भारत अंतिम फेरीत!

2017-06-16 11:15:54
     731 Views

बांगलादेशवर ९ विकेटनी विजय
रविवारी पाकिस्तानशी भिडणार

बर्मिगहॅम ह्न बांगलादेशवर ९ विकेट आणि ९.५ षटके राखून विजय मिळवत गतविजेता भारताने आठव्या आयसीसी चँपियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात धडक मारली. ‘फायनल’ मध्ये रविवारी (१८ जून) भारत आणि पाकिस्तान हे परंपरागत प्रतिस्पर्धी एकमेकांशी भिडतील.
बांगलादेशचे २६५ धावांचे आव्हान भारताने ४०.१ षटकांत एका विकेटच्या बदल्यात पार केले. सलामीवीर रोहित शर्माचे (१२९ चेंडूंत नाबाद १२३ धावा) दणकेबाज नाबाद शतक तसेच कर्णधार विराट कोहली (७८ चेंडूंत नाबाद ९६ धावा) आणि सलामीवीर शिखर धवनची (३४ चेंडूंत ४६ धावा) फटकेबाजी भारताच्या विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले. फॉर्मात असलेल्या शिखर धवन आणि रोहित शर्माने झटपट सुरुवात करताना १४.४ षटकांत ८७ धावांची सलामी दिली. धवनचे अर्धशतक चार धावांनी हुकले. त्याच्या ३४ चेंडूंतील झटपट खेळीत ७ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. शिखर बाद झाल्यानंतर रोहितने एक बाजू लावून धरताना दुस-या विकेटसाठी विराट कोहलीसह १७८ धावांची नाबाद भागीदारी करताना तब्बल दहा षटके राखून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रोहितचे हे ११वे वनडे शतक आहे. विराटला २८व्या शतकासाठी अवघ्या चार धावा कमी पडल्या. रोहित आणि कोहलीसमोर बांगलादेशच्या गोलंदाजांनी हात टेकले. कर्णधार मश्रफे मोर्ताझाने स्वत:सह तब्बल आठ गोलंदाज वापरले. मात्र त्यांना मिळून एकच विकेट घेता आली.

तत्पूर्वी, बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २६४ धावा केल्या. सलामीवीर तमिम इक्बालसह (८२ चेंडूंत ७० धावा) मुशफिकूर रहिमच्या (८५ चेंडूंत ६१ धावा) दमदार फलंदाजीने बांगलादेशला तारले. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा कर्णधार विराट कोहलीचा निर्णय मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने योग्य ठरवला. पहिल्याच षटकात त्याने सरकारची दांडी उडवली. मात्र तमिमने तिस-या क्रमांकावरील सब्बीर रहमानसह डाव सावरण्याचा प्रयत्न केला तरी भुवनेश्वरने सब्बीरला बाद करत भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर तमिम आणि मुशफिकूर जोडी जमली. या जोडीने तिस-या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारी रचताना बांगलादेशला सावरले. तमिमने दुसरे अर्धशतक ठोकताना ८२ चेंडूंत ७ चौकार आणि एका षटकारासह ७० धावांचे योगदान दिले. मुशफिकूरने ८५ चेंडूंत ६१ धावा केल्या. त्यात चार चौकारांचा समावेश आहे. स्थिरावलेली जोडी बाद झाल्यानंतर ३ बाद १७६ वरून ५ बाद १७९ धावा अशी बांगलादेशची अवस्था झाली. मात्र मोसाद्देकने महमुदुल्लासह सहाव्या विकेटसाठी ३९ तसेच कर्णधार मोर्ताझाने तस्किन अहमदसह आठव्या विकेटसाठी नाबाद ३५ धावांची भागीदारी करताला संघाला अडीचशेपार नेले. भारतातर्फे भुवनेश्वर कुमारसह जसप्रीत बुमरा या मध्यमगती दुकलीने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. ऑफस्पिनर केदार जाधवही (२२-२) चालला. मात्र गतविजेत्यांच्या गोलदाजांनी स्वैर मारा करताना ७ वाईडसह २ नोबॉल, ९ लेगबाईज आणि पेनल्टीच्या पाच धावांसह २३ अवांतर धावा दिल्या.

धवनचा धडाका चँपियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय
भारताचा डावखुरा सलामीवीर शिखर धवनने जबरदस्त फॉर्म राखत चँपियन्स ट्रॉफीमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला. त्याच्या ९ डावांतील ६८० धावा भारतातर्फे सर्वाधिक आहेत. त्यात तीन शतके आणि तितक्याच अर्धशतकांचा समावेश आहे. चँपियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणा-या फलंदाजांमध्ये शिखर चौथ्या स्थानी आहे. त्याच्यासमोर श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा (६८३ धावा) तसेच श्रीलंकेचाच माजी कर्णधार माहेला जयवर्धने (७४२ धावा) आणि वेस्ट इंडिजचा फटकेबाज सलामीवीर क्रिस गेल (७९१ धावा) आहे. धवनने आठव्या चँपियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशविरुद्ध ३४ चेंडूंत ४६ धावांची झटपट खेळी केली. तत्पूर्वी, शेवटच्या साखळी लढतीत श्रीलंकेविरुद्ध शतक (१२५) ठोकले. बांगलादेश आणि पाकिस्तानविरुद्ध अर्धशतके ठोकत शिखरने विजयात मोलाचे योगदान दिले.

कोहलीच्या आठ हजार धावा पूर्ण
विराटने ४२वे अर्धशतक ठोकताना वनडेत आठ हजार धावांचा टप्पा पार केला. सर्वात कमी सामन्यांत हा टप्पा गाठणारा तो जगातील पहिला फलंदाज आहे. आठ हजारी मजल मारण्यासाठी कोहलीला १८३ सामने पुरेसे ठरले. त्याची सरासरी ५४.४५ अशी आहे. विराटने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डेविलियर्सला मागे टाकले.
comments