सचिन तेंडुलकरची वनडेतील निवृत्‍ती जाहीर


मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडूलरकर हा क्रिकेटविश्‍वात जागतिक स्‍तरावर सर्वोत्‍तम मानला जाणारा भारतीय खेळाडू आहे. पद्म विभूषण आणि राजीव गांधी खेलरत्न या पुरस्कारांनी तो सन्मानित केला गेला आहे. भारतीय विमानदलाने त्याला ग्रुप कॅप्टन हा गौरवात्मक हुद्दा प्रदान केली आहे. असा मान मिळालेला तो पहिला खेळाडू आणि विमानोड्डाणाची पार्श्वभूमी नसलेला पहिला माणूस आहे. राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसने आणि म्हैसूर विद्यापीठाने सचिनला मानद डॉक्टरेट पदव्या प्रदान केलेल्या आहेत. नुकतेच ६ नोव्हेंबर २०१२ रोजी सचिनला मुंबईत मेंबर ऑफ दी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा गौरव प्रदान करण्यात आला आणि २०१२ साली सचिनची राज्यसभेचा खासदार पदी नियुक्‍ती झाली. गेल्‍या अनेक दिवसांपासून खराब फॉर्मशी झगडत असलेल्‍या सचिनवर मोठया प्रमाणावर टीका करण्‍यात येत होती. अचानक सचिनने वनडे क्रिकेट मधून निवृत्‍ती जाहीर करून सर्वांना आश्‍चर्याचा धक्‍का दिला आहे.
सचिन तेंडूलकरचा जन्‍म दि. २४ एप्रिल १९७३ रोजी मुंबई येथे एका मराठी कुटुंबात झाले. सचिन याचा मोठा भाऊ अजित तेंडूलकर याने त्‍याला लहानपणासूनच क्रिकेट खेळण्‍यास प्रोत्‍साहित केले. सचिन पाच वर्षाचा असतानाच त्‍याने आपल्‍या हातात बॅट घेतली आणि तेव्‍हापासूनच कसून सराव केला. मुंबई येथील शारदाश्रम विद्यामंदीर येथे प्राथमिक शिक्षण घेतले. त्‍याने क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्‍या सान्न्यिध्‍यातून आपल्‍या क्रिकेट जीवनाची सुरुवात केली. सचिनला गोलंदाजीची खूपच आवड होती. त्‍यासाठी त्‍याने वेगवान गोलंदाज बनण्‍यासाठी एम.आर.एफ. फाऊंडेशनच्‍या अभ्‍यास कार्यक्रमामध्‍ये भाग घेतला. परंतु गोलंदाजीचे प्रशिक्षक डेनिस लिली यानी सचिनला फलंदाजी करण्‍यास प्रोत्‍साहित केले. तेंव्‍हापासून सचिनने फलंदाजीकडे आपले लक्ष केंद्रित केले. सन १९९५ साली गजरातमधील श्रीमंत उद्योगपती आनंद मेहता यांची कन्‍या अंजली मेहता हिच्‍याशी सचिनचा विवाह झाला.
क्रिकेट विश्‍वात शतकांचा महाशतक १०० शतके काढणारा सचिन हा एकमेव खेळाडू आहे. तसेच कसोटी सामन्‍यात त्‍याचे ३४ हजार धावा सुध्‍दा पुर्ण झाल्‍या आहेत. असे अनेक विश्‍वविक्रम त्‍याच्‍या नावावर जमा आहेत. त्‍याने आपला १०० वा शतक श्रीलंकेमध्‍ये झालेल्‍या तिरंगी मालिकेत बांगलादेशाविरूद्ध साजरे केले. आपल्‍या २३ वर्षाच्‍या कारकीर्दीत सचिनने ४६३ वनडे सामन्‍यात ४४.८३ च्‍या सरासरीने १८,४२६ धावा केल्‍या. त्‍याने वनडेमध्‍ये विक्रमी ४९ शतके आणि ९६ अर्धशतके ठोकली आहेत. उल्‍लेखनीय म्‍हणजे त्‍याने १५४ विकेट मिळवल्‍या आहेत. यामध्‍ये पाच किंवा त्‍यापेक्षा जास्‍त विकेट त्‍याने दोनवेळा घेतल्‍या आहेत. त्‍याने आपल्‍या एकदिवसीय सामन्‍यात सर्वाधिक धावा ऑस्‍ट्रेलियाविरूद्ध केल्‍या आहेत. सचिनने वर्ल्‍डकपमध्‍ये ६० सामन्‍यात तीन हजार धावा केल्‍या आहेत. त्‍यात ९ शतके आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे. वनडेमध्‍ये द. आफ्रिकाविरूद्ध नाबाद द्विशतक करण्‍याचाही त्‍याने विश्‍वविक्रम केलेला आहे.
शाळेत असताना सचिनने आपला मित्र विनोद कांबली याच्‍याबरोबर हॅरीस शिल्‍ड गेममध्‍ये ६६४ धावांची भागीदारी रचली. त्‍या सामन्‍यात सचिनने आपल्‍या शाळेच्‍या संघाला ’ हॅरिस शील्‍ड’ मिळवून दिले. सन १९८८ साली आपल्‍या पहिल्‍या प्रथम श्रेणी सामन्‍यांमध्‍ये तो १०० धावांवर नाबाद राहिला. सचिनची ही बलाढय कामगिरी पाहून भारतीय क्रिकेट मंडळाने आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट संघात त्‍याची निवड केली. तेंव्‍हा त्‍याचे वय १६ वर्षे होते. एवढया लहान वयात खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला. आपली निवड झाल्‍यानंतर सचिनने आपल्‍या यशाचे सर्व श्रेय त्‍याचे गुरू रमाकांत आचरेकरांना दिले. सचिन एवढ्या लहान वयात निवड झाल्‍यानंतर अनेकजण म्‍हणू लागले की, हा मुलगा काय खेळणार? या खेळात तो नशीब आजमू शकणार नाही, असे सर्वांना वाटत होते. पण हाच सचिन आज क्रिकेटच्‍या अनेक उंच शिखरावर जाऊन पोहचला.
सचिनने आपल्‍या कारकीर्दीची सन १९८९ मध्‍ये पाकिस्‍तानाविरूद्ध झालेल्‍या कसोटी सामन्‍यापासून सुरुवात केली. त्‍या सामन्‍यात पाकचे वासिम अक्रम, इम्रान खान, वकार युनुस सारखे दिग्‍गज गोलंदाजासोबत तो सामना खेळला. त्‍याची सुरुवात मात्र निराशजनक झाली. वकार युनुस याने नवखा सचिनला अवघ्‍या १५ धावावर बाद केले. सचिचने सन १९९० साली आपल्‍या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक इंग्‍लंडविरूद्ध झळकावले. तर एकदिवसीय सामन्‍यांमधील पहिले शतक दि. ९ सप्‍टेंबर १९९४ साली कोलंबो येथे ऑस्‍ट्रेलियाविरूद्ध नोंदविले. तेंव्‍हापासून सचिन फुल फॉर्मात आला. सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर हे वनडेतील टीम इंडियाची सर्वात यशस्‍वी जोडी ठरली आहे. या जोडीने १३६ वनडेत ६ हजार ६०९ धावा जोडल्‍या असून दोघांनी २१ वेळा शतकी सलामी दिली आहे. तसेच त्‍याने सेहवाग सोब‍त ८९ लढतीत १२ शतकी सलामीसह ३ हजार ८४४ धावा केल्‍या आहेत.
comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)