दोन'भावी' पंतप्रधानाचे 'यू टर्न'

18/09/2013 20 : 38
     579 Views

भारतीय जनता पक्षाचे’ लोह पुरूष‘ लालकृष्ण अडवाणी आणि राष्ट्रवादीचे‘ जाणते राजे‘ शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी अनुक्रमे नरेंद्र मोदी आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबतीत केलेले वक्तव्य अ थवा घेतलेली भूमिका बदलत सपशेल माघार घेतली आहे.लोहपुरूष आणि जाणते राजे असलेल्या दिग्गज नेत्यांवर दोनच दिवसात आपले शब्द गिळण्याची अशी वेळ का आली ? याचं कारण एका वाक्यात सांगायचं तर ‘त्यांच्यासमोर अन्य पर्याय नव्हता‘ असं सांगता येईल..नरेंद्र मोदी याचं नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर होण्यापूर्वी लालकृष्ण अडवाणी यांनी करता येईल तेवढा थयथयाट केला.‘आत्ताच नाव जाहीर करू नका‘ अशी विनंती वारंवार करून पाहिली.त्याचा उपयोग झाला नाही.अडवाणी यांच्या नाराजीकडं दुर्लक्ष करीत भाजपने मोदींना घोड्यावर बसवले.आता अडवाणी यांच्यासमोर दोन पर्याय होते.एक आपली नाराजी व्यक्त करीत पक्षाला धक्का देणारा एखादा‘ मोठा नि र्णय‘ घेणे किंवा बदलल्या परिस्थितीशी जुळवून घेत‘ वेट आणि वॉच‘ची भूमिका घेणे.मोदींची निवड झाल्यावर एक गोष्ट अडवाणी यांच्या लक्षात आली होती की,सारा पक्ष आणि बहुसंख्य कार्यकर्ते मोंदींबरोबर आहेत.मोदींच्या निवडीनंतर जो जल्लोष झाला तो ही वाहिन्यांवरून अडवाणी बघत होते.आपण आपल्या भूमिकेला चिकटून राहिलो तर एकाकी तर पडूच पण अगदी पक्ष सोडण्याचा नि र्णय घ्यायचं म्हटलं तरी कोणी आपल्या बरोबर असणार नाही हे ही अडवाणी यांना दोनच दिवसात जाणवले होते.अशा स्थितीत मोदींनी गुजरातमध्ये केलेल्या तथाकथित विकासाचे गोडवे गात आपण पक्षाबरोबर आहोत हे दाखवून देण्याशिवाय लोहपुरूषांकडं पर्याय नव्हता.तो त्यांनी निवडला.
जाणते राजेची अवस्था काहीशी अशीच झालीय.त्यांनी मुख्यमंत्र्यांना लकवा भरलाय असे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सूचविले.त्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘कायदेशीर आणि जनहिताच्या फाईलचा आपण लवकर निपटारा करतो पण विशेष सवलती मागणाऱ्या किंवा अडचणीच्या फाईलवर आपण विचारपूर्वकच सह्या करतो‘असे स्पष्ट केले.त्याचा फटका राष्ट्रवादीला बसला.कारण मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर ज्या फाईल पडून आहेत त्यातील बहुसंख्य फाईल राष्ट्रवादीच्याच असण्याची शक्यता आहे.राज्यातील जनतेलाही हे माहित असल्याने मुख्यमंत्र्याच्या या विधानाने जाणते राजे आणि त्याच्या पक्षाची अडचण झाली.अशा बातम्या प्रसिध्द झाल्याआहेत की,मुख्यमंत्र्याच्या वक्तव्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा अधिकच चकाकून नि घाली आहे.हे जाणते राजे यांना अपेक्षित नसावे.राजकीय निरिक्षकांच्या मते लकवा मारण्याबाबतचे जे वक्तव्य शरद पवारांनी केले ते दिल्लीकरांवर थेट शरसंधान न करता ते मुख्यमंत्र्यांवर तोफ डागून केले गेले असावे.भाजपने मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यावर राहूल गांधीचे नाव कॉग्रेसने जाहीर करावे यासाठीही सोनिया गांधींवर दबाव येत आहे.कॉग्रेस या दबावाखाली काही नि र्णय घेऊ देखील शकते.हे पवारांना अर्थातच नको आहे.त्यामुळे आपला राग पवारांनी वेगळे कारण सांगून व्यक्त केला आहे.सासू बोले सुने लागे अशा न्यायाने हे वक्तव्य आले असावे असे राजकीय पंडितांना वाटते.परंतू पवारांच्या या वक्तव्यानं त्यांना अपेक्षित परिणाम साधता आला नसल्यानं,उलटपक्षी राष्ट्रवादीलाच मुख्यमंत्र्यांनी धोबीपझाड दिल्यानं पवारांना यु टर्न घेत ‘मुख्यमंत्र्यांचे काम चांगले चालले आहे ‘असे प्रशस्तीपत्रक द्यावे लागले आहे.