाद मिळाल्याशिवाय यामध्ये गतीमानता शक्य होणार नाही. अपघात रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असून अपघात टाळण्यासाठी रस्त्यांवरील सूचनांचे पालन वाहनचालकांबरोबरच नागरिकांनही करावे.
रस्ते वाहतुकीबाबत जनजागृती होण्यासाठी शासनाच्या गृह विभागाच्या परिवहन खात्यामार्फत दिनांक ३ जानेवारी ते दिनांक १७ जानेवारी २०१४ या कालावधी रस्ता सुरक्षा अभियान जिल्हयात राबविण्यात येत आहे. तसेच या अभियानाअंतर्गत जिल्हयातील विविध शासकीय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती येथे थोडक्यात देत आहे आहोत . . . . .
परिवहन, महामार्ग पोलीस आणि वाहतूक पोलीस विभागामार्फत अभियान कालावधीमध्ये महत्त्वाच्या चौकांच्या ठिकाणी सभा घेऊन वाहन चालकांना मोटार वाहन कायदा व वाहन सुरक्षित चालविण्याबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर लावणे, वाहनांवर स्टीकर लावणे, वाहन चालकांसाठी प्रबोधनपर कार्यशाळा आयोजित करुन त्यामध्ये वाहन चालकांसोबतच नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना वाहतूकीचे नियम आणि कायद्यांबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच वाहनांवर रिफ्लेक्टर लावणे, विशेष मोहिमेअंतर्गत परिणामकारकरित्या केसेस करणे, मद्यपी चालकांवर व ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करणे यासोबतच महामार्गावर नजीकची रुग्णालये, रुग्णवाहिका, क्रेन सर्विस, पोलीस ठाणे व त्यांची हद्द आणि दूरध्वनी क्रमांक असलेले बोर्ड लावण्यात येणार आहे. तसेच मोटार वाहन अपघात दाव्यांची माहिती पुस्तिका वितरित करणे, व्याख्यान, वाहतूक उद्यानास भेट, निबंध स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार आहे.
वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने व अन्य कारणांमुळे नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी रस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने अपघात प्रवण क्षेत्राची माहिती घेऊन तेथे दुरुस्ती करणे व रस्त्यांच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात येणार आहेत. तसेच आवश्यक त्या ठिकाण सिग्नल, साईन बोर्ड आणि माहितीचे फलक लावण्याबरोबरच दुभाजकांची रंगरंगोटी, त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजविणे, महत्त्वाच्या जंक्शनवर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आखणे आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
शिक्षण विभागाच्या माध्यमातून जिल्हयातील सर्व महाविद्यालये व शाळांमधील विद्यार्थी, विद्यार्थीनी व कर्मचाऱ्यांना वाहतुकीचे नियम व सुरक्षितता याबाबत माहिती होण्यासाठी चर्चासत्र, व्याख्यानमाला, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्याबरोबरच रस्ता सुरक्षा विषयाचा पाठ्यक्रमात समावेश करणे तसेच एनसीसी आणि एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्हा व तालुकाच्या ठिकाणी, मोठे तपासणी नाके, बाजार आगारांच्या ठिकाणी वाहनचालकांची आरोग्य व नेत्रतपासणी करण्यात येणार असून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी डॉक्टर्स स्टाफसह सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करुन देणे व तयार ठेवणे. तसेच रुग्णालये व रुग्णवाहिकांच्या माहितीचे साईन बोर्ड लावण्यात येणार आहेत. तसेच ‘गोल्डन अवर’ म्हणजे अपघातातील जखमींना सुरुवातीच्या पहिल्या तासात वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी डॉक्टरांची आपत्कालीन टिम सुसज्ज रुग्णवाहिकेसोबत तयार ठेवण्यात येणार आहेत. तसेच अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळण्याच्या दृष्टीकोनातून वाहतूक पोलीसांना प्रथमोपचारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या अभियानामध्ये मालवाहतुकदार संघटनांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याने त्यांच्या सहकार्याने वाहन चालकांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करणे, त्यांची आरोग्य तपासणी करणे. वाहनांवर रिफ्लेक्टर लावणे. माहितीपुस्तिकेचे प्रकाशन व वाटप करणे.जनजागृतीपर परिसंवाद यासारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या अभियानामध्ये शहरी भागात नगरपालिकांच्या माध्यमातून रस्त्यांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणा अद्ययावत ठेवणे, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आखणे, पदाचाऱ्यासांठी फुटपाथ, फुटओव्हर, पुल आणि भुयारी मार्गांचे बांधकाम करणे. अपघात प्रवण क्षेत्रे शोधून तेथे दुरस्ती व उपाययोजना करण्यासोबचत जनजागृतीसाठी परिसंवाद, चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.
शासन राज्यभरामध्ये विविध कल्याणकारी योजना राबवित असते या योजनांची माहिती लेख, बातम्या, लघुपट, आकाशवाणी व दूरदर्शच्या माध्यमातून माहिती व जनसंपर्क महासंचालनायामार्फत आणि त्यांच्या अधिनस्त असलेल्या विभागीय आणि जिल्हा महिती कार्यालयांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविल्या जातात. रस्ते सुरक्षा अभियानाध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत रस्ते सुरक्षिततेबाबत पुस्तिका, भित्तीपत्रके प्रकाशित करणे. महत्त्वाच्या ठिकाणी माहितीचे व घोषवाक्यांचे फलक लावणे आदी उपक्रमांच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदविणार आहे.
वाहन चालकांसोबत नागरिक, विद्यार्थी यांच्यामध्ये रस्ते सुरक्षेबाबत जाणीव जागृती झाल्यास दरवर्षी होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असून अपघातांमुळे जिवितहानी, वाहनांचे नुकसान,राष्ट्रीय संपत्तीची हानी टाळता येईल. तसेच याकामी समाजातील सर्व घटकांनी सहभाग नोंदवून वाहतुक नियमांचे पालन केल्यास अपघातांमुळे शासन यंत्रणांवर येणार ताण व अपघातांचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल. चला या अभियान व नवीन वर्षाच्या निमित्ताने समाज जागृती करुन वाहतुकीचे नियम आणि कायद्याचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी ‘रस्ते सुरक्षेला महत्त्व देऊ’ हा संकल्प आपण सर्व घेऊ !

राजेश लाबडे,
जिल्हा माहिती कार्यालय,
बीड..
comments