झिंबाब्वे, वेस्ट इंडिज दौ-यासाठी भारतीय संघ जाहीर

2016-05-25 12:57:05
     445 Views

मुंबई- भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी झिंबाब्वे आणि वेस्ट इंडिज दौ-यासाठी सोमवारी संघाची घोषणा करण्यात आली. झिंबाब्वे दौ-यासाठी नवीन चेह-यांना संधी देण्यात आली आहे. तर विंडीजविरुद्ध होणा-या कसोटी सामन्यांसाठी अनुभवी संघ कायम ठेवत, मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याला स्थान देण्यात आले आहे.
संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या दोन्ही दौ-यांसाठी संघ घोषित केले. भारतीय संघ झिंबाब्वे दौ-यात तीन एकदिवसीय आणि तीन टी- २० सामने खेळणार आहे. तर विंडीज दौ-यात भारत चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका जुलै व ऑगस्टमध्ये खेळविली जाणार आहे.
निवड समितीने दुबळ्या समजल्या जाणा-या झिंबाब्वे दौ-यासाठी महेंद्रसिंग धोनीकडेच नेतृत्व कायम ठेवत नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. फैज फजल,करुण नायर,जयंत यादव,मनदीप सिंगसह यजुवेंद्र चहल या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणा-या खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. याबरोबरच अक्षर पटेल,अंबाती रायडू,मनीष पांडे,के. एल. राहुल यांनाही वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत आपली चमक दाखविण्याची संधी आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड समितीने अनुभवी खेळाडूंना प्राधान्य देत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघात दोन फिरकीपटूंसह पाच जलदगती गोलंदाजांना स्थान दिले आहे. स्टुअर्ट बिन्नी आणि रवींद्र जडेजा हे अष्टपैलू म्हणून संघात सहभागी असतील. महंमद शमीने आयपीएलमध्ये पुनरागमन केल्यानंतर आता तो राष्ट्रीय संघात खेळताना दिसणार आहे.
भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली, सलमीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि शिखर धवन यांना झिंबाब्वे दौ-यावरील छोटेखानी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. झिंबाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी संघाचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीकडे असणार असून संघात फैज फजल हा नवा चेहरा पाहायला मिळणार आहे. फैजसोबतच केल. एल. राहुल, मनीष पांडे, करुण नायर, चहल, जयदेव उनाडकट या युवांना संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विराट कोहलीकडे कर्णधारपदाची धुरा असणार असून मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे उप-कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कसोटी संघात अनुभवी खेळाडूंसोबतच शार्दुल ठाकूर या युवा खेळाडूचाही १६ जणांच्या संभाव्य यादीत समावेश करण्यात आला आहे.
एकदिवसीय संघ
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार),के. एल. राहुल, फैज फजल, मनीष पांडे, करुण नायर, अंबाती रायडू, ऋषी धवन, अक्षर पटेल, जयंत यादव, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, बरिंदर सरन, मनप्रीत सिंग, केदार जाधव, जयदेव उनाडकट, यजुवेंद्र चहल.
कसोटी संघ
विराट कोहली (कर्णधार), के. एल. राहुल, शिखर धवन, रोहित शर्मा, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, अमित मिश्रा, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, मोहंमद शामी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, स्टुअर्ट बिन्नी.
comments