गोरगरीबांना जीवनदायी आरोग्य

02/09/2013 20 : 41
     947 Views

गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रुग्णांना शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोठा आधार दिला आहे. एक वर्ष पूर्ण झालेल्या योजनेला शासनाने पुढील एक वर्षासाठी नुतनीकरण करुन राबविण्याचा निर्णय घेतला आहे. गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या या योजनेविषयी ही माहिती

महाराष्ट्र राज्यातील दारिद्रयरेषेखालील पिवळे शिधापत्रिकाधारक व दारिद्रयरेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक, रुपये 1 लक्ष किंवा त्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारी कुटुंबे, अंत्योदय व अन्नपुर्णा शिधापत्रधारक कुटुंबासाठी विमा कंपनीच्या सहभागाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना 2 जुलै 2012 पासून सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने कमी उत्पन्न गटांच्या लाभार्थ्यांसाठी चालू केलेली ही महत्वाकांक्षी योजना आहे.

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सध्या पहिल्या टप्प्यात गडचिरोली, अमरावती, नांदेड, सोलापूर, धुळे, रायगड, मुंबई शहर व मुंबई उपनगर या 8 जिल्ह्यांमध्ये 2 जुलै 2012 पासून राबविण्यात येत असून महाराष्ट्रातील उर्वरीत सर्व जिल्ह्यात ही योजना पुढील टप्प्यामध्ये राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या विमा कंपनीशी असलेली पॉलीसी एक वर्षाची असल्यामुळे त्याची मुदत 1 जुलै 2013 रोजी संपली आहे. शासनाने 2 जुलै 2013 पासून या विमा पॉलीसीचे नुतनीकरण केले असून यामुळे योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना रु. 1.50 लाख पर्यंतच्या विम्याचे संरक्षण चालू राहणार आहे. म्हणजेच एखादया कुटुंबावर पहिल्या वर्षी कितीही औषधोपचारावर खर्च झाला असला तरीही आता नव्याने नुतनीकरणानंतर रु. 1.50 लाखाचे विमा संरक्षण चालू राहणार आहे.

रुपये 1 लाख किंवा त्यापेक्षा कमी एकत्रित वार्षिक उत्पन्न असणारी कुटुंबे ही या योजनेचे लाभार्थी असतील. यासाठी त्या कुटुंबाकडे दारिद्रय रेषेखालील पिवळे शिधापत्रक, दारिद्रय रेषेवरील केशरी शिधापत्रक, अंत्योदय अथवा अन्नपुर्णा धारक यापैकी कोणतेही वैध शिधापत्र असणे आवश्यक आहे. या योजनेच्या लाभार्थी कुटुंबासाठी असणारा विम्याचा हप्ता शासनामार्फत भरला जाणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्ष रु 1.50 लाखा पर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी सदरची मर्यादा रु 2.50 लाखापर्यंत वाढविण्यात आली आहे. लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्ती वा अनेक व्यक्तींना वरील योजनेचा लाभ घेता येईल ही मर्यादा प्रतिवर्षासाठी आहे.

या योजनेमध्ये शासकिय, निमशासकिय, खाजगी तसेच धर्मादाय संस्थेची निवड राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे. लाभार्थी त्यांच्या सोयीनुसार नोंदलेल्या कोणत्याही रुग्णालयात उपचार घेऊ शकतील या योजनेअंतर्गत 972 आजारांवरील उपचार व शस्त्रक्रिया तसेच 121 पाठपुरावा उपचारांचा समावेश आहे. या योजनेत लाभार्थ्यांना सर्वसाधारण शस्त्रक्रिया, नेत्र शस्त्रक्रिया, स्त्री रोगावरील शस्त्रक्रिया, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, ह्रदय शस्त्रक्रिया व उपचार, जठर व आतडयाच्या शस्त्रक्रिया व उपचार, बालरोग शस्त्रक्रिया व उपचार, मुत्रपिंड व मुत्रमार्ग शस्त्रक्रिया व उपचार, कॅन्सर शस्त्रक्रिया व उपचार, मेंदू व मज्जासंस्था यांचे आजारावरील शस्त्रक्रिया व उपचार, प्लास्टिक सर्जरी, जळीत रुग्णावरील उपचार (वाहन अपघातावरील उपचार सोडून) कृत्रिम अवयव, आकस्मिक वैद्यकीय उपचार, त्वचेच्या, सांध्यांच्या व फुफ्फुसाच्या आजारावरील आकस्मिक उपचार, एंडोक्राईन व इंटरव्हेन्शनल रेडिऑलॉजी उपचार यांचा लाभ मिळेल.

