श्रीलंकेची भारतावर मात

26-02-2016 : 12:14:18
     771 Views

पुणे : भारताने दिलेले १०२ धावांचे आव्हान श्रीलंकेने १८ षटकांत ५ विकेटस्च्या मोबदल्यात सहज पार केले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आपल्या पहिल्याच षटकात दोन बळी घेणा-या रजिथाला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. आता दुसरा सामना १२ फेब्रुवारी रोजी धोनीच्या गावात म्हणजे रांची येथे होईल. श्रीलंकेने डिकवेला आणि गुणतिलप्पा या सलामी जोडीला लवकर गमावले परंतु कर्णधार चांदीमल, कमुगेदेरा आणि श्रीवर्दनाने आपल्या संघाला विजय करण्याची जबाबदारी उचलली. चांदीमल कमुगेदेराने तिस-या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी करून आपल्या संघाचा विजय निश्चित केला. चांदीमलने सर्वाधिक ३५ धावा काढताना एक चौकार आणि दोन षटकार ठोकले. कमुगेदेराने ४ चौकारासह २५ धावा काढल्या. श्रीवर्दनाने १४ चेंडूत नाबाद २१ धावा काढल्या. भारतातर्फे नेहराने२१ धावांत २ तर अश्विनने १३ धावांत २ बळी घेतले.

ऑस्ट्रेलियन दौरा गाजवून आलेल्या टीम इंडियाने घरच्या प्रेक्षकांसमोर भिकार फलंदाजीचे प्रदर्शन केले. रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, युवराज, धोनी या दिग्गज फलंदाजांनी आपल्या विकेटस् फेकल्या. श्रीलंकेच्या युवा संघाने शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताचा डाव अवघ्या १०१ धावांत गुंडाळला. टी-२० त पदार्पण करणा-या रजीथाने २९ धावांत ३ बळी घेतले. त्याला स्पीनर शनाकाने १६ धावांत ३ बळी घेऊन सुरेख साथ दिली. पेटीएमटी २० मालिकेतील पहिला सामना गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु झाला. आजचा टी २० सामना या मैदानावरील दुसरा सामना. पहिली टी २० लढत इंग्लंडविरुध्द २० डिसेंबर २०१२ रोजी झाला होता. धोनीच्या टीम इंडियाने १३ चेंडू व ५ गडी राखून ती लढत जिंकली होती. टीम इंडियाने इंग्लंडचे १५८ धावांचे आव्हान अठराव्या षटकातील दुस-या चेंडूवरच संपवले होते.

सुर्यास्त झाल्यापासून मैदानावरील प्रेक्षक गॅलरी विखुरलेल्या स्वरुपातच भरली होती. सायंकाळी चार वाजल्यापासूनच मैदानाचे रस्ते भरून वाहू लागले. लोणावळ्यापासून ४६ तर पुण्यापासून २६ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय मैदान असूनही प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्तम होता. सायंकाळी सहा वाजता दोन्ही संघ मैदानावर वॉर्मअपसाठी उतरले होते. सात वाजता नाणेफेक झाली त्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. गहुंजेचे हिरवेगार मैदानावर एकूण पाच खेळपट्टया तयार होत्या. त्यातील मधल्या खेळपट्टीवर हा सामना झाला. एम. सी. ए. च्या या मैदानावर सर्वाधिक धावसंख्या आहे ती १८७ आणि सर्वात कमी आहे ९९. श्रीलंकेकडून यष्टीरक्षक डिकवेल आणि कसून रजिथाने पदार्पण केले. साडेसात वाजता रोहित शर्माने रजिथाचा पहिला चेंडू खेळला आणि दुस-या चेंडूवर झेलबाद झाला. चमिराने उजवीकडे झेपावत सुरेख झेल घेतला टीम इंडिया १ बाद ०. विराट कोहलीला मालिकेतून विश्रांती दिल्याने तिस-या क्रमांकावर अजिंक्य रहाणे आले. अजिंक्यने चौथ्या चेंडूवर थर्डमॅनकडे चौकार ठोकला आणि भारताच्या धावांचे खाते उघडले. पण नंतर चांदीमलकडे झेल देऊन तो परतला. २ बाद ५. तिस-या षटकांत शिखर धवनला थर्ड मॅनवर जीवदान मिळाले.

त्यानंतर त्याने मिडविकेटला थिसेरा परेराला षटकार ठोकला. दुसरा षटकार सुरेश रैनाने मिडविकेटवर खेचला. पाचव्या षटकात शिखर धवनने अनुष्काकडे झेल देऊन तंबूचा रस्ता धरला. या स्टेडियमवर पुणे वॉरीयर्सकडून खेळलेल्या युवराज सिंगचे आगमन झाले. युवराज सिंगने फिरकीपटू सेनानायकेचे स्वागत षटकाराने केले. रैनाचा झेल मिलींद सिरीवर्दनाने सोडला पण पुढच्याच चेंडूवर रैनाचा त्रिफळा दसून शनाकाने उद्ध्वस्त केला.त्यानंतर पुणे रायझिंगचा व टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने यष्टीरक्षक डिकवेलाकडे झेल देऊन तंबूत परतला. युवराज सिंगचा मिसटाईम फटका गोलंदाज चमिराने झेलला आणि निम्म्या षटकांतच भारताचा निम्मा संघ तंबूत परतला.

एकोणीसाव्या षटकांत मिळालेल्या ओव्हरथ्रोमुळे किमान शंभरी पूर्ण झाली आणि टीम इंडियाने येथील निचांकी धावसंख्या ओलांडली. पुढच्याच चेंडूवर नेहरा झेलबाद झाला. पण पुढच्याच चेंडूवर जसप्रीत बुमराह धावबाद झाला. भारताचा डाव १८.५ षटकांतच १०१ धावांवर गुंडाळला होता. भारतीयांच्या हाराकिरीमुळे शंभर धावा तरी बोर्डावर लागतात की नाही अशी शंका होती. भारतार्फे अश्विनने २४ चेंडूत ५ चौकारासह सर्वाधिक ३१ धावा काढल्या. रैनाने २० तर युवतीने १० धावांचे योगदान दिले.

इंटरनेट बंद
comments