केन विल्यम्सन व रॉस टेलरची दमदार फलंदाजी


नवी दिल्ली, १६ सप्टेंबर
भारताविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी आजपासून येथे रणजी विजेत्या मुंबईविरुद्ध सुरु झालेल्या तीन दिवसीय सराव सामन्यात पहिल्या दिवशी न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यम्सन व रॉस टेलरने दमदार फलंदाजी केली. मुंबईच्या खराब गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध वेळेचा सदुपयोग केला.
थोडीफार हिरवळ असलेल्या खेळपट्टीवर चेंडूला जास्त वळण मिळत नव्हते. त्यामुळे कर्णधार केन विल्यम्सनसह पाहुण्या संघाच्या फलंदाजांनी बिनधास्त स्वैर फलंदाजी केली. केनने ५६ चेंडूत ५० धावा ठोकल्या. सलामी फलंदाज टॉम लाथम (९७ चेंडूत ५५ धावा), रॉस टेलर (५७ चेंडूत ४१ धावा) व मिशेल सॅण्टनर (५९ चेंडूत ४५ धावा) यांची उत्तम साथ मिळाली. त्यामुळे न्यूझीलंडने ७५ षटकात ७ बाद ३२४ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला.
प्रत्युत्तरात मुंबई संघाने १३ षटकात एक गडी गमावित २९ धावा काढल्या. आजचा खेळ थांबला तेव्हा अरमान जाफर (२४) व कौस्तुभ पवार (५) खेळपट्टीवर होते. डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने सलामी फलंदाज जय बिस्टाला (०) उसळत्या चेंडूवर यष्टीमागे झेलबाद केले. मुंबई संघासाठी बलविंदर सिंग संधू ज्युनिअर थोडीफार चांगले प्रदर्शन करु शकला. त्याने आपल्या मध्यम गती गोलंदाजीने २ बळी टिपले. विशेषतः विशाल दाभोळकर, सिद्धेश लाड व विजय गोहिल हे फिरकीपटूंचे त्रिकुट अपयशी ठरले. ते प्रतिस्पर्धी फलंदाजांना थोडेही त्रस्त करु शकले नाही.
comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)