ही योजना संपूर्णत: कॅशलेस असून रुग्णाला या योनजेअंतर्गत कोणताही खर्च करावा लागणार नाही. या योजनेमध्ये रुग्णालयातील उपचार निदान आवश्यक औषधोपचार, शुश्रुषा व भोजन तसेच एक वेळचा परतीचा प्रवास खर्च यांच्या समावेश आहे. तसेच या योजनेअंतर्गत रुग्णालयातून मुक्त केल्यानंतर दहा दिवसांपर्यंतच्या फॉलोअप तसेच उपचारा दरम्यान काही गंभीर गुंतागुंत झाल्यास त्याचाही उपचार यामध्ये समाविष्ट आहे.

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेस एक वर्ष पूर्ण झाले असून या एक वर्षात नांदेड जिल्ह्यातील 8 हजार 42 रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला असून या रुग्णांवरील मोफत उपचारापोटी राज्य शासनाने 17 कोटी 4 लाख 24 हजार 601 रुपयांचा खर्च संबंधित उपचार करणाऱ्या रुग्णालयांना दिला आहे. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अनेक रुग्णांनी वर्षभरात विविध आजारांवर उपचार करुन घेतले आहेत. त्यामध्ये पोटाच्या शस्त्रक्रिया 209, स्त्री रोगावरील शस्त्रक्रिया 118, अस्थिव्यंग व अपघात ग्रस्त रुग्णांवर उपचार 1023, हृदय शस्त्रक्रिया व उपचार 1062, आतडयावरील शस्त्रक्रिया व उपचार 39, बालरोग शस्त्रक्रिया व उपचार 145, मुत्रपिंड, मुत्रमार्ग शस्त्रक्रिया व उपचार 493, कर्क रोग शस्त्रक्रिया व उपचार 848, अतिदक्षता उपविभागात लाभ घेतलेले रुग्ण 210, मेंदूच्या शस्त्रक्रिया 104, कान, नाक, घसा उपचार व शस्त्रक्रिया 1097 यांचा समावेश आहे.

सर्व मान्यताप्राप्त रुग्णालयात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आरोग्य मित्र 24 तास उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णाला दवाखान्यात दाखल होतांना व उपचार घेतांना योग्य ते सहाय्य व मदत होऊ शकते. योजनेचा लाभ घेण्यासाठी 'आरोग्य पत्राचे' वितरण पात्र लाभार्थी कुटुंबियांना करण्यात येत आहे. ज्या पात्र लाभार्थ्याला आरोग्य पत्र मिळाले नसतील असे लाभार्थी आपले रेशन कार्ड व फोटो ओळखपत्र घेवून अंगीकृत रुग्णालयात जावून उपचार घेवू शकतात. योजनेचा लाभ मोठया संख्येने रुग्णांनी घेण्याकरिता त्यांना आरोग्य शिबिरामार्फत तपासणी करुन 972 उपचाराकरिता पात्र ठरल्यास योजनेतून मोफत उपचार केले जातात. आरोग्य शिबीर प्रत्येक मान्यताप्राप्त रुग्णालयाने आयोजित करणे अपेक्षित आहे. या योजनेच्या माहितीसाठी संपर्क साधता येईल रुग्णालय - आरोग्य मित्र (24 तास उपलब्ध ). टोल फ्री क्रमांक 155 388 किंवा 1800 233 2200. पोस्टबॉक्स - राजीव जीवनदायी, पो. बॉक्स क्र. 100 जी.पी.ओ. मुंबई 400 001 या पत्त्यावर किंवा www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर भेट देता येईल.

अनिल आलुरकर
जिल्हा माहिती अधिकारी,नांदेड
comments