असा यु टर्न घेण्यामागे कदाचित एमसीएच्या निवडणुकीचेही राजकाऱण असू शकते.मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत उतरण्याची तयारी पृथ्वीराज चव्हाण यांनी चालविल्याच्या बातम्या आलेल्या आहेत.मागच्या वेळेस तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख विरूध्द दिलीप वेंगसकर असा सामना रंगला होता.मात्र पृथ्वीराज चव्हाण यंदा मैदानात उ तरले तर दोन राजकीय नेत्यांमध्येच ही लढाई होईल.ते दोघांनाही सोयीचे ठरणार नाही.त्यामुळंच पवारांनी एकपाऊल मागे घेत एमसीएचा मार्ग सुकर करण्याचाही प्रयत्न केला असावा असाही काहींचा होरा आहे.उद्देश आणि कारण काहीही असो पण लालकृष्ण अडवाणी असोत नाही तर शरद पवार यांना दोघांनाही पक्षांतर्गत किंवा आघाडी अंतर्गत विरोधकांनी माघार घ्यायला भाग पाडले आहे हे नाकारता येणार नाही.
- लालकृष्ण अडवाणी असोत किंवा शरद पवार असोत हे मुरब्बी राजकाऱणी आहेत. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाचा त्यांना किमान पन्नास वर्षांचा अनुभव आहे. भल्या-भल्यांना पाणी पाजण्यात हे दोन्ही नेते माहिर आहेत.त्यामुळं त्यांनी ‘यु टर्न ‘घेतला म्हणजे आता सारे सरळ होईल असं समजण्याचं कारण नाही.लालकृष्ण अडवाणी असोत किंवा शरद पवार हे संधीची प्रतिक्षा करीत राहणार.योग्य वेळ येताच ते आपले अस्त्र बाहेर काढणार हे उघडंय़.
मोदींच्या बाबतीत बोलायचे तर भाजपने त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केले असले तरी त्या पक्षाला बहुमत मिळणे आवश्यक आहे.भाजपच्या ताब्यात देशातील केवळ चार राज्ये आहेत.या चार राज्यातील भाजपचे सारे उमेदवार निवडणून आले तरी काही होत नाही.अर्द्या देशात भाजपला कोणी विचारत नाही.त्यामुळं निवडणुकीनंतर पक्षीय बलाबल काय असेल यावर मोदी यांचे भाग्य ठरणार आहे.अडवाणींना एक गोष्ट उमगली आहे की,मोदी पंतप्रधान होणार असतील तर निवडणुकोत्तर अनेक पक्ष भाजपला सहकार्य करणार नाहीत.अशा स्थितीत सत्ता मिळवायची तर मोदीला बाजुलाही सारले जाऊ शकते.मग भलेही मोदीच्या नावावर पक्षाने निवडणुका लढविलेल्या असल्यातरी.तशी परिस्थिती निर्माण झाली तर आपण आपले पत्ते बाहेर काढू असा विचार अडवाणींनी केला असू शकतो.पुढची उडी घेण्यासाठी एक पाऊल मागे जाण्याचा पवित्राही या मागे असू शकतो
जाणते राजे शरद पवारांच्या बाबतीतही असेच असू शकते.कॉग्रेसचे नेते नि र्णय घेत नसल्याने अनेक नि र्णय प्रलंबित राहिलेले आहेत असे चित्र त्यांना निर्माण करायचे होते.ते झाले नाही.हा डाव फसला म्हणून पवार कॉग्रेसला माफ करतील अशी स्थिती नाही.राहूल गांधीच्या उमेदवारी जाहीर करण्यापासून अनेक गोष्टीत पवार भविष्यात कॉग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न कऱणार आहेत.कॉग्रेस असो अ थवा भाजप यांच्या जागा घटल्या पाहिजेत आणि तिसऱ्या आघाडीचे म्हणून जे पक्ष आहेत त्यांच्या जागा वाढल्या पाहिजेत असे झाले तरच आपले पंतप्रधानपदाचे स्वप्न फलद्रुप होऊ शकते हे शऱद पवार ओळखून आहेत.त्यासाठी आपल्या पक्षाच्या जागा महाराष्ट्रात वाढल्या पाहिजेत.त्या कॉग्रेसवर लगेच वार करून वाढणार नाहीत.पण त्यांना ढिल देऊऩही चालणार नाही हे ओळखून कधी हल्ला करायचा,कधी माघार घ्यायची अशी खेळी पवार खेळत आहेत.या राजकीय खेळात पवारांना कितपत यश येते हे निवडणुकांनतरच कळणार आहे.तुर्तास पवारांनी मुख्यमंत्री चांगले काम करतात असे शिफारस पत्र देत यू टर्न घेतला हे तेवढेच खरे.

एस एम देशमुख
comments