भारताचा आफ्रिकेवर २२ धावांनी शानदार विजय

2015-10-15 13:35:48
     420 Views

भोपाळ : ‘कॅचेस विन मॅचेस’ या प्रत्यय भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात आला. इंदूरच्या मैदानात भारताने दक्षिण आफ्रिकेवर २२ धावांनी विजय मिळवत पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २४८ धावांचं माफक लक्ष्य दिलं होतं. पण दक्षिण आफ्रिकेचा अख्खा डाव २२५ धावांत गुंडाळण्यात भारताला यश आलं. धोनीच्या ९२ धावांच्या शानदार खेळीसह टीम इंडियाचं चपळ क्षेत्ररक्षण यामुळे भारताने विजयाला गवसणी घातली.

धोनीला सूर गवसला;
फलंदाजीतील सूर हरपल्यानंतर संघही अपयशी ठरत असल्यामुळे गेल्या अनेक सामन्यांपासून महेंद्रसिंह धोनीच्या क्षमतेविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात होते. या टीकेला धोनीने बॅटद्वारेच चोख प्रत्युत्तर दिले. पहिल्या सामन्यातील शतकवीर रोहित शर्मा आज दुसऱ्याच षटकात बाद झाला. चाचपडत खेळणाऱ्या शिखर धवनला खेळपट्टीवर टिकून राहता आले नाही. त्यानंतर मैदानात आलेला विराट कोहलीही अतिआक्रमकतेच्या प्रयत्नांत धावबाद झाला. अजिंक्‍य रहाणेचा उडालेला झेल पकडण्यात फरहान बेहर्डिनला अपयश आले. त्याच्या हातातून चेंडू सुटल्यानंतर रहाणे-कोहलीने एक धाव घेतली. याचवेळी कोहलीने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि धावबाद झाला.

पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या धोनीने रहाणेसह ४० धावांची भागीदारी केली. इम्रान ताहीरच्या एका अप्रतिम चेंडूवर रहाणे त्रिफळाबाद झाला. त्यानंतर आलेल्या सुरेश रैनावर दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी उसळत्या चेंडूंचा मारा केला. नेहमीप्रमाणेच अशा उसळत्या चेंडूंसमोर रैनाचे तंत्र कमी पडले आणि तो यष्टिरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला. पाठोपाठ अक्षर पटेलही बाद झाला. त्यावेळी ३० व्या षटकामध्ये भारताची अवस्था ६ बाद १२४ अशी झाली होती. अशा परिस्थितीत धोनीने सूत्रे हाती घेत भुवनेश्‍वर कुमारसह ४१ धावांची, तर हरभजनसिंगसह ५६ धावांची भागीदारी केली. सावध पवित्रा न स्वीकारता धोनीने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर हल्ला केला. त्याने ८६ चेंडूंत ७ चौकार, ४ षटकारांसह नाबाद ९२ धावा केल्या.
भारतातर्फे भुवनेश्वर कुमार आणि अक्षर पटेलने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. हरभजन सिंहने दोन फलंदाजांना माघारी धाडलं तर उमेश यादव आणि मोहित शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली. दुसरीकडे ड्यू प्लेसिस वगळता एकाही आफ्रिकन फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
comments